Join us  

स्वयंपाकघरात या 5 गोष्टी आहेत? मग तुम्ही लकी आहातच, आता खूबसुरतही व्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 6:14 PM

त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्याबाबतीत घरगुती उपचार आजही त्यांचं महत्त्वं टिकवून आहेत. एकतर हे उपचार करताना कोणतीही गोष्ट बाहेरुन आणावी लागत नाही. सौंदर्योपचारात जे घरगुती उपाय आजच्या आधुनिक काळातही टिकून आहेत त्यांचं महत्त्व ओळखून वापर वाढवणं हाच नैसर्गिक रित्या सुंदर दिसण्याचा उत्तम पर्याय आहे.

ठळक मुद्दे सौंदर्योपचारात दुधाचा उपयोग हा प्राचीन काळापासून महत्त्वाचा उपाय मानला जातो.केशरामधे त्वचा नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट करण्याचा हा उपाय आहे.चेहेऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या, ब्लॅक हेडस या चिवट समस्येंवर प्रभावी उपचार करायचे असतील तर हळदीचा प्रयोग केला जायचा.

सौंदर्य हे नैसर्गिक असतं हे खरं. पण हे सौंदर्य टिकवण्यासाठी, ते वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सौंदर्य जपणं आणि वाढवण्यासाठी कॉस्मेटिक्सचा वापर ही काही नवीन गोष्ट नाही. हल्ली रोज बाजारात नवनवीन सौंदर्य उत्पादन येतात. आधीची जागा नवनवीन उत्पादनं घेतात. त्याचा परिणाम म्हणजे अनेकजणी सतत आपली सौंदर्य उत्पादनं बदलत राहातात. आणि या सगळ्याचा काहीच परिणाम दिसत नाहीये बघून नाराज होतात. पण बाजारातली सौंदर्य उत्पादनं सतत बदलत असली तरी काही घरगुती उपाय आहेत जे पिढ्यान पिढ्यांपासून चालत आलेले आहेत. त्यांचे परिणामही प्रभावी आणि टिकून राहाणारे आहेत. हे उपाय म्हणजेच आपल्या आजी -आई यांनी सांगितलेले सौंदर्योपचार. सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक्सचा अतिरेक हा शेवटी त्वचेसाठी हानिकारकच. म्हणूनच हा अट्टाहास बघून नवीन पिढीला जुन्या पिढीतली लोक अमूक घरगुती उपाय करुन बघ लगेच फरक पडेल असं सांगतात. आणि त्यांचं ऐकलं तर होतंही तसंच.

त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्याबाबतीत घरगुती उपचार आजही त्यांचं महत्त्वं टिकवून आहेत. एकतर हे उपचार करताना कोणतीही गोष्ट बाहेरुन आणावी लागत नाही. त्यासाठी जास्तीचा पैसा, वेळ खर्च करण्याची अजिबात गरज नसते. या उपायांमधे रासायनिक घटकांचा समवेश नसतो. त्यामुळे त्यांच्या वापरानं त्वचेला किंवा केसांना हानी होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. सौंदर्योपचारात जे घरगुती उपाय आजच्या आधुनिक काळातही टिकून आहेत त्यांचं महत्त्व ओळखून वापर वाढवणं हाच नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्याचा उत्तम पर्याय आहे.सौंदर्योपचारातले जुने पण टिकून राहिलेले उपचार

  • दुधाचा उपयोग- सौंदर्योपचारात दुधाचा उपयोग हा प्राचीन काळापासून महत्त्वाचा उपाय मानला जातो. पूर्वी विशेषत: मुलींचं लग्न ठरलं की घरातील आजी, आई या तिला चेहेऱ्यास दूध लावण्यास सांगायच्या. नवरी मुलीचा चेहेरा उजळून निघण्यासाठी कच्च्या दुधात हळद घालून उटणं तयार केलं जायचं. आणि या उटण्यानं तिला आंघोळ करण्यास सांगितलं जायचं . किंवा थोडं कच्च दूध घेऊन त्यानं चेहेऱ्यावर मसाज करायला सांगायच्या. कच्च्या दुधाच्या मसाजनं त्वचेची बंद छिद्र मोकळी होतात आणि स्वच्छही होतात. या दुधाच्या उपायानं त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ होते आणि त्वचा मॉश्चराईजही होते. या गुणांमुळेच कच्च दूध हा उपाय आजही आपलं महत्त्व टिकवून आहे.

  • केशर- मिठायांचा रंग आणि स्वाद वाढवण्यासाठी केशर वापरलं जातं. सौंदर्योपचारात केशरचा उपयोगही पारंपरिकच आहे. हे केशर दुधात घालून ते जर चेहेऱ्यास लावलं तर चेहेऱ्यावर नैसर्गिक तेज येतं. दूध, चंदन आणि त्यासोबत केशर वापरल्यास चेहेऱ्यावरचा काळेपणा दूर होतो. तसेच पिकलेली पपई, दूध, केशर आणि मध हे घटक एकत्र करुन त्याने चेहेऱ्याचा मसाज केल्यास चेहेऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते. त्वचा नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट करण्याचा हा उपाय आहे. जर केशराचा उपयोग लिंबू, मध आणि बदामासोबत केला तर त्वचा घट्ट होते, त्वचेवरच्या सुरकुत्या निघून जातात. त्वचा तरुण दिसते.

  • हळद- सौंदर्यासाठी हळद हे समीकरण फार पूर्वीपासून पक्कं आहे. चेहेऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या, ब्लॅक हेडस या चिवट समस्येंवर प्रभावी उपचार करायचे असतील तर हळदीचा प्रयोग केला जायचा. डोळ्या खालची काळी वर्तुळं घालवण्यासाठीही हळदच वापरली जायची. चंदन, दूध, साय, मध यात हळद घालून तो लेप चेहेऱ्यास लावला तर चेहेऱ्यावर नैसर्गिक तेज येतं.

  • मोहरी- भाज्यांच्या फोडणीसाठी वापरली जाणारी मोहरी , लोणच्यात वापरली जाणारी मोहरीची डाळ, मोहरीचं तेल सौंदर्योपचारातही महत्त्वाचं काम करते. पिवळ्या मोहरीची पावडर आणि मोहरीचं तेल त्वचेसाठी उत्तम मानलं जातं. याचा पूर्वी उटण्यासारखा वापर केला जायचा. या उटण्यानं त्वचेचा मसाज केल्यास त्वचेवरचा काळेपणा दूर होतो. पूर्वी त्वचेवरचे केस काढण्यासाठी हाच उपाय केला जायचा.

  • चंदन- दूध-हळद आणि चंदन हे संयोजन सौंदर्यास उपकारक मानलं जातं. नैसर्गिक सुगंधासाठी चंदनाचा लेप वापरला जायचा. तसेच त्वचेचा दाह घालवण्यासाठी चंदनाचा उपयोग केला जायचा. उन्हाळ्यात त्वचेची आग होवू नये , घामोळ्या होवू नये म्हणून चंदनाचा लेप लावला जायचा. हे उपाय आजही सौंदर्य समस्या सोडवण्यासाठी परिणामकारक आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व गोष्टी आज आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहेत. 

टॅग्स :ब्यूटी टिप्स