Join us  

 पावसाळ्यात स्किन अँलर्जी होते, त्यावर हे 5 सोपे घरगुती उपाय करा, पावसाळ्यात त्वचेचे आजार टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 1:35 PM

पावसाळ्यात त्वचेला होणार्‍या अँलर्जीवर सौंदर्योपचार करण्यापेक्षा घरगुती आयुर्वेदावर आधारित उपाय करणं जास्त फायदेशीर ठरतं असं तज्ज्ञ सांगतात. घरात सहज उपलब्ध असणारे खोबर्‍याचं तेल, कोरफड जेल, बेकिंग सोडा, अँपल व्हिनेगर आणि लिंबू यांच्या उपयोगानं पावसाळ्यात छळणार्‍या त्वचा विकारांपासून सुटका करुन घेता येते.

ठळक मुद्दे खोबर्‍याच्या तेलात मॉश्चरायजिंग घटक असतात. हे घटक त्वचेच्या अँलर्जीवर उपायही करतं आणि अँलर्जीला रोखतंही. त्वचा विकार तज्ज्ञ सांगतात की कोरफडमधे जीवाणूविरोधी आणि बुरशी विरोधी गुण असतात.पावसाळ्यात होणार्‍या त्वचेच्या अँलर्जीमुळे जी खाज येते ती खाज दूर करण्याची क्षमता लिंबाच्या रसात असते.

पावसाळा सुरु झाला की आता उन्हाळ्याच्या जाचापासून सुटका म्हणून बरं वाटतं. पावसाळ्यातली ओली गार हवा मनाला आल्हाद देते हे खरं पण पावसाळ्यातलं हेच वातवरण त्वचेसाठी मात्र त्रासदायक ठरतं. पावसाळ्यातलं आद्र्र वातावरण, कधी तापलेलं ऊन, तर कधी पावसामुळे पसरलेला गारवा हा मिर्श आणि सतत बदलत्या वातावरणाचा त्वचेवर परिणाम होतो. आणि त्वचेसंबंधीचे अनेक विकार पावसाळ्यातच डोकं वर काढतात. पावसाळ्यात प्रामुख्यानं त्वचेच्य अँलर्जीला तोंड द्यावं लागतं. या अँलर्जीमुळे आग, खाज, चट्टे , पुरळ असे वेगवेगळे त्रास जाणवतात. या त्रासांवर स्किन केअर प्रोडक्टस लावले जातात, ही अँलर्जी जर दर्शनी भागात असेल तर मग ब्युटी पार्लरमधे जाऊन ब्युटी ट्रीटमेण्टस घेतल्या जातात.पण सौंदर्य उत्पादनात असणारे रासायनिक घटक बरेचदा या त्वचेच्या अँलर्जीला त्रासदायक ठरतात. त्रास आणखीनच वाढण्यची शक्यता असते.

पावसाळ्यात त्वचेला होणार्‍या अँलर्जीवर सौंदर्योपचार करण्यापेक्षा घरगुती आयुर्वेदावर आधारित उपाय करणं जास्त फायदेशीर ठरतं असं तज्ज्ञ सांगतात. घरात सहज उपलब्ध असणारे खोबर्‍याचं तेल, कोरफड जेल, बेकिंग सोडा, अँपल व्हिनेगर आणि लिंबू यांच्या उपयोगानं पावसाळ्यात छळणार्‍या त्वचा विकारांपासून सुटका करुन घेता येते.

त्वचेच्या अँलर्जीवर घरगुती उपाय

 

  1. खोबर्‍याचं तेल- त्वचाविकार तज्ज्ञ त्वचेसाठी खोबर्‍याच्या तेलाला खूप महत्त्व देतात. खोबर्‍याचं तेल त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं. खोबर्‍याच्या तेलात मॉश्चरायजिंग घटक असतात. हे घटक त्वचेच्या अँलर्जीवर उपायही करतं आणि अँलर्जीला रोखतंही. त्वचेची अँलर्जी झाली की त्वचेला खूप खाज येते. ही खाज घालवण्यासाठी खोबर्‍याचं तेल अँलर्जी झालेल्या जागेवर लावावं. खोबर्‍याच्या तेलातले गुणधर्म पावसाळ्यात येणार्‍या खाजेपासून आराम देतात.
  2. कोरफड जेल- पावसाळ्यात त्वचेच्या अँलर्जीचे वेगवेगळे प्रकार असतात. यामुळे खाज, आग, वेदना यासारखे त्रास अँलर्जी झालेल्या ठिकाणी होतात. त्वचेसंबंधीचे हे विकार कोरफड जेल लावल्यास दूर होतात. त्वचा विकार तज्ज्ञ सांगतात की कोरफडमधे जीवाणूविरोधी आणि बुरशी विरोधी गुण असतात. याच गुणांमुळे त्वचेसंबंधीच्या समस्यांसाठी कोरफड जेल उपयोगी ठरते. कोरफडीच्या गरात असलेल्या थंडाव्यामुळे अँलर्जीमुळे त्वचेचा होणारा दाह कमी होतो.

 

3. बेकिंग सोडा- त्वचेच्या अँलर्जीने होणारे त्रास घालवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर उपयोगी ठरतो. बेकिंग सोडा हा त्वचेतील पीएच स्तराचं संतुलन राखतो. बेकिंग सोड्यामुळे अँलर्जीमुळे येणारी खाज कमी होते. ही खाज कमी करण्यासाठी थोडं पाणी घेवून त्यात एक चमचा बेकिंग सोडा आणी थोडा लिंबाचा रस घालावा. हा लेप ज्या ठिकाणी अँलर्जी झाली असेल तिथे लावावा. किंवा एक कप बेकिंग सोडा एक बादली कोमट पाण्यात घालवा. या पाण्यात त्वचेचा अँलर्जी असलेला भाग अर्धा तास बुडवून ठेवावा या उपायानेही त्वचेच्या अँलर्जीवर लवकर आराम पडतो.

4.अँपल व्हिनेगर- त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सफरचंदाचं व्हिनेगर उपयोगी ठरतं. या व्हिनेगरमधे अँसिटिक अँसिडचं प्रमाण जास्त असतं. तसेच यात अँण्टि बायोटिक आणि अँण्टि हिस्टामिन गुण असतात. हे गुणधर्म त्वचेच्या अँलर्जीविरोधात काम करतात. हे अँपल व्हिनेगर वापरताना एक ग्लास पाण्यात एक चमचा अँपल व्हिनेगर टाकावं. यात एक चमचा लिंबाचा रस आणि थोडं मध घालावं आणि दिवसातून तीन वेळेस ते प्यावं. त्यामुळे अँलर्जीमुळे येणारी खाज या व्हिनेगरच्या उपयोगानं कमी होते. पण ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी त्वचेच्या अँलजीसाठी अँपल व्हिनेगर वापरतना त्वचा विकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

 

5. लिंबू- लिंबात अँण्टि सेप्टिक आणि दाह विरोधी गुणधर्म असतात. पावसाळ्यात होणार्‍या त्वचेच्या अँलर्जीमुळे जी खाज येते ती खाज दूर करण्याची क्षमता लिंबाच्या रसात असते. यासाठी थोडा लिंबाचा रस घ्यावा आणि ज्या ठिकाणी अँलर्जी आली आहे तिथे तो लावावा. या उपायानेही त्वरित फरक पडतो.