Join us  

चेहऱ्यावर खूप ब्लॅकहेडस, व्हाईटहेडस आलेत? घरच्या घरी करा ३ स्टेप्स, चेहरा दिसेल नितळ-सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2023 12:36 PM

How To Remove Blackheads and Whiteheads Naturally at Home : नैसर्गिक उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.

ठळक मुद्देघरात उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरुन सौंदर्य खुलवता येऊ शकतं...ब्लॅकहेडसची समस्या दूर होण्यासाठी करता येतील असे सोपे उपाय..

आपला चेहरा अभिनेत्रींप्रमाणे नितळ आणि ग्लोईंग असावा असं आपल्या प्रत्येकीला वाटतं. पण आपण त्यांच्याइतकी चेहऱ्याची काळजी घेत नाही. स्कीन केअर रुटीन फॉलो करायला आपल्याला जमतंच असं नाही. तसंच आपण बाहेर फिरतो तेव्हा प्रदूषण, धुळीचे कण, घाम हे सगळं त्वचेवर जमा होतं आणि त्वचा खराब होते. मग त्वचेवर फोड येणे, त्वचा कोरडी पडणे यांबरोबरच ब्लॅकहेडस आणि व्हाईटहेडस येणे अशा समस्या उद्भवतात. ब्लॅकहेडस आणि व्हाईटहेडस त्वचेच्या आतल्या भागात अडकून राहतात आणि त्यामुळे त्वचा खराब दिसते. एकदा हे ब्लॅकहेडस किंवा व्हाईटहेडस चेहऱ्यावर जमा व्हायला लागले की मग ते काढणे अवघड होऊन जाते (How To Remove Blackheads and Whiteheads Naturally at Home). 

अशावेळी आपल्याकडे पार्लरमध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो. पार्लरमध्ये गेले की पैसे तर जातातच पण चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग केल्याने त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा घरच्या घरी काही नैसर्गिक उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हे उपाय करायचे असल्याने यासाठी विशेष खर्चही येत नाही. इतकेच नाही तर त्यामुळे ब्लॅकहेडस आणि व्हाईटहेडस निघण्यास मदत होते आणि चेहरा ग्लोईंग दिसतो. इन्स्टाग्रामवर याविषयीचा एक सोपा उपाय सांगितला असून तो काय आणि कसा करायचा ते पाहूया.... 

१. स्क्रबिंग 

१ चमचा कॉफी पावडर, १ चमचा पिठीसाखर आणि १ चमचा ऑलिव्ह ऑईल एकत्र करायचे. ज्याठिकाणी ब्लॅकहेडस किंवा व्हाईटहेडस आहेत त्याठिकाणी हे स्क्रब हाताने चोळायचे. यामुळे डेड स्कीन निघून जाण्यासही चांगली मदत होते. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचा.

२. फेस पॅक

पाव चमचा हळद, १ चमचा बेसन पीठ आणि १ चमचा गुलाब पाणी एकत्र करायचे. हा नैसर्गिक फेस पॅक चेहऱ्याला लावायचा. १० मिनीटे हा पॅक चेहऱ्यावर ठेवून नंतर तो साध्या पाण्याने धुवून टाकायचे. यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेडस निघून जाण्यास मदत होते. 

३. मॉईश्चरायजर 

यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायजर लावावे. त्यामुळे चेहरा ग्लोईंग आणि चमकदार दिसण्यास मदत होते.    

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी