केसांना कलर करणे ही गेल्या काही वर्षातली फॅशन झाली आहे. पूर्वी केसांना मेहंदी लावून रंगवले जायचे. त्यानंतर ब्राऊन, बरगंडी असे नॅचरल शेडमधले रंग वापरुन केस रंगवले जायला लागले. मात्र आता अगदी हिरवा, पिवळा, लाल अशा वेगवेगळ्या रंगांनी केस रंगवले जातात. तरुणांमध्ये अशाप्रकारे केस कलर करण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत आहे. पार्लरमध्ये यासाठी बरीच गर्दी होत असून विविध ब्रँडचे कलर हे केस रंगवण्यासाठी आवर्जून वापरले जातात (How To Take Care Of Your Hair Color Hair Care Tips).
हजारो रुपये देऊन केली जाणारी ही ट्रीटमेंट किमान काही काळ टिकावी अशी आपली अपेक्षा असते. पण काहीवेळा केसांना केलेला कलर लगेचच निघून जातो आणि केस पहिल्यासारखे दिसायला लागतात. कधी कधी कलर केल्यानंतर केस आधीपेक्षा जास्त रफ दिसतात. पण केसांना केलेला कलर जास्त काळ टिकावा यासाठी आवर्जून करायला हव्यात अशा ४ गोष्टी पाहूया...
१. केमिकल फ्री शाम्पू वापरा
आपण वापरत असलेल्या शाम्पूमध्ये जास्त प्रमाणात केमिकल्स असतील तर केसांचा कलर निघून जाण्याची शक्यता असते. अमोनिया, सल्फेट हे घटक केसांचा कलर निघून जाण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे केसांचा कलर निघून जाऊ नये यासाठी शक्यतो केमिकल फ्री किंवा केराटीन प्रोटीन असलेले शाम्पू वापरा.
२. केस कमीत कमी वेळा धुवा
कलर केलेले केस सतत धुणे योग्य नाही. कारण त्यामुळे केसांचा रंग लवकर निघून जाण्याची शक्यता असते. तसेच यामुळे केसांतील नैसर्गिक तेल कमी होते आणि केस खूप कोरडे आणि निर्जीव होतात. म्हणून कलर केलेले केस दररोज किंवा एकदिवसा आड धुणे टाळावे.
३. सूर्यप्रकाशात जाऊ नये
सूर्याची अतिनील किरणे कलर केलेल्या केसांसाठी घातक असतात. या केसांवर ही किरणे पडल्यास केसांचा रंग लवकर खराब होतो, तसेच केस रुक्ष होतात. त्यामुळे केस कलर केले असतील तर थेट उन्हात उभे राहू नये. केसांवर टोपी, स्कार्फ असे काही ना काही असायला हवे.
४. हेअर मास्क आणि कंडीशनर
केसांना लावल्या जाणाऱ्या रंगांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. त्यामुळे केसांचा नैसर्गिक पोत खराब होण्याची शक्यता असते. मात्र तसे होऊ नये आणि केस चांगले राहावेत यासाठी केसांना नियमितपणे हेअर मास्क आणि कंडीशनर लावायला हवे. त्यामुळे केस चमकदार आणि मुलायम राहण्यास मदत होईल.