Lokmat Sakhi >Beauty > स्वच्छ नितळ त्वचेसाठी सोपा उपाय; तांदळाच्या आइस क्यूबने करा चेहऱ्याचा मसाज, चेहरा सहज दिसेल सुंदर

स्वच्छ नितळ त्वचेसाठी सोपा उपाय; तांदळाच्या आइस क्यूबने करा चेहऱ्याचा मसाज, चेहरा सहज दिसेल सुंदर

चेहेरा ताजातवाना आणि मऊ मुलायम करण्यासाठी तांदळाच्या पाण्याच्या बर्फानं (rice water ice massage) मसाज करणं फायदेशीर ठरतं. नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत जी गोष्ट भरपूर पैसे खर्च करुनही शक्य होत नाही ती या घरगुती उपायानं सहज शक्य होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 08:12 AM2022-08-26T08:12:41+5:302022-08-26T08:15:01+5:30

चेहेरा ताजातवाना आणि मऊ मुलायम करण्यासाठी तांदळाच्या पाण्याच्या बर्फानं (rice water ice massage) मसाज करणं फायदेशीर ठरतं. नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत जी गोष्ट भरपूर पैसे खर्च करुनही शक्य होत नाही ती या घरगुती उपायानं सहज शक्य होते.

How to use rice water ice cube for getting clear and brighten skin. | स्वच्छ नितळ त्वचेसाठी सोपा उपाय; तांदळाच्या आइस क्यूबने करा चेहऱ्याचा मसाज, चेहरा सहज दिसेल सुंदर

स्वच्छ नितळ त्वचेसाठी सोपा उपाय; तांदळाच्या आइस क्यूबने करा चेहऱ्याचा मसाज, चेहरा सहज दिसेल सुंदर

Highlightsतांदळाच्या पाण्याचा बर्फ आणि तांदळाच्या दुधाचा बर्फ अशा दोन पध्दतीनं बर्फ तयार करता येतो.दिवसातून 1 किंवा 2 बर्फाचे खडे वापरुन मसाज करावा. एका वेळी 10 -12 मिनिटं चेहेऱ्यावर गोलाकार आणि हळूवार बर्फ फिरवत मसाज करावा. 

त्वचा तेलकट असो की कोरडी किंवा संमिश्र... त्वचेचा कोणताही प्रकार असला तरी आपली त्वचा नितळ आणि सुंदर असावी अशी प्रत्येकीचीच इच्छा. पण त्वचेच्या प्रकारानुसार त्वचेच्या समस्यांना सामोरं जातांना त्वचेला नैसर्गिक सौंदर्य (natural beauty)  प्राप्त करुन देणं हे अवघड होतं. मग त्वचेची काळजी घेण्यासाठी, त्वचा कृत्रिमरित्या सुंदर करण्यासाठी विविध सौंदर्य उत्पादनांचा आणि सौंदर्य उपचारांचा आधार घ्यावा लागतो. पण या गोष्टींचा आधार घेतला तरच त्वचा सुंदर होते हा गैरसमज आहे. त्वचा स्वच्छ सुंदर करण्याचे नैसर्गिक मार्गही (natural way for healthy skin)  आहेत. त्यातलाच एक प्रभावी आणि सोपा मार्ग म्हणजे तांदळाच्या पाण्याच्या बर्फानं (rice water ice massage)  चेहेऱ्याचा मसाज करणं. चेहेरा ताजातवाना आणि मऊ मुलायम करण्यासाठी तांदळाच्या पाण्याच्या बर्फानं मसाज करणं फायदेशीर ठरतं. नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत जी गोष्ट भरपूर पैसे खर्च करुनही शक्य होत नाही ती या घरगुती उपायानं (benefits of rice water ice massage)  सहज शक्य होते. 

Image: Google

तांदाळाच्या पाण्याचा बर्फ करताना..

तांदळाच्या पाण्याचा बर्फ करण्यासाठी 4 मोठे चमचे तांदूळ , एक ग्लास पाणी, वाटल्यास टी ट्री ऑइल  यांची गरज असते. तांदळाच्या पाण्याचा बर्फ करताना आधी तांदूळ निवडून स्वच्छ धुवून घ्यावेत. नंतर तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ निथळून तांदळाचं पाणी एका भांड्यात काढावं. त्यात टी ट्री ऑइलचे काही थेंब घालून पाणी चांगलं हलवून घ्यावं. नंतर हे पाणी बर्फाच्या ट्रेमध्ये भरावं आणि बर्फ तयार होण्यासाठी ट्रे फ्रिजरमध्ये ठेवावा. बर्फ तयार झाला की बर्फाचा एक तुकडा घेवून तो चेहेऱ्यावर हलक्या हातानं फिरवावा. तांदळाच्या पाण्याचा बर्फ चेहेऱ्यावर फिरवल्यानंतर चेहेरा छान ताजा तवाना होतो. दिवसातून दोनदा तांदळाच्या पाण्याचा बर्फ चेहेऱ्यावरुन फिरवल्यास काही दिवसातच चेहेऱ्याची त्वचा स्वच्छ होते. उजळते आणि चेहेरा छान तजेलदार दिसतो. रात्री झोपण्याआधी चेहेरा धुतला की आधी तांदळाच्या पाण्याचा बर्फ चेहेऱ्यावर फिरवावा आणि नंतर चेहेऱ्याला नाइट क्रीम किंवा नाइट जेल लावावं.

Image: Google

तांदळाच्या दुधाचा बर्फ

चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या खूप असल्यास किंवा काळपट डाग असल्यास चेहेरा स्वच्छ करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा बर्फ करण्याची आणखी एक विशिष्ट पध्दत आहे. यात 4 चमचे शिजवलेला भात , 1 कप नारळाचं दूध, विटॅमिन इ ऑइलची 1 कॅप्सूल घ्यावी.  एका भांड्यात शिजवलेला भात घ्यावा. त्यात एक कप नारळाचं दूध घालावं. ते ब्लेण्डरनं एकजीव करुन घ्यावं. त्यात विटॅमिन इ कॅप्सूल फोडून घालून ती मिसळून घ्यावी. हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये भरुन बर्फ तयार होण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवावं. बर्फ तयार झाला की बर्फाचा एक तुकडा घेवून तो चेहेऱ्यावर गोलाकार फिरवावा. त्वचा स्वच्छ, उजळ आणि तजेलदार होण्यासाठी दिवसातून एकदा हा बर्फ चेहेऱ्यावरुन फिरवावा. तांदळाच्या दुधाचा हा बर्फ चेहेऱ्यावरुन नियमित फिरवल्यास त्वचा उजळ होते, त्वचेचा पोत सुधारतो, त्वचेवर सुरकुत्या पडत नाही तसेच नवीन पेशी निर्माण होण्यास चालना मिळते.  जर चेहेऱ्यावर काळे डाग जास्त असतील तर तांदळाच्या दुधाचा बर्फ तयार करताना त्यात चिमूटभर हळद घालावी. यामुळे चेहेऱ्यावरील काळे डाग पुसट होतात आणि चेहेऱ्याचा काळपटपणाही कमी होतो. 

Image: Google

तांदळाच्या पाण्याच्या बर्फानं मसाज करताना..

1. तांदळाच्या पाण्याच्या बर्फानं मसाज करताना एका वेळी 10 मिनिटांपेक्षा जास्त काळ बर्फ चेहेऱ्यावर फिरवू नये. दिवसभरात 1 ते 2 बर्फाचे तुकडे वापरावेत.

2. चेहेऱ्यावरती बर्फ फिरवण्याआधी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुतलेला असावा. 

3. चेहेऱ्यावरुन बर्फ फिरवताना तो गोलाकार आणि हळूवार फिरवावा. एका जागेवर जास्त वेळ बर्फ ठेवू नये. 

Image: Google

फायदे काय?

 1. तांदळाच्या पाण्याचा बर्फ चेहेऱ्यावरुन फिरवल्यास त्वचा सौम्यपणे स्वच्छ होण्यास मदत होते. चेहेऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. नवीन त्वचा येण्यास चालना मिळते. 

2. त्वचेला तांदळातल्या पाण्याच्या गुणधर्मांचा फायदा तर होतोच सोबतच नारळचं दूध, टी ट्री ऑइल आणि विटॅमिन इ ऑइलचाही फायदा होतो. 

3. चेहेऱ्याची त्वचा ओलसर राहाण्यास मदत होते. तसेच त्वचेचं सूर्याच्या अति नील किरणांंपासून संरक्षण होतं. 

4. चेहेऱ्यावरुन तांदळाच्या पाण्याचा बर्फ फिरवल्यानं चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यांचा आकार कमी होतो, चेहेऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. 

5. तांदळाच्या पाण्याचा बर्फ फिरवणे ही चेहेऱ्यावरील मोठी रंध्र छोटी करण्याचा, उजळ आणि तजेलदार त्वचा प्राप्त करण्याचा नैसर्गिक उपाय आहे. चेहरा सुंदर दिसण्यासाठी पैसे आणि वेळ खर्च करुन कृत्रिम उपाय करण्यापेक्षा हा घरगुती उपाय जास्त फायदेशीर आहे. 

Web Title: How to use rice water ice cube for getting clear and brighten skin.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.