उन्हाळ्याचा ऋतू म्हटलं की अंगावर येणाऱ्या घामोळ्या हे कायम ठरलेलं समीकरण आहे. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे आणि होणाऱ्या गरमी मुळे आपल्याला अंगावर बारीक लाल लाल रॅशेज येऊन पुरळ येतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्या तापदायक वाटतात. या ऋतूमध्ये अन्य आजारांसह गंभीर स्वरुपात त्वचा विकारांचाही सामना करावा लागतो. कितीही काळजी घेतली तरी घामोळ्यांमुळे जीव अक्षरशः हैराण होतो. संपूर्ण शरीरावर लालसर पुरळ आल्यानं असह्य त्रास होतो. गरम-दमट हवेमुळे शरीराला जास्त प्रमाणात घाम येतो. काही कारणांमुळे शरीरातील विषारी पदार्थ घामाद्वारे पूर्णतः बाहेर फेकले जात नाहीत. यामुळे घामोळ्या, लाल पुरळ शरीरावर येतात.
घामोळ्यांची समस्या टाळण्यासाठी शारीरिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा विकार गंभीर होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात उष्ण-दमट हवामानामुळे भरपूर प्रमाणात घाम येतो. यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात. यामुळे शरीरावर लालसर रंगाचे पुरळ येतात. घामोळ्यांमुळे त्वचेवर जळजळ होणे, खाज सुटणे अशा समस्या उद्भवतात. पाठ, छाती, हात, कंबर, मानेवर जास्त प्रमाणात घामोळ्याचा त्रास होतो. योग्य काळजी घेतली तर शरीरावर घामोळे येणार नाहीत. पण याकडे दुर्लक्ष केल्यास भर उन्हाळ्यात अंगावर घामोळ्या येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल(How to stop prickly heat and heat rash from ruining your summer).
घामोळ्या येऊ नयेत म्हणून लक्षात ठेवा ५ टिप्स :-
१. शरीराचे तापमान थंड ठेवा :- शक्यतो अंगावर येणाऱ्या घामोळ्या या शरीराला येणाऱ्या घामामुळेच निर्माण होतात. आपल्या शरीरातील बॉडी हिटमुळे आपल्याला घामोळ्या येण्याचे प्रमाण वाढू शकते. घामोळ्या येणे थांबवायचे असल्यास आपल्या शरीराला आतून व बाहेरुन थंड ठेवणे गरजेचे असते. उन्हाळ्यात घामोळ्या येऊ नयेत म्हणून शरीराला जास्तीत जास्ती आतून हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या शरीराला आतून हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाण्यासोबतच वेगवेगळ्या फळांचे व भाज्यांचे रस पिण्याला प्राधान्य द्यावे. वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची सरबत आणि रसदार फळ खाण्यावर जास्त भर द्यावा. यामुळे आपल्या शरीरात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखली जाऊन आपल्या शरीराचे तापमान थंड ठेवण्यास मदत होते.
कोरफड म्हणजे उन्हाळ्यात वरदान, ७ प्रकारे कोरफड वापरा- उन्हामुळे होणारे त्रास होतील पटकन कमी...
२. कॉटनचे सैल कपडे घालावेत :- उन्हाळ्यात शक्यतो अंगाला फिट बसतील असे कपडे घालणे टाळावे. उन्हाळ्यात अंगाला फिट बसतील किंवा चिकटतील असे कपडे घातल्याने शरीराच्या त्या भागाला पुरेशी हवा न लागल्यामुळे त्या भागावर घाम येऊन घामोळं येऊ शकते. आपल्या शरीराला प्रामुख्याने हात, मानेखाली, पाठीवर अशा भागांवर घामोळं जास्त येत. हे टाळण्यासाठी हवेशीर कपडे घालावेत. घट्ट कपडे घालणे टाळा. उन्हाळ्यात नेहमी कॉटनचे कपडे घालावेत, कॉटनचे कापड हे मऊ व सुती असल्यामुळे ते शरीरावरील अतिरिक्त घाम शोषून घेते. कॉटनच्या कपड्यांमुळे घाम लगेच सुकतो आणि शरीरालाही थंडावा मिळतो. सिंथेटिक कपडे परिधान केल्याने घाम सुकत नाही आणि तो बराच वेळ शरीरावर राहिला तर पुरळ आणि खाज येण्याचे कारण बनते.
३. शरीर ओले ठेवू नका :- आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा शरीर ओले ठेवू नका, नेहमी व्यवस्थित कोरडे करा कारण जेव्हा शरीर ओले राहते तेव्हा ते जीवाणू आणि जंतूंचे घर बनते आणि त्यामुळे उष्माघाताचा धोका कायम राहतो.
४. थंड पाण्याने आंघोळ करा : - उन्हाळ्यात नेहमी थंड पाण्याने आंघोळ करा आणि व्यायाम किंवा बाहेरुन फिरुन आल्यानंतर दिवसातून दोन वेळा अंघोळ करायला विसरू नका. आंघोळ केल्याने तुमच्या शरीरावर साचलेला घाम निघून जाईल आणि अंगावर घामोळ्या येण्याचा धोका कमी होईल.
५. त्वचा एक्सफोलिएट करणे : - अनेकदा उन्हाळ्यात लोकांच्या कपाळावर घामोळ्या येतात. जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा धूळ आणि घाण त्वचेवर चिकटते आणि ही धूळ व घाण त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकून बसते. अशा स्थितीत आंघोळ करताना आपल्या हातांनी त्वचेला एक्सफोलिएट करा, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ओट्स किंवा बेसन सारख्या काही घरगुती वस्तू लावून देखील एक्सफोलिएट करू शकता, ज्यामुळे त्वचेवर साचलेली घाण बाहेर पडते आणि तुमची त्वचा निरोगी दिसते.
ऐन तारुण्यात कपाळावर आठ्यांचं जाळं-सुरकुत्या दिसू लागल्या आहेत? ५ सोपे उपाय, सुरकुत्या होतील कमी...
उन्ह्याळात घामोळ्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणखी काही सोपे उपाय :-
१. शरीराच्या ज्या भागावर घामोळे आले आहे त्या भागावर बर्फाचा पॅक लावा. यामुळे त्वचेला बाहेरुन थंडावा मिळतो आणि खाज सुटण्यापासून शरीराला आराम मिळतो.
२. चंदन पावडर आणि गुलाब पाण्याची पेस्ट थेट घामोळ्यांवर लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि घामोळ्यांमुळे होणाऱ्या रॅशेज पासून आराम मिळतो.
३. कडुलिंबाची पाने बारीक करून घामोळ्यांवर लावता येते. कडुनिंबाच्या पानांची पावडर पेस्ट करुन लावल्यास घामोळ्यांपासून त्वचेचे संरक्षण करता येते.
४. मुलतानी माती घामोळ्यांच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. घामामुळे त्वचेवरील बंद झालेली छिद्रे मुलतानी मातीमुळे मोकळी होतात. यातील दुर्गंध, विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. यातील पोषक तत्त्वांमुळे त्वचा फ्रेश होण्यास मदत मिळते. जीवघेण्या उकाड्यामध्ये मुलतानी मातीचा वापर केल्यास त्वचेला थंडावा मिळतो.
५. शरीराची होणारी जळजळ आणि खाज सुटण्याची समस्या पपईतील औषधी गुणधर्मांमुळे कमी होते. पपईच्या गरामुळे त्वचा एक्सफोलिएट होते.