आपला चेहरा चमकदार, नितळ असावा असे प्रत्येकीलाच वाटते. पण काही ना काही कारणानी कधी चेहऱ्यावर फोड येतात तर कधी डाग पडतात. इतकेच नाही तर अनेकदा चेहऱ्यावर येणाऱ्या अनावश्यक केसांमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. चेहऱ्यावर केस येण्याची अनेक कारणे असतात. अनुवंशिकता, हार्मोन्सचे असंतुलन यांसारख्या कारणांनी चेहऱ्यावरील अनावश्यक केसांची वाढ होते (Diet Tips for Facial hair). एकदा हे केस आले की ते घालवणे अवघड होऊन बसते. यावर उपाय म्हणून आपण व्हॅक्सिंग, थ्रेडींग करतो किंवा ते केस लपावेत म्हणून ब्लीच करतो. अनेकदा काही घरगुती उपायांनीही हे केस काढले जातात. लेझर उपचार हा हे केस कायमचे घालवण्यासाठी एक चांगला उपाय ठरु शकतो. मात्र त्यासाठी आवश्यक असणारा खर्च खूप जास्त असल्याने हा उपाय सगळ्यांना परवडतोच असे नाही (How To Reduce Unwanted Facial Hair Women Nutritionist Tips).
आता चेहऱ्यावर केस आलेत पण ते वाढू नयेत किंवा जास्त प्रमाणात सगळीकडे पसरु नयेत म्हणून यासाठी काय करता येईल हे आपल्याला माहित नसते. मग कधी आपण एखाद्या ऐकीव माहितीवर किंवा कधी मैत्रीणींनी सांगितलेले उपाय करुन पाहतो. पण चेहऱ्यावर आलेल्या केसांची वाढ होऊ नये यासाठी नेमके काय करायला हवे याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ शिखा गुप्ता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या टिप्स देतात. चेहऱ्यावरचे केस वाढण्याची कारणे, ते कमी करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याविषयी त्या काय सांगतात पाहूया...
का येतात महिलांच्या चेहऱ्यावर अनावश्यक जास्तीचे केस?
पुरुषांमध्ये असणारे अँड्रोजेन या हार्मोन्सचे प्रमाण महिलांमध्ये वाढल्याने चेहऱ्यावर केस येतात. आता हे हार्मोन्स महिलांच्या शरीरात का वाढतात तर त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शरीर इन्शुलिनला प्रतिकार न करु शकल्याने याची शरीरातील पातळी वाढते. महत्त्वाचे म्हणजे हे इन्शुलिन आपल्या रक्ताच्या चाचणीत दिसतेच असे नाही. मात्र चेहऱ्यावर केस असतील तर आपली इन्शुलिनची पातळी वाढली आहे हे लक्षात घ्यायला हवे. आता यावर उपाय काय ते पाहूया...
१. या गोष्टी पूर्णपणे टाळा
आहारात आपण साखरेचा बऱ्याच प्रमाणात वापर करतो किंवा गोड पदार्थही अतिशय आवडीने खातो, ते पूर्णपणे बंद करा. पॅकेट फूड, रिफाईंड ऑइलचा वापर करु नका. अजैविक दूध आणि दुधाचे पदार्थ, प्लास्टीक कॉस्मेटीक्स आणि परफ्यूम्स यांचा वापर टाळा. एकूण काय तर जीवनशैलीत जास्तीत जास्त जैविक पदार्थांचा समावेश करा. कारण विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांमुळे आपल्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढते आणि त्यामुळे चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे किंवा पीसीओएससारखा त्रास उद्भवतो.
२. इन्शुलिनला प्रतिकार
शरीराने इन्शुलिनला प्रतिकार करावा यासाठी आहारातील कर्बोदकांचे प्रमाण कमी करायला हवे. यासाठी एकावेळी आपल्या आहारात केवळ २० टक्के कार्बोहायड्रेटस असतील असे पाहा. त्यामुळे इस्ट्रोजेनची पाळी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.
३. ओमेगा ३ चा समावेश
आपल्या आहारात ओमेगा ३ ची अनेकदा कमतरता असण्याची शक्यता असते. ओमेगा ३ हे मासे, जवस, बदाम, आक्रोड यांसारख्या ठराविक पदार्थांतूनच मिळते. त्यामुळे या गोष्टींचा आहारात समावेश वाढवा.
४. शरीरातून इस्ट्रोजेन बाहेर काढा
यासाठी आपण २ गोष्टी करु शकतो. त्यातील सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याला बद्धकोष्ठता व्हायला नको. त्यासाठी रात्रभर पाण्यात भिजवलेले ७ ते ८ काळे मनुके सकाळी उठल्यावर आवर्जून खा, त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल. तसेच भरपूर व्यायाम करुन घामाच्या माध्यमातून इस्ट्रोजेन बाहेर पडेल याची काळजी घ्या.
५. जास्तीत जास्त भाज्या खा
ही गोष्ट अतिशय गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे. दिवसभरात किमान ३ ते ५ पक भाज्या आपल्या पोटात जातील याची अवश्य काळजी घ्या. यामध्ये कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, मुळा, पालेभाज्या यांचा समावेश अवश्य असायला हवा.