Join us  

चेहरा-ओठ अचानक कोरडे पडायला लागले, ओठांना भेगा पडल्या? करा फक्त ३ गोष्टी, ओठ होतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 10:09 AM

How To Take Care Of Dry Skin : त्वचा मुलायम राहण्यासाठी करता येईल याविषयी...

राज्यभरात गेल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका कमी झाला असून ऊन वाढायला लागलं आहे. उकाडा पूर्णत: सुरू झाला नसला तरी काहीशी कोरडी हवा असल्याने वातावरणात एकप्रकारचा कोरडेपणा आला आहे. या ऋतू बदलाचा परीणाम आपल्या आरोग्यावर होतो. विशेषत: त्वचेवर याचा परीणाम दिसायला लागतो. इतके दिवस फारशी कोरडी न पडणारी त्वचा एकाएकी रखरखीत आणि रुक्ष व्हायला लागते. म्हणूनच अशावेळी त्वचेची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवे. त्वचा कोरडी पडते म्हणून आपण काही उपाय केले आणि त्याचा उलटा परीणाम त्वचेवर झाला तर मात्र आपली आणखी चिडचिड होण्याची शक्यता असते. पाहूया घरच्या घरी त्वचा मुलायम राहण्यासाठी करता येतील असे उपाय (How To Take Care Of Dry Skin)...

(Image : Google)

१. ओठांची काळजी

ओठ खूप कोरडे पडतात म्हणून आपण नकळत ओठांवरुन जीभ फिरवतो. पण असे केल्याने ओठ आहेत त्याहून जास्त कोरडे पडतात. त्यामुळे ओठांवरुन जीभ न फिरवता त्याला चांगल्या प्रतीचे लिप बाम लावायला हवे. ते नसेल तर लोणी, तूप यांचाही चांगला उपयोग होतो. याशिवाय लिपस्टीक लावत असू तर ती चांगल्या कंपनीची आणि चांगल्या प्रतीची असायला हवी. 

२. मॉईश्चरायजरचा वापर 

चेहरा कोरडा पडतो म्हणून आपण अनेकदा चेहऱ्याला सारखे मॉईश्चरायजर लावतो. मात्र त्यामुळे चेहऱ्याची त्वचा मुलायम होत नसल्याचे आपल्या लक्षात येते. त्यामुळे चेहरा नरम राहावा असे वाटत असेल तर आंघोळीनंतर चेहरा ओलसर असताना आणि रात्री झोपताना अवश्य मॉईश्चरायजर लावायला हवे. 

(Image : Google)

३. मेकअप

आपण वापरत असलेल्या मेकअपच्या उत्पादनांमध्ये काही ना काही रासायनिक घटक असतात. अनेकींना नुसतं ऑफीसला जातानाही चेहऱ्याला मेकअप करायची सवय असते. मेकअपच्या विविध प्रकारच्या उत्पादनांमुळे चेहरा जास्त कोरडा आणि रुक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य असल्यास मेकअप टाळलेला केव्हाही चांगला. अन्यथा आपल्या चेहऱ्याला सूट होतील अशी उत्पादने वापरायला हवीत. तसेच मेकअप केल्यानंतर तो पूर्णपणे स्वच्छ करुन मगच झोपायला हवे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी