Join us  

उन्हाळ्यात घामाने केस चिपचिपे होतात? तज्ज्ञ सांगतात, अशी घ्या काळजी, केस राहतील दाट-मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 1:04 PM

How To Take Care Of Your Hair In Summer : उन्हाळ्यातही केस दाट-मुलायम राहावेत यासाठी..

उन्हाळ्याच्या दिवसांत केसांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे घामाने केस चिकट होतात आणि चिपचिपेही होतात. एकदा केस चिकट झाले की ते धुण्याशिवाय काहीच पर्याय नसतो, पण सतत केस धुणे शक्य नसते. अशावेळी केसांची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न आपल्याला निश्चितच पडला असेल. तर चिकट झालेल्या केसांमुळे खाज सुटणे, कोंडा होणे, केस गळणे अशा समस्या निर्माण होतात. अशावेळी केसांची काळजी घेण्यासाठी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यासाठीच काही सोप्या टिप्स सांगतात, त्या कोणत्या पाहूया (How To Take Care Of Your Hair In Summer)...

१. तेलाने मसाज

जास्वंद, आवळा, खोबरं, कडीपत्ता, ब्राम्ही यांसारख्या थंडावा देणाऱ्या तेलाने केसांना मसाज करा. केसांचे चांगले पोषण व्हायचे असेल तर आठवड्यातून केवळ १ किंवा २ वेळाच केसांना तेलाने मसाज करायला हवा. 

(Image : Google)

२. आवळा खा

प्रमाणापेक्षा जास्त केसगळती होत असेल तर आवळ्याचा आहारात समावेश करायला हवा. आवळा कँडी, आवळा सरबत आहारात घ्या. तसेच केसांना आवळ्याची पावडर हेअर मास्क म्हणून लावू शकता. 

३. कोरफडीचा गर लावा

केस धुण्याआधी ३० मिनीटे केसांना कोरफडीचा गर लावून ठेवा. यामुळे केस नैसर्गिकरित्या मुलायम होण्यास मदत होईल. 

४. जास्वंद गुलाब चहा 

जास्वंद आणि गुलाब या दोन्हीमध्ये थंडावा देणारे घटक असतात. त्यामुळे केसांचे चांगले पोषण आणि वाढ व्हावी यासाठी या दोन्हीचा चहा अवश्य प्या. 

५. तांदळाचे पाणी 

तांदूळ केसांसाठी अतिशय उपयुक्त असतो. त्यामुळे केसांना २० मिनीटे तांदळाचे पाणी लावून ठेवा आणि मगच केस धुवा. यामुळे केस मुलायम होण्यास मदत होईल 

६. हेअर मास्क

हेअर मास्क लावल्याने केसांना पोषण मिळण्यास मदत होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा केसांना नैसर्गिक स्वरुपाचे हेअरमास्क लावा. यामध्ये तुम्ही आवळा, जास्वंद, कडुलिंब, कोरफड, दही अशा नैसर्गिक घटकांचा वापर करु शकता. 

७. योग-प्राणायाम 

अनुलोम-विलोम, भ्रामरी, शितली, शितकारी यांसारखे प्राणायाम प्रकार केल्याने शरीरातील पित्त कमी होते. त्यामुळे केस पांढरे होण्याचे प्रमाणही कमी होते. 

८. नस्य 

रात्री झोपताना रोज न चुकता २ थेंब गायीचे तूप नाकपुडीत घाला. त्याचा शरीराला आणि केसांना अतिशय चांगला फायदा होण्यास मदत होईल.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी