उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खाल्लं की पोटात छान गार वाटतं. खरंतर या गारव्यासाठीच कलिंगड खाल्लं जातं. कलिंगडात भरपूर प्रमाणात पाणी असल्यानं उन्हाळ्या़च्या दिवसात शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहाण्यासाठी कलिंगड आहारात असणं आवश्यक आहे. फक्त एवढ्याच फायद्यापुरती कलिंगडाचे गुणधर्म मर्यादित नाही. कलिंगडात जीवनसत्वं, खनिजं आणि ॲण्टिऑक्सिडण्टस हे महत्वाचे घटक असतात. त्यामुळे उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्यांवर कलिंगड खाण्यासोबतच चेहऱ्याला लावणं हा उत्तम उपाय आहे. कलिंगडाचा वापर त्वचेसाठी केल्यास उन्हाळ्यात त्वचेवर येणारी पुरळ, त्वचेचा होणारा दाह या समस्या दूर होतात. त्वचेला थंडावा, आर्द्रता मिळते. तसेच कलिंगडातील गुणधर्मांमुळे एजिंगचा धोका टळतो.
Image: Google
क जीवनसत्वयुक्त कलिंगडामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते. कलिंगडाच्या दाणेदार गराने चेहऱ्याचा मसाज केल्यास त्वचेवरची रंध्र मोकळी होतात आणि छोटीही होतात. कलिंगडातील पाण्यामुळे त्वचेतील हरवलेली आर्द्रता परत मिळवता येत. कलिंगड चेहऱ्याला लावल्यास त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार होते. चेहरा ताजा तवाना होतो. उन्हाळ्याच्या दिवसात कूल राहाण्यासोबतच कूल दिसायचंही असेल तर कलिंगडचं फेशियल अवश्य करायला हवं.
Image: Google
कलिंगडचं फेशियल कसं करावं?
1. कलिंगडाचं फेशियल करताना आधी चेहरा स्वच्छ करावा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी कलिंगडाच्या रसात थोडं खोबऱ्याचं तेल घालून क्लीन्जर तयार करावं. या मिश्रणानं चेहरा व्यवस्थित स्वच्छ करावा.
2. क्लीन्जरनं चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचा खोलवर स्वच्छ होण्यासाठी कलिंगडानं स्क्रब करणं आवश्यक असतं. यासाठी 2 चमचे कलिंगडाचा रस आणि त्यात 1 चमचा तांदळाचं पीठ घालावं. या मिश्रणानं चेहऱ्यावर हळूवार आणि गोलाकार मसाज करत स्क्रब करावं. या स्क्रबमुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा, ब्लॅकहेडस, व्हाइटहेड्स निघून जातात.
Image: Google
3. कलिंगडाच्या स्क्रबनं त्वचा खोलवर स्वच्छ झाल्यानंतर त्वचेला मसाज कर्रावा. यासाठी कलिंगडापासून क्रीम तयार करावी. ही क्रीम तयार करण्यासाठी 1 चमचा कलिंगडाचा रस, अर्धा चमचा मध, थोडा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा खोबऱ्याचं तेल घ्यावं. हे सर्व नीट मिसळून घ्यावं. या मिश्रणानं चेहऱ्याला हलक्या हातानं गोलाकार मसाज करावा. यामुळे त्वचेखालील रक्तप्रवाह वाढतो . चेहऱ्याची त्वचा तजेलदार होते, चमकते. या मसाजमुळे चेहऱ्याची त्वचा आर्द्र होते. त्वचेला ओलसरपणा मिळतो.
4. सर्वात शेवटी त्वचेला कलिंगडचा फेसपॅक लावावा. हा फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा दूध, अर्धा चमचा कलिंगडाचा रस घ्यावा. हे सर्व नीट मिसळून घ्यावं. हा लेप चेहऱ्याला लावावा. तो 15 मिनिटं चेहऱ्यावर ठेवून तो सुकू द्यावा. नंतर चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. कलिंगडाच्या या फेशिअलनं उन्हानं आलेला काळवंडलेपणा निघून जाऊन त्वचा चमकते.