Join us  

रोज फक्त सोप्या ४ गोष्टी करा; थंडीत त्वचेचा कोरडेपणा, रखरखीतपणा, खाज होईल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 12:53 PM

How to Take Care Of Dry Skin in Winter : प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल काही महत्त्वाच्या टिप्स देतात.

ठळक मुद्देमॉईश्चरायजर लावताना आपली त्वचा ओलसर असेल याची काळजी घ्या. नुसतं मॉईश्चरायजर लावून काही होत नाही, तर त्वचा कोरडी पडू नये म्हणून काही बदल अवश्य करायला हवेत.

थंडीच्या दिवसांत बहुतांश जणांना उद्भवणारी समस्या म्हणजे त्वचा कोरडी पडणे. हवेत गारठा वाढला की हवेतील, शरीरातील आर्द्रता कमी होते आणि त्वचा कोरडी पडायला लागते. अनेकदा ही त्वचा इतकी कोरडे पडते की आपल्याला सगळीकडे खाज यायला लागते. मग आपण त्वचेला तेलाने मसाज करणे, मॉईश्चरायजर लावणे असे करुन जास्तीत जास्त मऊ ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा उपयोग होतोच असे नाही. काही वेळा त्वचा इतकी कोरडी पडते की खाजवल्यावर त्वचेचा पांढरा कोंडाही पडतो. अशावेळी नेमकं काय करायला हवं याविषयी प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल काही महत्त्वाच्या टिप्स देतात. कोणत्या सोप्या उपायांनी या समस्येवर मात करता येईल याविषयी त्या अगदी सोप्या टिप्स शेअर करतात. आपल्या दैनंदिन जीवनशैलीत हे बदल केल्यास त्वचा कोरडी होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो (How to Take Care Of Dry Skin in Winter). 

(Image : Google)

१. शॉवरपेक्षा बादलीने आंघोळ करा

तुम्ही नेहमी शॉवरने आंघोळ करत असाल तर तो वेळ कमी करा. तुमची त्वचा जास्तच कोरडी असेल तर तर बादलीने आंघोळ करा आणि बादलीतील पाण्यात ८ ते १० चमचे खोबरेल तेल घालून ते पाणी अंगावर घ्या. 

२. साबण लावणे टाळा

साबणामुळे त्वचा जास्त कोरडी पडते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत अंगाला रोजच्या रोज साबण लावणे टाळा. आठवड्यातून केवळ १ किंवा २ वेळाच अंगाला साबण लावा. दररोज केवळ काखेत आणि मांडीच्या आतल्या भागाला साबण लावा कारण त्याठिकाणी घाम येतो. 

३. स्कीन केअर रुटीन बदला 

आपण वापरत असलेल्या स्कीन केअर प्रॉडक्टसमध्ये सॅलिसिलिक अॅसिड आणि ग्लायकोलिक अॅसिड यांसारख्या घटकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा आणखी कोरडी होते. त्यापेक्षा हे घटक असलेली उत्पादने वापरणे टाळा किंवा त्यासोबत सौम्य स्वरुपाची सिरम वापरा. 

४. मॉईश्चरायजरची निवड योग्य करा 

ज्या मॉईश्चरायजरमध्ये सिरॅमाइड्स, कोलोइडल ओटमील, शिया बटर, कोकोआ बटर किंवा ग्लिसरीन आहेत असे मॉइश्चरायझर हिवाळ्याच्या दिवसांत चांगले काम करतात. तसेच मॉईश्चरायजर लावताना आपली त्वचा ओलसर असेल याची काळजी घ्या.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी