केस विंचरणे हे दिवसभरातील एक महत्त्वाचे काम आहे. दात घासणे, आंघोळ करणे याप्रमाणेच केस स्वच्छ विंचरुन त्यातील गुंता काढणे हेही एक आवश्यक असलेले काम आहे. महिलांना तर या कामासाठी बऱ्यापैकी वेळ जातो. ज्यांचे केस मोठे आहेत त्यांना केस विंचरण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. इतकेच नाही तर खूप कुरळे किंवा कोरडे केस असतील तर तुलनेने त्यात जास्त पटकन गुंता होतो. हा गुंता कितीही वेळा काढला तरी केस विंचरल्यासारखेच वाटत नाहीत. काही वेळा केस खूप जास्त प्रमाणात गळत असल्याची किंवा रुक्ष होत असल्याची तक्रार महिला करताना दिसतात. पण केस विंचरण्याची चुकीची पद्धत हे त्यामागील महत्त्वाचे कारण असते हे लक्षात घ्यायला हवे (How To take Care of Hair While Combing).
केस विंचरणे ही एक कला किंवा पद्धत आहे. त्या योग्य पद्धतीने ते विंचरले तर ते कमी प्रमाणात गळतात किंवा चांगले राहण्यास मदत होते. केस योग्य पद्धतीने विंचरले तर ते जास्त चांगले राहतात आणि आपल्याला त्याच्या विविध प्रकारच्या हेअरस्टाइल्स करता येतात. केस मागच्या बाजुने विंचरु नयेत, जोरजोरात विंचरु नयेत, बारीक दाताच्या कंगव्याने विंचरु नयेत अशा बऱ्याच गोष्टी आपण नियमितपणे ऐकत असतो. कारण या गोष्टींमुळे केसांचे जास्त प्रमाणात नुकसान होते. पण मग केस विंचरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी समजून घेऊया...
१. केस विंचरताना ते स्वच्छ आणि कोरडे असायला हवेत
केस विंचरताना ते स्वच्छ आणि कोरडे असणे अतिशय महत्त्वाचे आहे. खराब किंवा तेलकट केस मागच्या बाजुने विंचरले तर केस खराब होण्याची शक्यता असते. तसेच तेलकट आणि खराब झालेले केस मागच्या बाजुने विंचरले तर केस छान फुलल्यासारखे दिसत नाहीत.
२. सेक्शन करुन विंचरावेत
तुम्हाला केस मागच्या बाजुने विंचरायचे असतील तर ते आहेत तसेच न विंचरता त्याचे लहान लहान भाग करुन मग ते विंचरायला हवेत. असे केल्याने केस खराब होण्यापासून वाचतात. एकदम केसांचा मोठा भाग विंचरायला गेलो तर ते तुटण्याची किंवा गळण्याची शक्यता जास्त असते.
३. ब्रशची निवड करताना
केस विंचरण्यासाठी योग्य पद्धतीच्या कंगव्याचा वापर करणे अतिशय गरजेचे असते हे लक्षात ठेवायला हवे. मागच्या बाजुचे केस विंचरण्यासाठी वेगळ्या प्रकारचे कंगवे बाजारात मिळतात त्यांचा वापर करायला हवा. ब्रश वापरत असाल तर तो योग्य पद्धतीचा असेल याची काळजी घ्यावी. मेटल ब्रशचा वापर करणे टाळावे, कारण त्यामुळे केस खराब होण्याचीच शक्यता जास्त असते.
४. हलक्या हाताने केस विंचरणे महत्त्वाचे
मागच्या बाजुने केस विंचरताना आपण घाईत असलो तर जोरजोरात विंचरतो. मात्र असे करणे योग्य नाही यामुळे केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते. केस विंचरताना ते शक्यतो हलक्या हाताने विंचरलेलेच केव्हाही जास्त चांगले. लहान लहान स्ट्रोक घेऊन केसांतला गुंता काढावा. त्यामुळे केस तुटणार नाहीत आणि गळण्याचे प्रमाणही कमी होईल.