-वैद्य राजश्री कुलकर्णी दिवाळीच्या चार दिवसात सर्वात आधी महत्त्व आहे ते अभ्यंगस्नानाला. केवळ नरकचतुर्दशीलाच नाहीतर दिवाळीच्या चार दिवसात आणि पुढे हिवाळ्याचे चार महिने अभ्यंगाला खूप महत्त्व आहे. दिवाळीच्या काळात अभ्यंग याला पारंपरिक महत्त्व तर आहेच पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शरीर, मन आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अभ्यंगाला महत्त्वाचं स्थान आहे.
मराठी महिन्यांचा आणि ऋतुंचा विचार करता दिवाळी हा सण कार्तिक महिन्यात येतो. अश्विन अमावस्येला लक्ष्मी पूजन, त्याच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी नरकचतुर्दशी असते. कार्तिक महिन्यात पाडवा आणि भाऊबीज येते. दिवाळी हा सण आक्टोबर हिट संपल्या संपल्या/ संपताना किंवा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सांगायचं झलं तर शरद ऋतू संपून हेमंत ऋतू सुरु होतो. त्यादरम्यान दिवाळी हा सण येतो. थंडी आणि दिवाळी यांच एकमेकांसोबत घनिष्ठ नातं आहेच. किमान हिवाळ्याची चाहुल तरी दिवाळीत लागतेच आणि म्हणून अभ्यंगाला दिवाळीपासून ते पुढे चार महिने महत्त्व असतं.
Image: Google
अभ्यंग का करायचं?
ऑक्टोबर हिट संपून थंडी पडायला सुरुवात होते आणि मग ती वाढत जाते. थंडी वाढताना एकदम वाढत नाही. म्हणूनच थंडीचेही दोन ऋतू असतात. कमी थंडीचा ऋतू त्याला हेमंत ऋतू म्हणतात तर तीव्र थंडीच्या ऋतूला शिशिर ऋतू . शिशिरात थंडीची तीव्रता खूप जास्त असते. थंडी सुरु होते, वाढत जाते तसतसं हवामान बदलत जातं. हवा बदलते. नुसती थंडी वाढत नाही तर हवेतला कोरडेपणा वाढायला लागतो. आपण सजीव याच सर्व गोष्टींसोबत जगत असतो. त्यामुळे हा कोरडेपणा जसा हवेत वाढतो तसाच आपल्या त्वचेतही वाढतो, आपल्या शरीरातही वाढतो. त्वचा जशी कोरडी होते तसा कोरडेपणा शरीराच्या आतही येतो. आतड्यांना कोरडेपणा येतो. त्यामुळे खाण्यापिण्यात, दिनचर्येत बदल करणं अपेक्षित असतं. उदा. दिवाळीतला फराळ, उटणं हे बदल त्यादृष्टीकोनातूनच केले जातात.हवेतला कोरडेपणा वाढतो, सोबत धूळ वाढते. ती त्वचेवर बसायला लागते. त्यामुळे त्वचा आणखी कोरडी आणि खराब व्हायला लागते. त्यामुळे सर्वात पहिले त्वचेचा कोरडेपणा कमी करणं आवश्यक असतो. त्वचेला यासाठी स्निग्धतेची , स्निग्धतेसाठी अभ्यंगाची गरज असते. त्वचेला स्निग्धतेसाठी कोणतंही तेल उदा. खोबर्याचं, तिळाचं, मोहरीचं तेल चालतं. पण दिवाळीच्या अभ्यंगासाठी मात्र सिध्द तेलच वापरायला हवं असं आयुर्वेद म्हणतं. सिध्द तेल म्हणजे त्वचेच्या आरोग्यासाठी जी औषधं महत्त्वाची असतात त्या औषधांसोबत तेल सिध्द केलं जातं म्हणजेच बनवलं जातं. हे सिध्द तेल त्वचेच्या विविध समस्यांवर उपयुक्त असतं. सिध्द तेलामुळे त्वचेच्या कोरडेपणासह त्वचेला खाज येणं, पुरळ, रॅशेस हे त्वचेचे त्रासही कमी होतात. तसेच ज्यांची त्वचा मुळातच कोरडी असते त्यांची त्वचा या काळात आणखीनच कोरडी होते, काहींची तर इतकी कोरडी होते की माशांच्या अंगावर जसे खवले असतात तशा कोरडेपणाच्या खपल्या त्वचेवर दिसतात. त्वचा फाटते. पांढरी पडते. अशा प्रकारच्या त्वचेसाठी सिध्द तेलानं अभ्यंग करणं महत्त्वाचं असतं.
कोरडेपणामुळे त्वचेची लवचिकता कमी होते. त्यामुळे हिवाळ्यात टाचांना भेगा पडणं, ओठ फाटणं, हाताच्या बोटांना चिरा जाणं हे सर्व त्रास थंडीतल्या रुक्षतेशी निगडित आहेत. हे रुक्षतेचे त्रास होवू नये म्हणून थंडीत अभ्यंग महत्त्वाचं असतं. म्हणून अभ्यंग हे केवळ दिवाळीचे चार दिवसच महत्त्वाचं असतं असं नाही. तर दिवाळीपासून सुरु करुन ते पुढे हिवाळ्याचे चार महिने करणं गरजेचं असतं . दिवाळीत वसुबारसेपासून अभ्यंगाला सुरुवात करुन अभ्यंगाचा नित्यक्रम संक्रातीपर्यंत चालू ठेवावा. अभ्यंगाच्या बाबतीत परंपरा ही दिवाळीतल्या चार दिवसांची असली तरी त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अभ्यंग ही आरोग्यदायी बाब ठरते आणि ती पुढचे चार महिने सुरु ठेवणं म्हणूनच गरजेचं असतं.
Image: Google
उटणं का वापरावं?
त्वचा ही आपल्या शरीरातलं महत्त्वाचं इंद्रिय आहे. त्वचा ही सतत ऊन, वारा, पाऊस याच्याशी थेट सामना करत असते. त्यामुळे त्वचेचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी त्वचेचं पोषण करणं, काळजी घेणं गरजेचं असतं.अभ्यंग करताना जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा त्वचा जेवढं तेल आवश्यक आहे तितकं शोषून घेते आणि उरलेलं जे जास्तीचं तेल आहे ते तेल काढून टाकणं अपेक्षित असतं, त्वचेवरच्या मृत पेशी, मृत त्वचा, त्वचेवरची धूळ, घाण काढून टाकणं आवश्यक असतं. नेहेमी आपण साबणानं आंघोळ करताना त्वचा स्वच्छ करत असतो. पण साबणानं त्वचेची खोलात जाऊन स्वच्छता ( डीप क्लीन्जिंग ) होत नाही. साबणानं केवळ फेस होतो आणि त्वचा वरवर स्वच्छ होते. पण आपण रोज उन्हात फिरतो, त्वचा काळवंडते ( टॅन होते), त्वचेवर मृत पेशी जमा झालेल्या असतात. चेहेर्यावर, नाकावर ब्लॅक हेडस, व्हाइट हेडस येतात, हे काढून टाकणं आवश्यक असतं. त्यासाठी तेल लावल्यानंतर उटणं लावणं आवश्यक आहे.
बाहेर जी उटणी मिळतात ती वस्त्रगाळ पावडरीसारखी असतात. तसं अभ्यंगात उटणं वापरणं अपेक्षित नाही. ज्याला हल्लीच्या भाषेत स्क्रब म्हणतात,अशा स्वरुपाचं रवाळ उटणं असायला हवं. ज्यामुळे त्वचेवर जे किंचित घासलं जाईल जेणेकरुन त्वचेवरच्या मृत पेशी निघून जातील, त्वचेचा रंग उजळून निघेल, त्वचेचं स्वास्थ्य चांगलं होण्यासाठी मदत होईल यासाठी खरंतर उटणं लावणं महत्त्वाचं असतं.बाहेरच्या उटण्यात साधी माती, मुलतानी माती असं काही बाही घालून ते उटणं केलं जातं. पण आयुर्वेदाला जे उटणं अपेक्षित आहे जे आयुर्वेदिक तज्ज्ञ, वैद्य बनवतात त्यात त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या चंदन, वाळा, कपुरकाचरी, नागरमोथा अशा सुगंधी , त्वचेसाठी उपयुक्त आणि उत्कृष्ट परिणामांच्या वनस्पतींचा वापर अपेक्षित आहे. अशी उटणी विश्वासाच्या आयुर्वेदिक दुकानात किंवा आयुर्वेदिक वैद्यांकडून घ्यावीत. घरी तयार केलेलं उटणंही त्वचेसाठी तितकंच फायदेशीर असतं. त्यात हरभरा डाळीचं रवाळ पीठ, लाल मसूर डाळीचं रवाळ पीठ (त्वचेसाठी लाल मसूर डाळ अत्यंत उपयुक्त असते)हे दोन्ही पिठं घ्यावीत. हे पिठं रवाळ पोताची घरी मिक्सरवरही दळता येतात. त्यासाठी आधी या डाळी हाताला गरम लागतील इतक्या शेकून घ्याव्यात. आणि गार झाल्या की मिक्सरवर दळायच्या. स्क्रबप्रमाणे या वाटलेल्या पिठाचा पोत खरबरीत असावा. त्यात हळद, आयुर्वेदिक दुकानात गुलाब पाकळ्यांचं चूर्ण मिळतं ते, वाळ्याचं चूर्ण हे घालून उटणं घरच्याघरी तयार करता येतं.
Image: Google
उटणं असं वापरु नका!
उटणं वापरण्याचीही विशिष्ट पध्दत आहे. अनेकजण उटणं चुकीच्या पध्दतीनं वापरतात. कोणी तेल न लावताच उटणं लावतात. ही पध्दत त्वचेची हानी करते. उटणं हे तेल लावलेल्या अंगालाच लावायला हवं. आधी अंगाला तेल लावायचं, दहा मिनिटं ते तेल त्वचेत मुरु द्यायचं. यामुळे त्वचेची रंध्रं त्यांना आवश्यक तितकं तेल शोषून घेतात. मग उरलेलं तेल काढून टाकण्यासाठी उटणं वापरायचं असतं. म्हणून तेल लावून झाल्यावर दहा मिनिटांनी त्या तेलावरच उटणं चोळायचं असतं. उटणं ओलं झालं तर त्याचा अपेक्षित परिणाम त्वचा स्वच्छ होण्यावर, मृत पेशी निघून जाण्यावर होत नाही. म्हणून तेल लावलेल्या अंगावर उटणं लावायचं, ते चोळून टाकायचं आणि मग गरम पाण्यानं आंघोळ करावी. यामुळे अंगावर असलेलं जास्तीचं तेल ,उटणं निघून जाऊन त्वचा स्वच्छ होते.गार पाणी वापरल्यास त्वचा ओशट होते. त्यामुळे अभ्यंगात तेल, उटणं आणि गरम पाणी या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात.
Image- Google
अभ्यंगासोबतच फराळही महत्त्वाचा..
दिवाळीच्या काळात शेव, चिवडा, शंकरपाळी, चकली, लाडू यासारखे तेल आणि तुपाचा सढळ हस्ते वापर केलेले पदार्थ खाणं अभ्यंग करण्याइतकेच महत्त्वाचे आहेत. फराळातल्या पदार्थांमधील स्निग्धता ही आतड्यांपर्यंत पोहोचते. त्यामुळे शरीराला येणारा रुक्षता टाळता येते. म्हणून थंडीच्या या दिवसात फराळाचे पदार्थ खाणं उपयुक्त ठरतं. आयुर्वेदात अग्नी महत्त्व असतं. अग्नी म्हणजे पचनशक्ती . ही पचनशक्ती व्यक्तीपरत्त्वे वेगळी असते. त्यामुळे त्रास होणार नाही, ते सहज पचेल इतपतच फराळाचे पदर्थ खाणं अपेक्षित असतं. आपल्या शरीराला या फराळाच्या पदार्थातून मिळणारी ऊर्जा आवश्यक असते. फक्त फराळाचे पदार्थ खाताना प्रमाणाकडे लक्ष द्यावं. शिवाय सोबत व्यायामालाही प्राधान्य द्यावं. ते नसेल तर मग खाण्याचं प्रमाण आणि आपल्या शरीराच्या हालचालीतून कॅलरीज कमी होणं हे साध्य होत नाही. व्यायामाच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन भरपूर फराळाचे पदार्थ खाल्ले तर स्थूलता वाढणं, कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढणं अशा स्वरुपाच्या तक्रारी उद्भभवतात. दणकून व्यायाम आणि मनसोक्त फराळ.उत्तम आरोग्यासाठी हा नियम प्रत्येकानं करणं आवश्यक आहे. तसं झालं तर आपल्या पारंपरिक फराळा एवढं उतम दुसरं काहीच नाही.
लेखिका नाशिकस्थित प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. )rajashree.abhay@gmail.com