बीट म्हणजे सॅलेडमधील एक महत्त्वाचा घटक. लालचुटूक रंगाचे बीट आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने आपण त्याचा आवर्जून आहारात समावेश करतो. आपण त्याची कधी किसून कोशिंबीर करतो तर कधी फोडी करुन कच्चे खातो. कधी बीटाचे कटलेट करतो तर कधी आणखी काही. बीटामध्ये भरपूर प्रमाणात फोलेट जे पेशींची वाढ होण्यास आणि चांगले कार्य करण्यास मदत करते. रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यात फोलेट महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. बिटामध्ये मोठय़ा प्रमाणावर लोह, ब 1, ब 2 आणि क जीवनसत्त्व असतात. पोटॅशिअम, मॅंग्नीज, फॉस्फरस, सिलिकॉनसारखी खनिजं असतात (How To Use Beetroot for Skincare).
कमी कॅलरीज असलेल्या बिटात सहज पचवता येतील असे कार्बोहायड्रेटस असतात. आपल्या आहारात जर बीट नियमित असेल तर रक्तातील हिमोग्लोबीन, पेशींमधील ऑक्सिजन यांची वाढ होते. बिटात डी आणि अल्फा अमिनो अँसिड असतात. शिवाय बिटामध्ये फ्लेवोनॉइड आणि कॅरेटोनॉइड्ससारखी अँण्टिऑक्सिडंट्सही असल्यानं बिटाच्या सेवनानं शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. असं हे सर्वगुणसंपन्न बीट सौंदर्योपचारातही अतिशय उपयुक्त असतं. त्वचा ग्लोईंग दिसण्यासाठी आणि त्वचेच्या समस्या दूर होण्यासाठी बीटाचा फेसपॅक कसा उपयुक्त ठरतो आणि तो कसा करायचा ते पाहूया...
टॅनिंग घालवण्यासाठी स्क्रब
१. एका बाऊलमध्ये २ चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्यात २ चमचे दही घालायचे.
२. यामध्ये १ चमचा मध आणि २ चमचे बीटाचा रस आणि लिंबाचा रस घालायचा.
३. हे मिश्रण चेहऱ्यावर, हातावर आणि मानेला चांगले चोळायचे.
४. उन्हामुळे झालेले टॅनिंग निघून जाण्यास याची चांगली मदत होईल, तसेच त्वचा ग्लोईंग आणि चमकदार दिसण्यासाठीही याचा चांगला उपयोग होईल.
असा करा फेस पॅक
१. एका बाऊलमध्ये २ चमचे मुलतानी माती घेऊ न त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची.
२. त्यामध्ये मध आणि कोरफडीचा गर घालायचा.
३. यामध्ये बीट मिक्सरमध्ये बारीक करुन त्याचा रस गाळून घालायचा.
४. हा फेसपॅक चेहऱ्याला, मानेला आणि हातांना लावायचा.
५. इतका वेळ नसेल तर फक्त बीटाचा रस आणि कोरफडीचा गर एकत्र करुन ही जेल चेहऱ्याला लावली तरी चालते.
६. २० ते २५ मिनीटे हे मिश्रण चेहऱ्यावर ठेवून चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवायचा.