थंडीच्या दिवसांत (Hair care) आणि एरवीही आपले केस खूप रुक्ष आणि कोरडे होतात. केसांची अशी अवस्था झाली की नेमके त्याचे काय करावे आपल्याला काही केल्या कळत नाही. मग कधी भरपूर कंडीशनर लावला जातो तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे सिरम ट्राय केले जातात. त्यानीही केसांचा पोत सुधारत नसेल तर भरपूर पैसे खर्च करुन हेअर स्पा केला जातो, नाहीतर आणखी काही ट्रीटमेंटस घेतल्या जातात. पण यामुळे पैसा तर खर्च होतोच पण या रासायनिक प्रक्रियेचा किती काळ परिणाम राहतो आणि प्रत्येकाला त्याचा कसा फायदा होतो हे सांगता येत नाही. केस धुतल्यावर किंवा झोपेतून उठल्यावर आपल्या केसांचा नेमका पोत आपल्या लक्षात येतो. त्यामुळे खूप भुरे आणि पिंजारलेले केस सिल्की, शायनी दिसावेत (Tips for silky and shiny hair) यासाठी काही सोपे घरच्या घरी करता येतील असे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. स्वत:कडे, आपल्या केसांच्या आरोग्याकडे थोडे बारकाईने लक्ष दिल्यास त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. पाहूयात केसांची शाईन वाढण्याचे काही उपाय...
१. ऑईल मसाज
केसांना नियमितपणे तेलाने मसाज करणे हा अतिशय उत्तम उपाय असतो. अनेक मुली आणि महिलांना केसांना तेल लावणे आवडत नाही. काही जणी घाईगडबडीत तेल लावायला विसरतात आणि तसेच केस धुतात. पण असे केल्याने केसांचे आरोग्य बिघडते आणि केस दिवसेंदिवस जास्त रुक्ष होत जातात. केसांचे चांगले पोषण होण्यासाठी केसांना आठवड्यातून दोन वेळा ऑईल मसाज करणे अतिशय आवश्यक असते. यासाठी तुम्ही नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, बदामाचे तेल असे आपल्या केसांना सूट होणारे कोणतेही हेअर ऑईल तुम्ही लावू शकता. तेल थोडे कोमट करुन कापसाने किंवा बोटांच्या टोकाने केसांच्या मूळांना लावा आणि त्यानंतर केसांनाही सगळीकडे लावा. केसांच्या मूळांना योग्य पद्धतीने तेल लावल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
२. केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर टाळा
केस कायम थंड पाण्याने धुवावेत, त्यामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. थंडीत किंवा एरवीही पूर्णपणे थंड पाण्याने केस धुणे काहीसे अवघड वाटत असले तरी केस चांगले राहण्यासाठी ते आवश्यक असते. आपण अनेकदा आंघोळ करतानाच केस धुवत असल्याने अंगावर ज्याप्रमाणे गरम पाणी घेतो, त्याचप्रमाणे केसांवरही गरम पाणी घेतो. पण गरम पाण्यामुळे केस धुतल्यामुळे केसांतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केस आहेत त्याहून जास्त कोरडे होतात.
३. केस पुसण्यासाठी टॉवेल नको
केस धुतल्यानंतर ते कोरडे करण्यासाठी आपण अंग पुसतो तोच टर्कीसचा टॉवेल वापरतो. हा ट़ॉवेल केस पुसण्यासाठी सोयीचा वाटत असला तरीही तो केसांसाठी चांगला नसतो. त्याऐवजी एखादा जुना टी शर्ट किंवा न वापरातला टीशर्ट वापरणे केव्हाही चांगले. टी शर्ट साधारणपणे होजिअरी कापडाचा असल्याने त्याने केसातील पाणी तर चांगले टिपले जातेच पण केसांचे नुकसान होण्यापासून वाचण्यासाठी टीशर्ट अतिशय फायदेशीर ठरतो.
४. नैसर्गिक घटकांचा वापर करुन स्ट्रेटनिंग
अनेकदा आपण कुठे कार्यक्रमाला किंवा समारंभाला जायचे असेल की हेअर स्ट्रेटनरचा वापर करतो. मात्र त्यामुळे केसांचा पोत बिघडू शकतो. केस सरळ करायचे असतील तर दही, कोरफड, मध, लिंबू, मेहंदी यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. केसांना पोषण मिळाल्यामुळे केस सरळ तर होतीलच पण ते आतूनही चमकदार आणि मऊ होतात. त्यामुळे तुम्हाला त्यावर वेगळ्या अशा केमिकल ट्रीटमेंट घेण्याची गरज पडत नाहीत. त्यामुळे या घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा केसांचे सौंदर्या वाढवण्यासाठी नक्की वापर करा.