केस हे आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक असतात. ते छान सिल्की-शायनी असावेत आणि मस्त दिसावेत यासाठी आपण सतत काही ना काही प्रयत्न करत असतो. केस वाढले की खालच्या बाजुने ते थोडे रुक्ष होत जातात. हे रुक्ष झालेले केस खराब दिसतात आणि त्यामुळे केसांची वाढही खुंटते. हा रुक्षपणा आणि केसांचे फाटे कमी व्हावेत यासाठी दर २ किंवा ३ महिन्यांनी आपण ते ट्रिम करतो. इतकेच नाही तरकाही वेळा केस वाढताना वेडेवाकडे वाढतात आणि नंतर ते मागच्या बाजुने पाहताना खराब दिसतात (How To Trim Hair at Home).
आपल्याला दरवेळी हेअरकट करायचाच असतो असं नाही. तर फक्त खालच्या बाजुने वाढलेले केस ट्रिम करायचे असतात. पार्लरमध्ये जाऊन आपण ४०० ते ५०० रुपये खर्च करतो. मात्र यासाठी कात्री घेतली आणि अंदाजे केसांवरुन फिरवली असे करुन चालत नाही. तर एक सोपी ट्रिक वापरुन आपण घरच्या घरी केस ट्रिम करु शकतो. घरी ट्रिम करायचे म्हणजे ते वेडेवाकडे कापले जातील की काय, काही बिघडणार तर नाही ना असे प्रश्न आपल्याला पडतात. पण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण ५ मिनीटांत हेअर ट्रिमिंग करण्याची ही सोपी पद्धत पाहूया...
हेअर ट्रिमिंगच्या स्टेप्स...
१. मध्यभागी भांग पाडून केसातला गुंता व्यवस्थित काढून घ्यायचा. मग दोन भागात विभागायचे आणि खांद्यावरुन पुढे घ्यायचे.
२. त्यानंतर हनुवटीच्या खाली दोन्ही बाजुचे केस एकत्र करुन त्याला १ रबरबँड बांधायचे.
३. थोड्या अंतरावर पुन्हा १ किंवा २ वेळा रबरबँड बांधायचे. म्हणजे केस वर-खाली न होता एकाच रेषेत नीट राहतील.
४. त्यानंतर खाली जितके केस कापायचे ते एका रेषेत पकडायचे आणि कात्रीने कापायचे.
५. आता केसांना बांधलेले रबरबँड काढून टाकल्यावर ते एका सरळ रेषेत कापले गेल्याचे दिसेल.
६. अशाप्रकारे कोणाच्याही मदतीशिवाय, अजिबात पैसे खर्च न करता आपण घरच्या घरी केस सहज ट्रिम करु शकतो.