दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे घराघरातल्या कामांना सुरुवात झाली आहे. दिवाळीत प्रत्येकीलाच कामांचा मोठा डोंगर उपसावा लागतो. अशात मग स्वत:कडे, स्वत:च्या सौंदर्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणूनच दिवाळीच्या (Diwali 2024 Celebration) ऐन तोंडावर पार्लरमध्ये एकदम २- ३ तास जाऊन बसण्यापेक्षा आतापासूनच आठवड्यातून दोनदा स्वत:साठी फक्त काही मिनिटांचा वेळ काढा आणि हा सोपा घरगुती उपाय करा. यामुळे चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन, टॅनिंग बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि त्वचेवर खूप छान चमक येईल.(best home remedies to reduce dark spots, tanning and pigmentation)
चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स, टॅनिंग कमी करण्याचा उपाय
कोणता घरगुती उपाय करून चेहऱ्यावर नितळ चमक आणता येते, याविषयी खूप छान माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
यामध्ये जो उपाय करायला सांगितला आहे त्यासाठी आपल्याला मसूर डाळ, मुलतानी माती, कच्चं दूध आणि तांदळाचं पीठ लागणार आहे.
सगळ्यात आधी तर एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे मसूर डाळ घ्या आणि ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ३ ते ४ तासांसाठी ही डाळ कच्च्या दुधामध्ये भिजत घाला.
डाळ चांगली भिजल्यानंतर ती दुधासकट मिक्सरमध्ये टाका आणि तिची बारीक पेस्ट करून घ्या.
मसूर डाळीच्या पिठामध्ये १ चमचा तांदळाचं पीठ आणि १ चमचा मुलतानी माती टाका. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून छान एकजीव करून घ्या. त्यानंतर चेहरा धुवून कोरडा करा आणि मग हा लेप चेहऱ्यावर लावा.
२० ते २५ मिनिटांनंतर लेप सुकला की हलक्या हाताने चोळून तो काढून टाका आणि चेहरा धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर त्याला व्यवस्थित मॉईश्चराईज करा. टॅनिंग कमी होऊन त्वचा खूप छान चमकदार झाल्याचे दिसून येईल. पिगमेंटेशन कमी होण्यासाठी काही दिवस आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे हा उपाय करावा.