Join us  

उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? उन्हातही चेहरा फ्रेश दिसण्याचे 7 उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2022 4:41 PM

उन्हाळ्यात त्वचेला थंडाव्याची आणि ताजेपणाची गरज असते. ही गरज पुरवण्यासाठी 7 उपाय केल्यास उन्हाळ्यात त्वचे राहाते फ्रेश आणि तजेलदार!

ठळक मुद्देउन्हाळ्यात त्वचा अतिरिक्त तेल निर्मिती करते. या अतिरिक्त तेलाचा बंदोबस्त केला नाही तर त्वचा खराब होते.टी ट्री ऑइलने चेहेऱ्यास मसाज करणं हा उपाय फायदेशीर मानला जातो. उन्हाळ्यात त्वचेस जिवाणू आणि बुरशी संसर्गाचा धोका असतो. यासाठीचा उपाय घरच्याघरी सहज करता येतो. 

ऋतुनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या गरजा जशा बदलतात त्वचेच्या गरजाही बदलतात. त्वचेची जी गरज आहे ती पुरवल्यास त्वचा निरोगी राहाते हे कोणत्याही ऋतूत त्वचा चमकदार आणि सूंदर ठेवण्याचं साधं सोपं सूत्र आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्वचा आर्द्र आणि ओलसर ठेवण्यासठी उपाय करावे लागतात. त्याचा हिवाळ्यात त्वचेला चांगला फायदा होतो. पण म्हणून त्वचेच्या बाबतीत तेच रुटीन उन्हाळ्यातही ठेवल्यास त्वचेला जे हवं ते मिळत नाही आणि  त्वचा खराब होते.  उन्हाळ्यात घामामुळे त्वचा ओलसर आणि तेलकट असते.  अशा परिस्थितीत त्वचेला थंडाव्याची आणि ताजेपणाची गरज  असते.  सतत घाम येतो. घामाला धूळ माती चिटकून त्वचेची रंध्र बंद होतात. त्यामुळे मुरुम -पुटकुळ्या- फोड येण्याची समस्या निर्माण होते. 

Image: Google

उन्हाळ्यात सुर्याच्या तप्त किरणांमुळे त्वचा होरपळते, काळवंडते. यालाच सनबर्न असं म्हटलं जातं. त्वचा खराब होऊन त्वचेस खाज येते. घाम आणि अतिरिक्त तेल निर्मिती यामुळे त्वचेस बॅक्टेरियल आणि फंगल संसर्गाचा धोका असतो. या सर्व समस्यांपासून वाचण्यासाठी उन्हाळ्यात त्वचेला खास 'समर स्पेशल स्किन केअर'ची गरज असते. उन्हाळ्यात त्वचेशी निगडित समस्यांचं स्वरुप हिवाळ्यातील त्वचेच्या समस्यांच्या उलट असत. त्यामुळेच उन्हाळ्यातही त्वचेची हिवाळ्यासारखी काळजी घेऊन चालत नाही. असं केल्यास त्वचेचं नुकसानच होतं. 

Image: Google

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल?

1. उन्हाळ्यात त्वचेला ताजेपणा आणि थंडाव्याची आवश्यकता असते. ही गरज बघता त्वचेची काळजी घेताना टमाट्याचा चेहऱ्याला आठवड्यातून दोन तीनदा लावणं आवश्यक असतं. 

Image: Google

2. त्वचेला हवा असलेला थंडावा आणि ताजेपणा देण्यासाठी कोरफड जेलमध्ये हळद घालून ते चेहेऱ्याला लावल्यास त्वचा स्वच्छ होते. त्वचेला गारवा आणि तजेला मिळतो. 

Image: Google

3. उन्हाळ्यात त्वचा एरवीपेक्षा जास्त तेल निर्मिती करते. त्यामुळे त्वचा तेलकट दिसते. या अतिरिक्त तेलाचा बंदोबस्त केला नाही तर उन्हाळ्यात त्वचा खराब करणाऱ्या अनेक समस्य निर्माण होतात. त्वचेवरचं अतिरित्क तेल नियंत्रित करण्यासाठी  एका वाटीत 1- 2 थेंबं ;लिंबाचं तेल, 1 चमचा जोजोबा ऑइल आणि 2 थेंब टी ट्री ऑइल घ्यावं. हे सर्व नीट एकजीव करुन त्याने चेहेऱ्यास हलक्या हातानं 4-5 मिनिटं मसाज करावा. या मसाजमुळे त्वचेशी निगडित अनेक समस्या बऱ्या होतात. 

Image: Google

4. उन्हाळ्यात घामामुळे त्वचा तेलकट राहून त्वचेला बुरशी आणि जिवाणुचा संसर्ग होवून त्वचा खराब होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी टी ट्री इसेन्शिअल ऑइलचा उपाय करावा. चेहरा आधी पाण्यानं स्वच्छ धुवावा. तो रुमालानं टिपून घ्यावा. हातावर थोडं टी ट्री ऑइलचे थेंब घ्यावेत. ते थेट चेहऱ्यावर जिथे मुरुम पुटकुळ्या आहेत तिथे लावावेत. थोडा वेळानं चेहेरा थंडं पाण्यानं धुवावा.

Image: Google

5. उन्हाळ्यात त्वचेवर सतत सुर्याच्या तप्त किरणांचा आघात होतो. या किरणांचा परिणाम होवून सनबर्नची समस्या निर्माण होते. हे सनबर्नची समस्या घालवण्यासाठी, त्याचा धोका कमी करण्यासाठी 30 किंवा 5- एसपीएफच सनस्क्रीन लोशन/ क्रीम वापरावं.

Image: Google

6. उन्हाळ्यात तेलनिर्मितीमुळे त्वचा खराब होते. त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ होण्यासाठी या काळात पुरेसं पाणी पिणं आवश्यक असतं. साध्या पाण्यासोबतच आठवड्यातून तीन ते चार वेळा  नारळ पाणी पिणं त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं. 

7 उन्हाळ्यात घामामुळे आणि प्रदूषणामुळे त्वचा जळजळ करते. त्वचेला थंडावा मिळण्यासाठी चेहेरा धुतल्यानंतर रुमालात बर्फ घेऊन चेहेऱ्यावर 1-2 मिनिटं फिरवावा. उन्हाळ्यात त्वचेला पोषण मिळून त्वचा निरोगी आणि स्वच्छ राहाण्यासाठी आठवड्यातून 3-4 वेळा फेसमास्क आणि 2-3 वेळा फेस स्क्रबचा उपयोग करावा असं तज्ज्ञ सांगतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल