सणासुदीच्या दिवसांमध्ये मस्त ट्रॅडिशनल लूक करावा वाटतो. अनेकदा हौशीने नऊवारीही नेसावी वाटते. साडी नेसली आणि ट्रॅडिशनल मेकअप केला तरी नऊवारीचा थाटच वेगळा. साडीच्या लूकला नऊवारीची सर येतच नाही. म्हणूनच तर सणवार असले की आपण अगदी उत्साहाने नऊवार नेसण्याचे प्लॅनिंग करतो. अगदी सुरुवातीला नऊवारही विकत घेतो. पण एकच नऊवारी कितीदा नेसणार, हा प्रश्नही असतोच. शिवाय एक- दोनदा नेसण्यासाठी हजारो रूपये खर्च करून नऊवारी घेण्याचीही अनेक जणींची इच्छा नसते.
म्हणूनच तर मग अशी सगळी चिंता सोडा आणि बिनधास्तपणे आपली नेहमीची सहावार साडीच नऊवारी पद्धतीने नेसा. ही साडी इतकी परफेक्ट दिसते की समोरच्याला तुम्ही साडीची नऊवारी नेसली आहे, हे सांगितल्याशिवाय अजिबातच कळणार नाही. बऱ्याचदा आपल्याकडे ट्रॅडिशनल धाटणीच्या अनेक साड्या असतात. या साडी सारखंच जर नऊवार आपल्याकडे असतं तर किती बरं झालं असतं, असा विचारही मनात डोकावून जातो. आता तुमचे हे सगळे विचार प्रत्यक्षात आणा आणि सणावाराला तुमच्या आवडत्या साडीची मस्त नऊवार नेसा.
नऊवारीचे प्रकार
- सहावारी साडी नेसण्याचे जसे वेगवेगळे प्रकार असतात, तसेच प्रकार नऊवारी साडी नेसण्याचे असतात. यामध्ये दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. एक म्हणजे पेशवाई पद्धतीने नेसण्याची नऊवार आणि दुसरी म्हणजे साधी नऊवार.
- पेशवाई पद्धतीच्या नऊवारमध्ये नऊवारीला समोरच्या भागात घोळ असतो आणि समोरच्या भागात डाव्या बाजूने पायाकडे जाणारा एक काठ ठसठशीत दिसतो.
- सामान्यपणे टीव्ही, चित्रपटांमध्ये आपण लावणी करणाऱ्या महिलांनी नेसलेली जी नऊवार पाहतो तिला साधी नऊवार म्हणतात.
- पेशवाई नऊवार पायांमध्ये जरा सैलसर असते, तर साधी नऊवार पायांना अगदी परफेक्ट पद्धतीने रॅप केली जाते.
- दोन्ही नऊवार घालण्याची पद्धत वेगवेगळी असून दोन्हींतून वेगळा लूक येतो.
कशी नेसायची साडीची पेशवाई नऊवार?
- सगळ्यात आधी डाव्या बाजूला एक ते दीड मीटर साडी सोडा आणि कंबरेवर दोन्ही बाजूंची चांगली गाठ बांधून घ्या.
- यानंतर डाव्या बाजूला सोडलेला साडीचा भाग दोन्ही पायांच्या मधून मागच्या बाजूने ओढून घ्या.
- या भागाच्या लहान- लहान प्लेट्स घाला आणि त्या मागच्या बाजूने मधोमध खोचून घ्या. यालाच नऊवारीचा काष्टा खोचणं असं म्हणतात.
- आता जी साडी उजव्या बाजूला उरलेली आहे, ती सगळी साडी दोन्ही पायांतून मागे टाका आणि उजव्या बाजूने पुढे ओढून घ्या.
- आता उजव्या बाजूने जी साडी पुढे ओढलेली आहे, ती डाव्या खांद्यावर टाका आणि पदर जेवढा पाहिजे आहे तेवढा खांद्यावरून मागे टाकून ठेवा.
- नऊवारीचा पदर हा सहावारीपेक्षा लहान असतो. त्यामुळे फार मोठा पदर काढू नका. कारण त्यामुळे आपल्याला सहावारी साडी पुरणार नाही.
- आता पदर हवा तेवढा सोडल्यानंतर मागच्या बाजूची सगळी साडी दोन्ही पायातून पुन्हा पुढे काढून घ्या आणि उरलेल्या साडीच्या बारीक बारीक प्लेट करून घ्या.
- प्लेट्स खूप जास्त येणार नाहीत. प्लेट्सची जी दिशा आहे ती उजवीकडे असावी आणि मग सगळ्या प्लेट्स पुढच्या बाजूने खोचून घ्याव्यात.
- यानंतर पदर खांद्यावर सेट करून घ्या.
- आता समोरच्या बाजूने आपण ज्या प्लेट्स म्हणजेच निऱ्या घातल्या आहेत, त्यांचा सगळा काठ समोर काढून तो आपल्याला कंबरेच्या डाव्या बाजूने खोचायचा आहे.
- म्हणजेच हा काठ उजव्या तळपायासून ते कंबरेच्या डाव्या भागापर्यंत असा डायगोनल किंवा तिरका दिसला पाहिजे.
- अशा पद्धतीने तुम्ही सहावरीची नऊवारी साडी अगदी सहज नेसू शकता आणि कोणत्याही समारंभासाठी तयार होऊ शकता.