पायांना भेगा पडणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. भेगा पडल्या की आपले पाय खूप खराब दिसतात. इतकेच नाही तर या भेगांमध्ये माती अडकते, तर कधी या भेगांची आगही होते. काही वेळा या भेगा इतक्या वाढतात की एखादं क्रिम लावलं किंवा काही घरगुती उपाय केले तरी यापासून आराम मिळत नाही. भेगा पडण्याची अनेक कारणे असतात. अनुवंशिकता, त्वचेचा कोरडेपणा, सतत पाण्यात काम करणे, चुकीची पादत्राणे यांमुळे भेगा पडतात आणि त्या वाढतातही. आरोग्याच्या दृष्टीने हे फारसे चांगले नसतेच त्याचप्रमाणे भेगांमुळे सौंदर्यातही बाधा येते (How To Take Care Of Cracked Heels).
अनेकदा बाजारातील महागडी क्रिम्स वापरली तरी त्याचा म्हणावा तितका परीणाम होतोच असं नाही. अशावेळी या भेगा कमी करण्यासाठी नेमका काय उपाय करावा असा प्रश्न आपल्याला पडतो. थंडीच्या दिवसांत तर ही समस्या जास्त वाढत असल्याने त्यासाठी काही ना काही उपाय करावाच लागतो. प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पायांना असलेल्या भेगा जाण्यासाठी काही सोपे उपाय सांगतात. नियमितपणे या उपायांचा वापर केल्यास या भेगा कमी होण्यास निश्चितच मदत होते.
१. कोमट पाण्यात पाय १० मिनीटांसाठी बुडवून ठेवावेत. यामुळे पायांचा कोरडेपणा दूर होतो आणि त्वचेला ओलावा मिळून त्वचा मऊ राहण्यास मदत होते.
२. पायांना हळूवारपणे मसाज करावा जेणेकरुन पायांची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर पाय नॅपकीनने कोरडे करुन घ्यावेत.
३. युरीया आणि लॅक्टीक अॅसिड असलेली क्रिम पायांना ज्याठिकाणी भेगा आहेत तिथे लावावीत. यामुळे टाचांच्या जाडसर त्वचेला मॉईश्चरायजिंग मिळण्यास मदत होते.
४. झोपताना न विसरता कॉटनचे सॉक्स घालून झोपायला हवे.
५. पाय स्वच्छ दिसावेत यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन पेडीक्यूअर ट्रीटमेंट करतो. पण यामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त प्रमाणात केमिकल्स असलेली उत्पादने वापरणे टाळा.
६. शक्यतो बंद अशी पादत्राणे वापरा आणि जास्त प्रमाणात मातीत पाय राहणार नाहीत याची काळजी घ्या.