Join us  

टॅटू केल्यावर लगेच रक्तदान करता येतं का? त्यातले धोके काय, काय टाळणं उत्तम ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 2:24 PM

शरीरावर टॅटू बनवून घेणे आजकाल खूपच कॉमन झाले आहे बॉलीवूड, हॉलीवूड स्टार्स किंवा खेळाडूंनी आपल्या शरीरावर विविध आकाराचे, रंगांचे टॅटू बनवून घेणे आता नविन नाही. मराठी फिल्म इंडस्ट्रीतही हा ट्रेण्ड वेगाने आला आहे आणि अगदी सर्वसामान्य तरूणी तसेच महिलांमध्येही टॅट्यूविषयी जबरदस्त क्रेझ आहे. पण आपल्या शरीरावर हौसेने टॅटू बनवून घेणाऱ्यांना टॅटू बनविल्यानंतर काय काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी कराव्यात हे माहितीच नसते. मुख्य म्हणजे टॅटू केल्यावर रक्तदान करावे की नाही, हा एक मोठा प्रश्न. या सगळ्या प्रश्नांविषयी औरंगाबाद येथील सौंदर्यतज्ज्ञ सुप्रिया सुराणा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

ठळक मुद्देटॅटू बनविताना तो प्रोफेशनल आणि सर्टिफाइड ट्रेनर कडूनच करून घ्यावा.टॅटू बनविल्यानंतर जर आपल्याला कुठलाही शारीरिक त्रास जाणवला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्रास वाढल्यास ब्लड टेस्ट आवर्जून करून घ्या.

सौंदर्यतज्ज्ञ सुप्रिया सुराणाटॅटू हा प्रकार भारतीय संस्कृतीला अजिबातच नवा नाही. फक्त आता काळानुसार नवे रूप घेऊन आणि अधिक आकर्षक होऊन टॅटूचा ट्रेण्ड आपल्यासमोर आला आहे. आपल्या आई, आजी, पणजी, मावशी यांच्या हातावर, कपाळावर आपण आजही हिरवट रंगाचे गोंदण पाहतो. हे गोंदण म्हणजे एक प्रकारचा टॅटूच आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये तर महिला असो किंवा पुरूष, गोंदवून घेणे हे कंपल्सरी असते. गोंदवून घेतले नाही, तर मोक्ष मिळत नाही, अशी त्या लोकांची भाबडी समजूत आहे.  

पुर्वी एकाच रंगाने गोंदले जायचे. बहुतांश महिला त्यांचे किंवा त्यांच्या नवऱ्याचे नाव हातावर गोंदवून घ्यायच्या. आता अधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टॅटू बनविताना आपण रंगबेरंगी गोष्टी आपल्या शरिरावर रेखाटून घेऊ शकतो, एवढाच काय तो गोंदणे आणि टॅटू यामधला फरक.टॅटू बनवून घेणे अतिशय सोपे आहे. पण त्यानंतर मात्र काही दिवस काही गोष्टींचे कटाक्षाने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. यातील सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे टॅटू केल्यानंतर कमीतकमी  ६ महिने तरी त्या व्यक्तीने  रक्तदान करू नये. यातून  विविध आजारांचा संसर्ग होण्याचा धोका असतो.टॅटू बनविताना मशीनची सुई शरीरामध्ये असंख्य छेद करत असते.  त्यामुळे त्या जागेवर छोट्या-छोट्या आकारांचे असंख्य घाव होत असतात. या प्रक्रियेमध्ये मशिनच्या सुईचा वारंवार रक्ताशी संपर्क येत असतो. अशा जखमांची योग्य काळजी घेणे म्हणूनच गरजेचे ठरते. आपण प्रशिक्षित आणि योग्य काळजी घेतली जाईल, अशा व्यक्तीकडूनच टॅटू करणार असाल तर उत्तम. अन्यथा बऱ्याचदा व्यक्तिगणिक मशिनची सुई आणि टॅटूसाठी वापरण्यात येणारी शाई बदलली जाईलच, याची काहीही हमी नाही. त्यामुळे ब्लड ट्रान्समिशनद्वारे होऊ शकणाऱ्या आजारांचा धोका वाढत जातो. एचआयव्ही आणि हिपायटेटीस बी हे आजारही यातून होऊ शकतात. 

त्यामुळे टॅटू बनवल्यानंतर साधारणपणे सहा ते बारा महिने अशा लोकांनी स्वत:हून रक्तदान करणे टाळले पाहिजे असे अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीनेही जाहीर केले आहे. तसेच या कालावधीनंतरही जेव्हा पहिल्यांदा रक्तदान कराल, तेव्हा तुमची स्वत:ची ब्लड टेस्ट आवर्जून करून घ्या, त्यानंतरच रक्तदान करा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. (लेखिका औरंगाबाद येथील प्रसिद्ध ब्युटिशियन आहेत.) 

टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्यमहिला