आज हेअरडायचे असंख्य प्रकार आणि रंग बाजारात उपलब्ध आहेत. पण तरीही केसांसाठी मेहंदीचा वापर करणाऱ्या महिलांचे प्रमाण भरपूर आहे. अनेक तरूणी ज्यांचे केस नुकतेच पांढरे होऊ लागले आहेत, त्यादेखील हेअर कलर लावण्याऐवजी मेहंदी लावणे पसंत करतात. पण मेहंदीमुळे येणारा लालसर रंग अनेकींना आवडत नाही. हा रंग जर नको असेल आणि हेअर कलर सारखा रंग हवा असेल तर मेहंदी भिजविताना फक्त या दोन गोष्टी त्यामध्ये आवर्जून टाका. यामुळे केसांना हेअर कलर केल्यासारखा लूक तर मिळेलच, पण केस अधिक चमकदार पण होतील.
हेअर कलरसारखा लूक मिळविण्यासाठी हे उपाय करा
सगळ्यात आधी तर मेहंदी भिजविण्यासाठी जे पाणी वापरणार आहात ते पाणी लोखंडी कढईतच उकळायला ठेवा. साधारणपणे दोन पॅक मेहंदी घेणार असाल तर उकळत्या पाण्यामध्ये चार टेबलस्पून चहा पावडर आणि दोन टेबलस्पून कॉफी पावडर टाका. चहा पावडरचा वापर केल्याने मेहंदीचा रंग केसांवर अधिक खुुलतो. तसेच लहान आकाराचे बीट अर्धे चिरून चांगले किसून घ्या आणि त्याचा किस उकळत्या पाण्यात टाका. यानंतर जास्वंदाची चार ते पाच फुले घेऊन त्यांचे बारीक तुकडे करून ते देखील उकळत्या पाण्यात टाका आणि २० ते २५ मिनिटे पाणी चांगले उकळू द्या. यानंतर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्या. पाणी थंड होताना कढईवर झाकण ठेवावे. यानंतर हे पाणी गाळून घ्यावे आणि ज्या लोखंडी कढईत हे पाणी तयार केले, तीच कढई स्वच्छ करून मेहंदी भिजविण्यासाठी वापरावी. चार ते पाच तास लोखंडी कढईमध्ये मेहंदी भिजू द्यावी आणि त्यानंतरच केसांना लावावी. अशा पद्धतीने जर बीट आणि जास्वंद वापरून भिजविलेली मेहंदी केसांना लावली तर केसांचा कलर नक्कीच अतिशय आकर्षक येतो.
या गोष्टीपण विसरू नका
- अशा पद्धतीने जर मेहंदी रात्रीच भिजवून ठेवली आणि सकाळी केसांना लावली तर अधिक चांगला रंग येतो.
- मेहंदी भिजविताना आपण त्यामध्ये दही, लिंबू देखील टाकू शकतो. यामुळे केसांचे पोषण होते.
- तसेच जेव्हा किसलेले बीट टाकू तेव्हाच किसलेला कांदाही मेहंदीसाठी उकळणाऱ्या पाण्यात टाकावा. यामुळेही निश्चितच फायदा होतो.