साडी नेसायला बहुतांश मुलींना आवडते. अनेकींना तर शिक्षक असल्याने किंवा काही इतर कारणाने रोजच्या रोज साडी नेसावी लागते. काठाची किंवा डिझायनर साडी सणावाराला किंवा एखाद्या कार्यक्रमाला जायला ठीक आहे. पण रोज नेसायची असेल तर कॉटनची छान सुती साडी तुमचा लूक चेंज करते. एलिगंट आणि सोबर अशा कॉटन साडीमध्ये तुमचा प्रोफेशनल लूक आणखीनच छान दिसतो. इतकेच काय एखाद्या कार्यक्रमलाही हल्ली छानशी कॉटन साडी नेसून जाण्याचा ट्रेंड आहे. कॉटनची साडी तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये अगदी सहज नसू शकता, त्यामुळे तुम्ही याठिकाणी कम्फर्टेबलही राहता.
कॉटनमध्ये साऊथ कॉटन हा अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे. प्लेन किंवा बुट्टे आणि जाडसर काठ असलेल्या या साड्या खूपच सुंदर दिसतात. या बरोबरच चंदेरी, बनारसी अशा अनेक प्रकारांमध्ये कॉटन साडी पाहायला मिळते. हल्ली इकत, प्राणी किंवा पक्षी यांचे मोठ्या आकारातील प्रिंट असलेल्या साड्या कॉटन प्रकारात पाहायला मिळतात. आता हे सगळे ठीक असले तरी कॉटनची साडी नसताना किंवा नेसून झाल्यावर ती कितीही छान असेल तरी त्याचा फुगा होतो. किंवा कधी ही साडी एकाच बाजूने वरवर जाते. तर हे सगळे टाळण्यासाठी आणि कॉटनची साडी चापून चोपून अंगाला एकसारखी छान बसावी यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे असते. नाहीतर कॉटन साडी आवडत असूनही नेसता येत नाही.
१. परकर - कॉटनच्या साडीच्या आत कॉटनचाच परकर वापरा. एरवी आपण साडी शेपर किंवा कधी सिल्कचे परकर वापरतो. यामुळे आपण बारीकही दिसतो. मात्र कॉटनची साडी नेसणार असाल तर कॉटनच्या परकरला पर्याय नाही. हा परकर तुमच्या मापात असेल याची काळजी घ्या. तो जास्त फुगीर असेल तर साडीही फुगल्यासारखी दिसते.
२. इस्त्री - कॉटनच्या साडीला लवकर घड्या पडत असल्याने ही साडी अतिशय योग्य पद्धतीने इस्त्री, कोल्डप्रेस किंवा रॉलप्रेस करावी लागते. योग्य पद्धतीने इस्त्री नसेल तर कॉटनची साडी चांगली दिसत नाही. त्यामुळे साडीला कडक इस्त्री असणे आवश्यक आहे.
३. मदतीला व्यक्ती - कॉटनची साडी काहीवेळा कडक असू शकते. त्यामुळे ती एकटीला सावरणे शक्य होत नाही. या साडीच्या निऱ्या घालणे आणि पदर लावणे जिकरीचे होऊन बसते. त्यामुळे कॉटनची साडी नेसताना आजुबाजुला कोणी असलेले बरे. त्यामुळे या व्यक्तीची पदर घेण्यासाठी किंवा निऱ्या एकसारख्या करण्यासाठी मदत होऊ शकते.
४. एरवी आपण साडी नसताना कधीकधी घाईत ती खोचतो किंवा पिनअप करतो. पण कॉटनची साडी नेसताना अशी घाई करून चालत नाही. ती सावकाश सगळीकडून एकसारखी खोचली गेली तरच छान बसते आणि दिसते. त्यामुळे घाई न करता अतीशय सावकाशपणे साडी नेसा. तसेच ती सगळीकडून व्यवस्थित ओढून घ्या. त्यामुळे तुमची फिगर दिसायला मदत होईल.
५. साडी पूर्ण नेसून झाली की निऱ्या, पदर, इतर प्लेट्स हाताने एकसारखे करून घ्या. सगळ्या काठांवरून एकदा हात फिरवा. म्हणजे हे काठ दुसऱ्या बाजूला वळणार नाहीत. साडीचे सूत चांगले असेल तर तुम्ही हाताने सरळ केलेली साडी कित्येक तास तशीच राहते. मात्र त्यासाठी ती घट्ट आणि छान नेसणे गरजेचे असते. तसेच कॉटनला जास्त पिना लावण्याचीही गरज नसते, त्यामुळे आवश्यक तेव्हढ्याच पिना लावा.