चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यांमुळे जशी सौंदर्यास बाधा येते तशीच बाधा चेहेऱ्यावरील ब्लॅक हेड्समुळे (black heads) निर्माण होते. चेहेऱ्याच्या त्वचेवरील रंध्रात धूळ आणि घाण जमा होवून त्याचं रुपांतर ब्लॅकहेड्समध्ये होतं. चेहेऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढणं हे खर्चिक आणि वेळखाऊ काम वाटत असलं तरी घरच्याघरी उपाय (home remedy for black heads) करुन ही समस्या सहज सोडवता येते. दालचिनी, लिंबू, मसूर डाळ, दूध, साखर, खोबऱ्याचं तेल आणि मीठ या स्वयंपाकघरातील गोष्टींचा वापर करुन चार प्रकारचे घरच्याघरी स्क्रब (home made scrub for black heads) तयार करुन चेहेऱ्यावरील ब्लॅक हेड्स काढता येतात.
Image: Google
दालचिनी आणि लिंबू
त्वचेसाठी दालचिनी कोलॅजन निर्मितीस चालना देणारा घटक आहे. दालचिनीमुळे त्वचेवरील रंध्रांचा आकार कमी होतो. तर लिंबातील ॲण्टिऑक्सिडेण्ट्समुळे रंध्रांची खोलवर स्वच्छता होते. दालचिनी आणि लिंबाचा स्क्रब तयार करण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 चमचा दालचिनी पावडर घ्यावी. ती नीट एकत्र करुन हे मिश्रण चेहेऱ्यावर जिथे ब्लॅक हेड्स आहे तिथे 10-15 मिनिटं हलक्या हातानं मसाज करत लावावं. नंतर चेहेरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा.
Image: Google
मसूर डाळ आणि दूध
दुधामुळे त्वचेला पोषण मिळतं. तर मसुर डाळीतील गुणधर्म चेहेऱ्यावरील ब्लॅक हेड्स मुळापासून काढतात. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांसाठीही मसूर डाळ आणि दुधाचं स्क्रब फायदेशीर ठरतं. मसुर डाळीमधील ॲण्टिऑक्सिडेण्ट त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतं. मसूर डाळ आणि दुधाचं स्क्रब तयार करण्यासाठी मसूर डाळ काही तास पाण्यात भिजत घालावी. डाळ भिजल्यानंतर ती वाटून घ्यावी. वाटलेल्या डाळीत 2 चमचे दूध घालून ते नीट डाळीत मिसळून घ्यावं. या मिश्रणानं चेहेऱ्याला 15 मिनिटं हलक्या हातानं मसाज करावा. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
Image: Google
साखर आणि खोबऱ्याचं तेल
साखरेमध्ये त्वचा खोलवर स्वच्छ करणारे घटक असतात. साखरेमुळे त्वचेचे बंद झालेली रंध्रं खोलवर स्वच्छ होतात. साखरेमुळे चेहेऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. तर खोबऱ्याच्या तेलामुळे त्वचा मऊ होते. तसेच खोबऱ्याच्या तेलात जिवाणुविरोधी आणि दाह विरोधी घटक असतात. हे घटक त्वचेची काळजी घेतात. साखर आणि खोबऱ्याच्या तेलाचं स्क्रब करण्यासाठी एक चमचा साखर 2 चमचे खोबऱ्याच्या तेलात घालून या मिश्रणानं चेहेऱ्याला हलक्या हातानं मसाज करावा. नंतर चेहेरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा.
Image: Google
मीठ आणि लिंबू
लिंबात असलेल्या सायट्रिक ॲसिडमुळे त्वचेशी निगडित समस्या बऱ्या होतात आणि चेहेराही उजळतो. लिंबात असलेल्या क जीवनसत्वामुळे त्वचा घट्ट होते. मीठ आणि लिंबाचं स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा चमचा मिठात अर्ध्या लिंबाचा रस घालावा. या मिश्रणानं चेहेऱ्यास 10 मिनिटं हलक्या हातानं मसाज करावा. नंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा.