Join us  

सजना है मुझे...! या दिवाळीत एकदम खास लूक हवा, घ्या परफेक्ट मेकअपच्या ६ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 2:11 PM

दिवाळीत तुमचा लूक खुलवायचा असेल तर कपडे आणि दागिन्यांबरोबर परफेक्ट मेकअपही हवा. चला तर मग पाहूया मेकअपच्या काही सोप्या आणि खास टिप्स

ठळक मुद्देदिवाळीत हटके दिसण्यासाठी काही सोप्या मेकअप टिप्स दिव्यांच्या सणाला तुम्हीही चमका...

दिवाळीत आपण सगळ्यांत छान, वेगळे आणि उठून दिसावे अशी प्रत्येकीची इच्छा असते. विशेषत: तरुणी यासाठी बरीच तयारी करतात. मग साडी, ड्रेस, दागिने यांपासून ते अगदी मेकअपपर्यंतच्या सगळ्या गोष्टींचे नियोजन केले जाते. मग पहाटे अभ्यंगस्नान झाल्यावर, घरात काम करताना, दारात रांगोळी काढून दिवे लावताना आणि अगदी सजून-धजून बाहेर जातानाही आपला लूक इंप्रेसिव्ह असावा असे प्रत्येकीला वाटते. तर या दिवाळीत तुम्हाला  खास लूक करायचा असेल तर काही किमान गोष्टींची माहिती असायला हवी. आपला ड्रेस किवा साडी हेवी असेल तर मेकअप हलका असायला हवा. पाहूयात मेकअपच्या काही सोप्या टिप्स, ज्यामुळे तुम्ही दिसू शकता एकदम हटके तरीही सिंपल...

( Image : Google)

१. टोनर - चेहरा फेस वॉशने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यावर टोनर लावा. त्यामुळे मेकअप जास्त वेळ टिकून राहण्यास मदत होईल. तसेच टोनरमुळे चेहरा एकसारखा होऊन मेकअप करणे सोपे होईल. 

२. प्रायमर - दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. थंडी सुरू झाल्याने त्वचा कोरडी पडायला सुरुवात झालेली असते. पण तुम्हाला ग्लोइंग स्कीन हवी असेल तर तुम्ही प्रायमरचा जरुर वापर करा. यावर फाऊंडेशन लावले तरीही तुमच्या स्कीनची चमक तशीच राहील. तसेच दिवाळीत बाहेर फटाक्यांची दारु, धूळ असते. प्रायमरमुळे तुमचा चेहरा योग्य पद्धतीने झाकला जाण्यास मदत होईल. तसेच तुमच्या चेहऱ्यावर कोणत्या कारणाने सुरकुत्या असतील किंवा काही डाग असतील तर प्रायमरमुळे ते डाग झाकण्यास मदत होते. 

३. इल्यूमिनेटर फाऊंडेशन - सामान्य फाऊंडेशनपेक्षा हे फाऊंडेशन थोडे वेगळे असते. यामध्ये असलेल्या शिमरमुळे चेहऱ्याला चमक येते. दिवाळीत सगळीकडे दिवे असतात. अशावेळी तुम्ही हे फाऊंडेशन लावलेले असल्यास चेहऱ्यावर लाईट पडला तर चेहरा चमकतो. 

( Image : Google)

४. ब्लशर - पिंक किंवा पीच रंगाचा ब्लशर गालाच्या वरच्या बाजूला ब्रशने एकसारखा लावा. तसेच चिक बोन्सलाही ब्लशरने हायलाइट करा, त्यामुळे तुम्ही आणखी आकर्षक दिसाल. डबल चीन लपवण्यासाठीही ब्लशरचा उपयोग केला जाऊ शकतो. ब्लशर लावताना तो खूप डार्क नसेल याची काळजी घ्या. ब्रश सगळीकडून एकसारखआ फिरवा त्यामुळे तो एका ठिकाणी कमी एका ठिकाणी जास्त असा न लागता सगळीकडे एकसारखा लागला जाईल.

५. लिपस्टीक - लिपस्टीक लावताना आधी लिपलायनरने व्यवस्थित शेप काढून घ्या. त्यानंतर तुमच्या कपड्यांना सूट होईल अशी एखादी लिपस्टीक लावा. हल्ली न्यूड रंगाच्या लिपस्टीकचा ट्रेंड असून तुम्ही अशीच लाईट कलरची एखादी लिपस्टीक लावू शकता. पण तुमच्या कपड्यांचा रंग फिका असेल तर मात्र तुम्ही थोडी गडद रंगाची लिपस्टीक लावायला हरकत नाही. 

६. डोळ्यांचा मेकअप - हल्ली वेगवेगळ्या रंगाचे लायनर बाजारात मिळतात. यामध्ये निळसर मोरपंखी शेड सध्या इन आहे. हा रंग कोणत्याही कपड्यांवर सूट होत असल्याने तुम्ही असे थोडे वेगळे लायनर नक्की ट्राय करु शकता. तसेच काजळ लावताना ते वॉटरप्रूफ असेल याची काळजी घ्या. कारण कोणत्या कारणाने डोळ्यातून पाणी आले तर संपूर्ण चेहरा काळा होणार नाही. संध्याकाळच्या वेळी बाहेर जाणार असाल तर फार गडद आयशॅडो लावू नका. पण मस्कारा आणि काजळ आवर्जून वापरा. त्यामुळे डोळे उठून दिसण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सदिवाळी 2021