आपली चेहऱ्याची त्वचा नितळ असावी असं आपल्याला कायम वाटतं. मात्र काही ना काही कारणांनी चेहऱ्यावर पिंपल्स येणे, सुरकुत्या येणे किंवा चेहऱ्याची त्वचा कोरडी होणे यांसारख्या तक्रारी उद्भवतात. इतकेच नाही तर ब्लॅकहेडस आणि व्हाईटहेडसमुळे चेहरा खराब दिसायला लागतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांना चेहऱ्यावर ब्लॅकहेडस जास्त प्रमाणात येतात. चेहऱ्यावरच्या त्वचेची रंध्रे बंद होऊन त्याठिकाणी घाण साचते आणि त्वचेला ऑक्सिजन मिळण्याच्या क्रियेत अडथळा येतो. त्यालाच आपण ब्लॅकहेडस म्हणतो. हे काढण्यासाठी बरेचदा आपण पार्लरमध्ये जाण्याचा पर्याय निवडतो. मात्र त्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास ब्लॅकहेडस आणि व्हाईटहेडसपासून आपले संरक्षण होऊ शकते. त्यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी राजेंद्र काही सोपे उपाय सांगतात, ते कोणते पाहूया (How To Remove Blackheads and Whiteheads Naturally)...
१. ओटमिल फेसपॅक
एक चमचा ओटस घेऊन त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करुन घ्यायची. त्यामध्ये गुलाबाचे पाणी घालून त्याचा फेसपॅक तयार करायचा. हा फेसपॅक चेहऱ्याला लावून २० मिनीटांसाटी हा पॅक तसाच ठेवायचा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवायचा. हे रोजच्या रोज आपले क्लिंजिंग रुटीन म्हणून फॉलो करायचे.
२. वाफ घेणे
चेहऱ्यासाठी दुसरी नैसर्गिक ट्रीटमेंट म्हणजे वाफ घेणे. यामुळे चेहऱ्याचे बंद झालेले पोअर्स ओपन होण्यास मदत होते आणि ही ब्लॅक किंवा व्हाईट हेडस निघून जातात. यासाठी वाफ घेताना पाण्यात चंदन पावडर किंवा लिंबाचा रस घातल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
३. फेस मास्क
१ चमचा यष्टीमधु पावडर, अर्धा चमचा मध आणि १ चमचा गुलाब पाणी एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करायची आणि त्यापासून फेस मास्क तयार करायचा. हा मास्क चेहऱ्याला लावून १५ मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका. त्यामुळे व्हाईटहेडस निघून जाण्यास मदत होईल.
४. हळदीची पेस्ट
अर्धा चमचा हळद घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस घाला. ज्याठिकाणी व्हाईट हेडस आहेत तिथे ही पेस्ट लावा. काही वेळ ठेवून नंतर मसाज करुन चेहरा धुवून टाका. त्यामुळे व्हाईटहेडस निघून जाण्यास मदत होईल. आठवड्यातून २ वेळा हा उपाय करा, म्हणजे त्याचा चांगला उपयोग होईल.
५. मुलतानी माती
त्वचेच्या बऱ्याच समस्यांवर मुलतानी माती अतिशय उपयुक्त ठरते. तेलकटपणा कमी होण्यासाठी तसेच त्वचेवरील घाण निघून जाण्यासाठी मुलतानी मातीचा उपयोग होतो. त्वचा सैल पडू नये यासाठीही मुलतानी माती फायदेशीर असते. १ चमचा मुलतानी माती, चिमूटभर हळद, अर्धा चमचा कडुनिंब पावडर एकत्र करुन त्यात थोडे पाणी, दूध आणि लिंबाचा रस घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावायचे. आठवड्यातून २ वेळा हा मास्क लावल्यास चेहऱ्यावरील ब्लॅकहेडस आणि व्हाईटहेडस कमी होण्यास मदत होते.