(Image Credit- Twitter)
मुळची चंदीगढची असणारी २३ वर्षीय ब्यूटी क्वीन हरलीन देओल त्या दिवशी त्या मॅचची खरोखरची क्वीन ठरली. तिची चपळता, गतिशीलता आणि कॅच घेताना तिने मारलेली डाय या गोष्टी केवळ अफलातून होत्या. आजवर आम्ही नेहमीच क्रिकेट पाहत आलाेय, पण कॅच घेताना केलेला हा असा पराक्रम आणि त्याचा विलक्षण रोमांच मात्र आतापर्यंत कधीच अनुभवला नव्हता, अशी प्रतिक्रिया आता लाखो क्रिकेटप्रेमी देत आहेत.
हरलीन मुळची चंदिगढची. हिमाचल प्रदेश टिमकडून क्रिकेट खेळत खेळत तिने फेब्रुवारी २०१९ साली थेट भारतीय क्रिकेट संघात धडक मारली. भारतीय क्रिकेटची पवित्र भुमी समजल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला आणि तो ही इंग्लंड विरूद्धच. फलंदाजी आणि लेग स्पिन बॉलिंग यामुळे हरलीन कायमच ज्या संघात खेळायची तिथे अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखली जायची. कारण जशी वेगवान आणि चमकदार तिची बॅटींग आहे, तेवढीच जबरदस्त तिची बॉलिंगही आहे. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविणारी ती चंदीगढची दुसरीच महिला खेळाडू आहे.
आजपर्यंतचा तिचा खेळ लक्षात राहण्यासारखाच आहे. पण त्या एका कॅचनंतर मात्र ती लोकप्रियतेच्या शिखरावर स्वार झाली आहे. ती एक कॅच घेऊन तिने एका खेळाडूला आऊट केले आणि करोडो मने जिंकून घेतली. नुकत्याच इंग्लंडविरूद्ध झालेल्या टी- २० सामन्यात तिने हा पराक्रम केला आणि 'सुपरवुमन', 'भारतीय क्रिकेट टीमची जडेजा' अशा अनेक विशेषणांनी ती अचानक ओळखली जाऊ लागली.
असा पकडला कॅच...
इंग्लंडची यष्टिरक्षक एमी जोन्सची बॅटींग सुरू होती आणि शीखा पांडेची बॉलिंग. जोन्सने एक जोरदार शॉट मारला. तिने टोलवलेला बॉल आता ब्रॉण्ड्री क्रॉस करणार हे जणू प्रेक्षकांनी गृहितच धरलेले होते. पण त्याचवेळी लाँग ऑफवर फिल्डिंग करत असणारी हरलीन अक्षरश: बॉलकडे एका वाघिणीसारखी झेपावली. तिने सगळ्यात आधी ब्रॉण्ड्री लाईन क्रॉस करू पाहणाऱ्या बॉलला एका हाताने फटकारले. ती स्वत: ब्रॉण्ड्री लाईनच्या पलिकडे गेली. पण क्षणार्धातच तिने स्वत:ला सावरले आणि बॉल अजूनही जमिनीवर पडलेला नाही, हे पाहून तिने विलक्षण चपळाईने पुन्हा एक उडी मारली आणि बॉल कॅच केला. अवघ्या काही क्षणांमध्ये झालेला हा प्रसंग स्वत: हरलीनसाठी, मैदानातल्या खेळाडूंसाठी आणि जगभरातल्या करोडो क्रिकेटप्रेमींसाठी मात्र आयुष्यभरासाठी यादगार बनून राहिला. या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला तरी हरलीन मात्र विजयी ठरली.
या घटनेमुळे हरलीनची तुलना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या उत्तम क्षेत्ररक्षकांसोबत होत असून भविष्यात ती मोठी प्रसिद्ध क्रिडापटू होईल, अशी भविष्यवाणी वर्तवली जात आहे.
भल्याभल्यांनी केले कौतूक
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अद्भुत और शानदार' या शब्दांत हरलीनचे कौतूक केले आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम व्हिडियोवर त्यांनी हरलीने पकडलेल्या कॅचचा व्हिडियो शेअर केला असून हरलीनलाही यामध्ये टॅग केले आहे.
- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरदेखील या कॅचवर फिदा झाले आहेत. 'हरलीन देओलचा हा कॅच लाजवाब होता. या वर्षीचा हा सर्वोत्तम झेल आहे', अशा शब्दांत सचिनने हरलीनला गौरविले.
हरलीनचे सौंदर्य आणि फिटनेस
खेळाडू असली तरी तिचे सौंदर्य आणि स्वत:ला प्रेझेंट करण्याची तिची स्टाईल नेहमीच चर्चिली जाते. सोशल मिडियावर ती कायम अपडेट असते. फिटनेसबाबतही हरलीन प्रचंड कॉन्शिअस असून तिचे सौंदर्य आणि फिटनेस एखाद्या अभिनेत्रीच्या तोडीचे आहे, असेही तिच्याबाबत नेहमीच बोलले जाते.