बाजारात रोज नवनवीन काही ना काही उत्पादने येत असतात. ब्यूटीच्या उत्पादनांना तर महिला लगेच भुलतात आणि जाहिराती पाहून कधी ऑनलाइन पद्धतीने तर कधी थेट दुकानांमध्ये जाऊन या वस्तूंची खरेदी करतात. केस गळणे ही बहुतांश महिलांची एक महत्त्वाची तक्रार असते. कधी केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने, तर कधी कोंड्यामुळे, केसांवर विविध प्रकारच्या ट्रिटमेंटस केल्याने, उत्पादनांच्या वापराने केसगळतीचे प्रमाण वाढते. एकदा केस गळायला लागले की काय करु आणि काय नको असे महिलांना होऊन जाते. केसगळतीमुळे ते खूप पातळ तर होतातच पण काही वेळा आपले टक्कलही दिसायला लागते. यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. आपले केस लांबसडक, दाट असावेत असे प्रत्येकीला वाटते. केस जास्त जळत असतील किंवा अन्य काही कारणांसाठी स्काल्प मसाजर वापरावा असा सल्ला अनेकदा दिला जातो. आता स्काल्प मसाजर म्हणजे काय? तो वापरणे योग्य आहे का? त्याने काय फायदे किंवा तोटे होतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे (Is Scalp Massager is Useful for Hair Growth).
- स्काल्प मसाजरचा केस वाढण्यास फायदा होतो?
स्काल्प मसाजरमुळे केसांच्या खाली असलेल्या त्वचेचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारले की केसांना आणि केसांच्या मुळांना ऑक्सिजन आणि पोषण मिळण्यास मदत होते. या दोन्ही गोष्टींची केसांच्या वाढीसाठी आवश्यकता असल्याने स्काल्प मसाजरचा काही प्रमाणात फायदा होतो. एका संशोधनातून हे सिद्ध करण्यात आले की डोक्याच्या एका भागासाठी स्काल्प मसाजर वापरल्यामुळे त्या भागातील केस वाढले, मात्र दुसऱ्या भागातील केसांची वाढ संथ गतीने झाली.
- स्काल्प मसाजर कसा वापरायचा?
तुम्ही पहिल्यांदाच अशाप्रकारचा मसाजर वापरणार असाल तर डोक्यावर किती प्रेशर द्यायचे याचा कंट्रोल असणारा मसाजर घ्या, त्यामुळे डोक्यावर अनावश्यक प्रेशर येणार नाही. इलेक्ट्रीक मसाजरचा वापर करणे केव्हाही जास्त चांगले कारण हाताने मसाज कराव्या लागणाऱ्या मसाजरचा फारसा जोर पडत नसल्याने त्याचा म्हणावा तितका उपयोग होत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच हा मसाजर रोज ठराविक काळासाठी वापरावा आणि ठराविक प्रेशरने वापरल्यास त्याचा चांगला फायदा होतो. मसाजर ही गोष्ट अत्यावश्यक नसून ती वापरली तर चांगले अशा कॅटेगरीत घेता येऊ शकते.