आपल्यातील प्रत्येकाला कधी ना कधी ब्लॅकहेडस येतातच. त्यामुळे आपल्या सौंदर्यात बाधाही येते. मग आपण पार्लरमध्ये जाऊन फेस क्लिनिंग करुन घेतो तेव्हा कुठे हे ब्लॅकहेडस निघतात. कधी ते नाकावर तर कधी नाकाच्या आजुबाजूला. चेहऱ्यावर जमा होणाऱ्या तेलाचा आजुबाजूच्या वातावरणाशी संपर्क आला की धूळ त्वचेच्या रंध्रांमध्ये जाते आणि ब्लॅकहेडस येतात (How To Remove Blackheads) . हे ब्लॅकहेडस आपल्या त्वचेमध्ये इतके रुतलेले असतात की ते काही केल्या बाहेर यायचे नाव घेत नाहीत. दरवेळी आपल्याला पार्लरमध्ये जायला वेळ होईलच असे नाही. तेव्हा ब्लॅकहेडस काढण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय पाहूया.
१. बेकींग सोडा
एक चमचा बेकींग सोडामध्ये दोन चमचे पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट ब्लॅकहेडसवर लावा. १० ते १५ मिनीटे ठेवल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून टाका. सोडा एक्सफॉलिएटरप्रमाणे काम करते तसेच चेहऱ्यावर जमा होणारे तेल शोषून घेण्यास याची चांगली मदत होते.
२. मध
मध हा अँटीसेप्टीक आणि अँटीबॅक्टेरीयल असे दोन्ही काम करतो. त्वचेच्या रंध्रांमध्ये अडकलेली घाण साफ करण्यासाठी मधाचा अतिशय चांगला उपयोग होतो. ज्यांना ब्लॅकहेडस येऊन त्याचे पुरळ येतात अशांसाठी मध हा अतिशय उत्तम उपाय ठरु शकतो. मध नैसर्गिक अँटीबायोटीक म्हणून काम करत असल्याने त्वचेतील घाण काढण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. याबरोबरच त्वचेवर सुरकुत्या येऊ न देण्यासाठी आणि त्वचा उजळ राहण्यासाठीही मधाचा उपयोग होतो.
३. ग्रीन टी
एक चमचा ग्रीन टी घेऊन पाण्यासोबत त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर ज्याठिकाणी ब्लॅकहेडस आहेत त्याठिकाणी लावा. २० मिनीटांनी ही पेस्ट कोमट पाण्याने धुवा. ग्रीन टी मुळे चेहऱ्यावरील रंध्रे उघडी होऊन त्यातील घाण बाहेर यायला मदत होईल. त्यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेडस निघण्याचे काम सोपे होऊ शकेल.
४. केळ्याचे साल
आपण केळी खाल्ली की त्याचे साल फेकून देतो. मात्र सालाचा आतला भाग चेहऱ्यावरील ब्लॅकहेडस असणाऱ्या ठिकाणी घासला तर त्याचा चेहरा स्वच्छ व्हायला अतिशय चांगला उपयोग होईल. हा उपाय अगदी सोपा असून आपण तो सहज करु शकतो.