Join us  

How To Stop Hair fall : केस दिवसेंदिवस पातळ होत चाललेत? ५ चुकीच्या सवयी ठरतात कारणीभूत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 9:05 AM

How To Stop Hair fall : केस खूप पातळ झाले म्हणून वैतागलात? बदला ५ चुकीच्या सवयी

ठळक मुद्देदर दोन महिन्यांनी केस खालच्या बाजुने कापायला हवेत. त्यामुळे त्यांचे गळण्याचे प्रमाण कमी होते. केसगळती कमी करायची असेल तर केसांना उष्णता देणारी यंत्रे योग्य त्या प्रमाणात वापरणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. 

केस हे आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक असतात. म्हणूनच आपले केस दाट, काळेभोर आणि लांबसडक असावेत असे प्रत्येक महिलेला वाटते. पण कधी प्रदूषणामुळे तर कधी रासायनिक उत्पादनांच्या अतिवापरामुळे केसांची पार वाट लागते. अनेकदा आपण खात असलेल्या अन्नपदार्थांमधून शरीराचे आणि केसांचे पुरेसे पोषण होत नाही आणि मग केसांच्या तक्रारींना सुरुवात होते. कधी केसांत खूप कोंडा होतो तर कधी केस पांढरे होतात. (How To Stop Hair fall) कधी अचानक केस खूप गळायला लागतात आणि खूप पातळ होऊन जातात. केस एकाएकी खूप गळायला लागले की त्यामागचे नेमके कारण आपल्या लक्षात येत नाही आणि मग आपली चिडचिड सुरू होते. पण आपल्याला असलेल्या चुकीच्या सवयींमुळे आपले केस जास्त प्रमाणात गळतात. पाहूयात अशा कोणत्या ५ सवयी बदलल्यामुळे आपले केस दाट आणि जाड होऊ शकतात. 

(Image : Google)

१. चुकीचा आहार

आपण अनेकदा खूप मसालेदार, तेलकट पदार्थ खातो. त्याचा आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. जंक फूड खाण्याचे प्रमाणही सध्या वाढलेले असून त्यातून आपले पोट भरते पण पोषण मिळत नाही. त्यामुळे केसांचा पोत खराब होतो आणि ते गळतात. वाढलेले वजन, थायरॉईड यांसारख्या समस्यांमुळेही केस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहाराच्या पद्धतींमध्ये बदल करणे आरोग्याच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. 

२. केस घट्ट बांधणे 

अनेकदा आपल्याला खूप घाम येतो किंवा काम करताना केस मधे येतात म्हणून आपण रबरने केस खूप घट्ट बांधतो. असे केल्याने केस ओढले जाण्याची आणि तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांचा भांग, ते बांधण्याची पद्धत ठराविक काळाने बदलायला हवी. तसेच आपण कोणत्या प्रकारच्या रबरने केस बांधतो याचे भान राखायला हवे. त्यामुळेही केस तुटण्याचे प्रमाण आटोक्यात येऊ शकते.

३. ताण 

ताणाचा आपल्या मनावर आणि शरीरावर परिणाम होत असल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी ताण घेणे अजिबात चांगले नसते. ताणामुळे आपल्या हार्मोन्समध्ये वेगाने बदल होतात आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे केस गळण्यास किंवा तुटण्यास ताणतणाव हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. 

४. इलेक्ट्रॉनिक यंत्रांचा अतिपावर

कधी केस वाळवण्यासाठी तर कधी केस सरळ करण्यासाठी आपण इलेक्र्टॉनिक यंत्रांचा वापर करतो. घाईच्या वेळी अशा यंत्रांचा वापर करणे योग्य असले तरी त्यामुळे भविष्यात केसांवर चुकीचे परिणाम होतात. सतत इलेक्ट्रॉनिक यंत्रे वापरल्याने केसांची हानी होते आणि केस जास्त प्रमाणात गळणे, तुटणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे केसगळती कमी करायची असेल तर केसांना उष्णता देणारी यंत्रे योग्य त्या प्रमाणात वापरणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. 

(Image : Google)

५. केस नियमित ट्रीम न करणे 

आपले केस दररोज वाढत असतात. केस जास्त वाढले तर त्याचा केसांच्या मूळांवर ताण येतो आणि ते गळायला लागतात. यासाठी केस नियमितपणे ट्रीम करणे हा एक उत्तम उपाय आहे. दर दोन महिन्यांनी केस खालच्या बाजुने कापायला हवेत. त्यामुळे त्यांचे गळण्याचे प्रमाण कमी होते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीलाइफस्टाइल