ऋतूबदल झाला की निसर्गात बदल होतो, त्याचा आपल्या आरोग्यावर ज्याप्रमाणे परिणाम होतो, त्याचप्रमाणे आपली त्वचा, केस यांच्यावरही त्याचा परिणाम होतो. ऋतूनुसार आपण आहारात बदल करतो त्याचप्रमाणे आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेतानाही आपण ब्यूटी रुटीनमध्ये बदल करायला हवा. पावसाळ्याच्या दिवसांत हवेतील दमटपणामुळे कधी केस खूप कोरडे होतात आणि गळायला लागतात. तर कधी या दिवसांत केस खूप चिपचिपीत होऊन तुटतात. केस गळायला लागले की आपल्याला टेन्शन यायला लागते. कारण आधीच पातळ असलेले केस आणखी पातळ व्हायला लागतात. मग केस विरळ झाले की त्याची कोणतीही हेअरस्टाइल केली तरी ती चांगली दिसत नाही. अशावेळी आपण कधी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट घेतो तर कधी केमिकल उत्पादने वापरुन केस रिपेअर होण्यासाठी प्रयत्न करतो (Hair Care Tips). पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. केसांचा पोत चांगला असावा यासाठी आनुवंशिकता, आहारातून मिळणारे पोषण, प्रदूषण, केसांवर केल्या जाणाऱ्या ट्रिटमेंटस, हवामान अशा सगळ्यांचाच परिणाम होत असतो. त्यामुळे पावसाळ्यात केसांचे गळणे कमी व्हावे असे वाटत असेल तर नेमके कोणते उपाय करावेत याविषयी (How To Take Care of Your Hair Fall In Monsoon)...
१. तेल लावताना लक्षात ठेवा
आपण शाम्पू करण्याआधी नेहमी केसांना तेलाने चांगला मसाज करतो. केसांचे पोषण व्हावे यासाठी केसांना नियमित तेल लावणे गरजेचे असते हे जरी खरे असले तरी हे तेल लावताना कोणत्या पद्धतीने, कसे लावायचे याबद्दल आपल्याला योग्य ती माहिती असायला हवी. केस घनदाट आणि चांगले व्हावेत यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि खोबरेल तेल एकत्र करुन ते थोडेसे कोमट करुन त्याने केसांना चांगला मसाज करायला हवा. यामुळे केसांचे गळणे काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा केल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो.
२. आवळ्याचा वापर गरजेचा
आवळा हा सी व्हिटॅमिनचा उत्तम स्त्रोत असतो. सी व्हिटॅमिन हे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त असल्याने आहारात आवळ्याचा वापर करावा असे आपण नेहमी ऐकतो. त्याचप्रमाणे आवळ्यामध्ये केसांच्या आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त गुणधर्म असतात. केसगळती कमी व्हावी तसेच केसांचा पोत सुधारावा यासाठी आवळे किंवा आवळ्याची पावडर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने केस धुवावेत.
३. जास्वंद ठरते उपयुक्त
जास्वंद हे केसांसाठी अतिशय उपयुक्त असे फूल असून केसांचा पोत सुधारण्यास तसेच केसांची वाढ होण्यास जास्वंदाचे तेल, जास्वंदाचा हेअर पॅक आवर्जून वापरायला हवा. जास्वंदाच्या फुलाची पावडर आयुर्वेदीक दुकानामध्ये मिळू शकते. किंवा घरीही आपण या फुलांची पेस्ट तयार करु शकतो. जास्वंदाचा हेअर पॅक नियमितपणे काही दिवस लावल्यास केसगळती कमी होते आणि केसांचा दाटपणा वाढण्यास मदत होते.
४. केस बांधताना आणि विंचरताना लक्षात ठेवा
केस विंचरताना ते हळूवारपणे विंचरणे आवश्यक असते. आपले केस नाजूक असतील आणि आपण घाईत ते जोरजोरात विंचरले तर केस तुटण्याची शक्यता असते. तसेच ओले केस अजिबात विंचरु नयेत, अन्यथा ते जास्त प्रमाणात गळतात. त्यामुळे केस कोरडे करुन मगच ते विंचरायला हवेत. तसेच केस बांधताना ते हळूवारपणे बांधायला हवेत. केस खूप ओढून घट्ट बांधले तरी त्यांच्या मुळांना इजा पोहोचते आणि ते गळण्याचे प्रमाण वाढते.