खोबरेल तेल ही आपल्याकडे अगदी सर्रास वापरली जाणारी गोष्ट आहे. डोक्याला लावण्यासाठी आपण या खोबरेल तेलाचा वापर करतो. इतकेच नाही तर दक्षिणेकडे खोबरेल तेलात स्वयंपाक करण्याचीही पद्धत आहे. नारळाचं पीक ज्याठिकाणी जास्त प्रमाणात निघतं त्याठिकाणी खोबरं किंवा त्याचं तेल जास्त वापरलं जातं. केरळ, कर्नाटक या भागांत नारळाच्या तेलात स्वयंपाक करणे अगदी सामान्य आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले असते. केस आणि स्वयंपाकाशिवाय एखादी जखम भरुन येण्यासाठी किंवा त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यासाठी आपण या खोबरेल तेलाचा वापर करतो (How To Use Coconut Oil for Beauty).
मात्र त्याशिवायही दैनंदिन व्यवहारात बऱ्याच बाबतीत हे खोबरेल तेल फायदेशीर ठरु शकते. आपल्या घरात हे तेल अगदी सहज उपलब्ध असते, मात्र त्याचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा याबाबत आपल्याला माहिती असेलच असे नाही. म्हणूनच आज आपण नारळाच्या तेलाचा वापर करुन सहज करता येतील अशा काही सोप्या ब्युटी टिप्स पाहणार आहोत. पाहूयात खोबरेल तेलाचे काही भन्नाट उपयोग.
१. दात पिवळे पडण्याची समस्या अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच भेडसावते. नियमित दात घासूनही त्यावर पिवळा थर तयार होतो. अशावेळी नारळाच्या तेलात हळद घालून हे मिश्रण दातांना लावल्यास दात चमकण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो.
२. केस दाट आणि लांबसडक होण्यासाठी नारळाचं तेल फायदेशीर असतं हे आपल्याला माहित आहेच. पण यामध्ये कांद्याचा रस घातल्यास त्याचा आणखी फायदा होतो. यामुळे केसांचा पोत चांगला होण्यास मदत होते.
३. टाचांना पडणाऱ्या भेगा ही आणखी एक महत्त्वाची समस्या असते. नारळाचं तेल आणि शिया बटर एकत्र करुन हे टाचांना लावावे. यामुळे भेगा पडलेल्या टाचा मऊ होण्यास मदत होते.
४. घामाने किंवा आणखी काही कारणाने आपल्या काखेत एकप्रकारचा काळेपणा येतो. हा काळेपणा दूर होण्यासाठी नारळाच्या तेलात बेकींग सोडा घालावा. हे मिश्रण काखेत लावल्यास हा काळेपणा दूर होतो.
५. डार्क सर्कलमुळे अनेकदा आपल्या सौंदर्यात बाधा येते. अशावेळी इतर कोणते उपाय करण्यापेक्षा नारळाच्या तेलात कॉफी पावडर घालावी. हे मिश्रण डोळ्यांच्या खाली लावावे, त्यामुळे डार्क सर्कल कमी होण्याची शक्यता असते.