उन्हाळ्याच्या दिवसांत चेहरा टॅन होणे ही अतिशय सामान्य बाब आहे. उन्हामुळे रापलेला चेहरा काळा दिसायला लागतो आणि काहीवेळा त्यावर रॅशेस येण्याचीही समस्या उद्भवते. कपाळ हा चेहऱ्याचा काहीसा पुढे असणारा भाग इतर चेहऱ्यापेक्षा लवकर काळा पडतो. अनेकदा कपाळावर डाग पडतात आणि फोडही येतात. ज्यांची त्वचा ऑयली प्रकारात येते त्यांच्या कपाळावर तर तेल जमा होत असल्याने फोड आणि पुरळ येण्याची समस्या असते (How To Remove Skin Tanning at Home).
तसेच काहीवेळा केसाच्या भागात तयार होणारे तेलही या कपाळावर येते आणि त्यामुळे कपाळ पटकन काळपट दिसायला लागते. अनेकदा चेहरा गोरा दिसतो पण कपाळाचा भाग जास्त प्रमाणात काळा दिसायला लागतो. अशावेळी हे टॅनिंग वेळीच घालवले नाही तर चेहराही कालांतराने काळपट दिसायला लागतो. असे होऊ नये यासाठी घरच्या घरी कोणते उपाय करणे फायद्याचे ठरते आणि ते कसे करावेत याविषयी...
फेस पॅक तयार करण्यासाठी..
१. एका बाऊलमध्ये २ ते ३ चमचे मुलतानी माती घ्या.
२. यामध्ये २ चमचे गुलाब पाणी आणि २ ते ३ चमचे दूध घाला.
३. हे सगळे चांगले एकजीव करुन चेहऱ्यावर लावा, मात्र डोळ्यांच्या आजुबाजूला लागणार नाही याची काळजी घ्या.
४. साधारण २० ते ३० मिनीटे हा पॅक चेहऱ्यावर तसाच ठेवा.
५. यानंतर कापूस आणि पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.
६. चेहरा आणि कपाळाचे टॅनिंग दूर करण्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा हा पॅक लावा.
फायदे
१. दूधात व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असल्याने त्वचा मुलायम करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
२. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठीही दुधाचा अतिशय चांगला उपयोग होतो.
३. चेहऱ्यावरची रंध्रे मोठी होऊ नयेत यासाठी गुलाब पाणी फायदेशीर असते.
४. त्वचा डीप क्लीन करण्यासाठी मुलतानी माती फायदेशीर ठरते.
५. मातीतील अँटीऑक्सिडंटस टॅनिंग दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात तसेच त्वचा उजळण्यास मदत होते.