Join us  

वॉटरप्रूफ मेकअप करणे त्वचेसाठी योग्य की अयोग्य? कॉस्मेटॉलॉजिस्ट सांगतात....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2023 2:46 PM

Is Waterproof Makeup Safe For Your Eyes & Skin : आपल्या नाजूक, कोमल त्वचेसाठी वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधन वापरणे सुरक्षित आहे का?

आपल्यापैकी बऱ्याचजणी मेकअप करताना वॉटरप्रूफ मेकअप करण्यावर जास्त भर देतात. वॉटरप्रूफ उत्पादनांमध्ये क्रीम, लिपस्टिक, फेस बेस, रुज, मस्करा, काजळ अशा अनेक गोष्टी आता बाजारात उपलब्ध आहेत.उन्हाळ्याच्या दिवसांत घामाने, स्विमींग पूल मध्ये डुंबताना किंवा  पावसात भिजताना आपला मेकअप खराब होऊ नये यांसारख्या असंख्य कारणांसाठी आपण वॉटरप्रूफ मेकअप करतो. आपल्याला दिवसभर सुंदर लूक मिळावा असे सर्वांनाच वाटते परंतु त्यासाठी पुन्हापुन्हा मेकअप करणे शक्य होत नाही. छानसा मेकअप करून बाहेर पडल्यावर काही क्षणातच घामाने मेकअप ओघळतो आणि आपण सुंदर दिसण्या ऐवजी भयानकच दिसतो. असे अनेक प्रसंग आपण स्वतः पाहिले, अनुभवले असतील.

यासाठीच आपण वॉटरप्रूफ मेकअपचा पर्याय निवडतो. या उत्पादनांमधील खास फॉर्म्युल्यामुळे मेकअप पाण्याने, घामाने खराब होत नाही. संपूर्ण दिवसभर समारंभात किंवा ऑफिसमध्ये आपण फ्रेश व सुंदर दिसू शकतो. परंतु आपल्या नाजूक, कोमल त्वचेसाठी वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधन वापरणे सुरक्षित आहे का? वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधन वारंवार वापरल्यास त्याचा आपल्या त्वचेवर काय परिणाम होतो, वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधन वापरणे कितपत योग्य आहे, हे पाहूयात(Is Waterproof Makeup Safe For Your Eyes & Skin).

वॉटरप्रूफ मेकअप म्हणजे काय?जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा मेकअप विरघळतो आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन अडकतो. ज्यामुळे मेकअपचा रंग खराब झालेला दिसतो. पाणी आणि घामामुळे आपला मेकअप विरघळून त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मेकअप केला जातो. त्वचेची छिद्रे बंद करून केल्या जाणाऱ्या मेकअपला 'वॉटरप्रूफ मेकअप' म्हणतात.   

वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधन वापरणे सुरक्षित आहे का?कॉस्मेटॉलॉजिस्ट (Cosmetologist) डॉ.नंदीता दास वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधनांबद्दल माहिती देताना सांगतात, मेकअप केल्यानंतर चेहेऱ्यावर येणारा घाम, त्वचेतून निघणारे ऑइल, पावसाळ्यात मेकअप चेहऱ्यावर टिकून राहावा यासाठी वॉटरप्रूफ मेकअपचा वापर केला जातो. वॉटरप्रूफ मेकअप खराब होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरण्यात येणारे घटक हे त्वचेसाठी हानिकारक असू शकतात. आपल्या त्वचेवरील पिगमेंटेशन लपविण्यासाठी या वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधनांमध्ये काही केमिकलयुक्त घटकांचा वापर केला जातो. जर हे घटक नैसर्गिक सौदर्यप्रसाधनांप्रमाणे केमिकल-फ्री असतील तर ते वापरणे सुरक्षित असू शकते. परंतु आजकाल बऱ्याच वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधनांमध्ये भरपूर केमिकल्सचा भडीमार केलेला असतो.     

वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधन वापरणे का आहेत नुकसानदायक... अ‍ॅनिमल व व्हेजीटेबल बेस वॅक्स,पॉलिमर वॅक्स याप्रमाणेच वॉटरप्रूफ मेक-अपच्या साहित्यामध्ये मध्ये देखील सिलिकॉन वापरण्यात येते. ज्यामुळे आपल्या  त्वचेतील छिद्रे बंद होतात. त्वचेतील छिद्रे बंद झाल्याने आपल्या त्वचेवर पिंपल येऊ शकतात,त्वचेवर पुरळ व अ‍ॅलर्जी येऊ शकते. वॉटरप्रूफ फॉऊंडेशनमध्ये सामान्यपणे सिलिकॉन वापरण्यात येते. तसेच वॉटरप्रूफ मस्कारामध्ये देखील कंडीशनिंग घटक असलेले तेल न वापरलेल्यामुळे या प्रसाधनाच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांच्या पापण्या कोरड्या होण्याचा धोका असतो.

 वॉटरप्रूफ मेकअप कसा काढावा?

चेह-यावरील वॉटरप्रूफ मेकअपचा जाड थर काढण्यासाठी आपल्याला चांगल्या गुणवत्तेचे महागडे क्लिनझर विकत घ्यावे लागते. वॉटरप्रूफ मस्कारा काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरणे हा उत्तम पर्याय ठरेल. यासाठी डोळे व डोळ्यांच्या पापण्यांवर थोडेसे ऑलिव्ह ऑईल लावून घ्यावे. थोडावेळ ऑलिव्ह ऑईल तसेच राहू द्या व काही मिनीटांनी डोळे स्वच्छ धुवून घ्यावेत. चेहरा व मानेवरचा वॉटरप्रूफ मेकअप काढण्यासाठी कोल्ड क्रीम वापरणे देखील फायद्याचे ठरते.

वॉटरप्रूफ मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी... सिलिकॉन वापरून वॉटरप्रूफ मेकअप उत्पादने तयार केली जातात. यामध्ये वापरले जाणारे डायनोथिकॉन ऑइल त्वचेला चमकदार बनवते. हे जलरोधक मेकअप सहज पसरण्यास मदत करते. वॉटरप्रूफ मेकअपचे अनेक फायदे असले तरी काही तोटेदेखील आहेत, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. वॉटरप्रूफ मेकअप काढण्यासाठी, पाणी वापरणे पुरेसे नाही. बेबी ऑइल किंवा सिलिकॉन ऑइल यांच्या मदतीने आपण वॉटरप्रूफ मेकअप काढू शकता. त्याच्या वापरामुळे त्वचेवर वाईट परिणाम होऊन त्वचेचे नुकसान होते. त्वचेवर संसर्ग होतो. वारंवार वॉटरप्रूफ मेकअप केल्याने त्वचेवर वेळेपूर्वी सुरकुत्या पडू लागतात. त्यामुळे खास प्रसंगीच वॉटरप्रूफ मेकअपचा वापर करावा. दररोज वॉटरप्रूफ मेकअप करणे टाळावे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी