केस म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. केसांमुळे प्रत्येकाच्या सौंदर्यात उभारी पडते. मुलींना सुंदर, लांब सडक, काळेभोर केस फार आवडतात. मात्र, केस लांब आणि दाट ठेवण्यासाठी चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. केसांची निगा राखण्यासाठी अनेक जण महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात. काही महिलांना असे वाटते की केस कापल्याने केसांमध्ये वाढ होते. याने केस दाट आणि मजबूत होतात. परंतु, केस सतत कापल्याने खरंच केसांची वाढ होते का? नेमकं खरंखोटं काय?
केस कापल्याने त्यांची खरंच वाढ होते का ?
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. जयश्री शरद यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी केसांच्या वाढीबाबत माहिती दिली आहे. त्या सांगतात, "केसांच्या वाढीचा केस कापण्याशी काहीही संबंध नाही. सकस आहार घेतल्यास केस चांगले राहतात. आपल्या आहारामध्ये कॅल्शियम, प्रथिने, यासह भरपूर पोषक तत्वांचा समावेश करावा, जेणेकरून केसांची वाढ होईल."
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तणावमुक्त राहणे अत्यंत आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी योग आणि ध्यान करणे खूप महत्वाचे आहे. स्ट्रेसमुळे देखील केसांची गळती होते.
याशिवाय केसांची वाढ हार्मोनल बदलांवर अवलंबून असते. आपण कोणत्याही प्रकारच्या हार्मोनल औषधे घेत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय खाऊ नये. हार्मोनल बदल घडले तर केस गळतात, आणि वाढ देखील कमी होते.
हेअर हीटिंग ट्रीटमेंटमुळे देखील केसांच्या वाढीवर परिणाम होतो. सतत विविध प्रकार आपल्या केसांवर करून पाहू नये. जर आपल्या केसांवर फाटे फुटले असतील तरच, केस ट्रिम करणे आवश्यक.