Join us  

करिष्मा कपूरचा चिकनकारी लेहंगा, चिकनचा पारंपरिक लूक गजब! वाचा त्यातली खास बात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 5:16 PM

कुठून आले हे कापड, काय आहे त्याची खासियत आणि या कापडावरील काम नेमके कसे केले जाते जाणून घ्या...

ठळक मुद्देचिकनकारी हा एम्ब्रॉयडरी कापडाचा एक पारंपरिक प्रकार आहे. हे कापड विणणं कौशल्याचे काम असून अतिशय बारीक सुईने हे सुंदर विणकाम केले जाते.चिकनकारी पंजाबी सूट, साडी यांबरोबरच चिकनकारी दुपट्टेही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत

सणवार आले की तरुणी आणि महिलावर्गामध्ये खरेदीची धांदल असते. या खरेदीतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपडे. महिला वर्ग कपडे घेताना कापडाचा प्रकार, त्याचा पोत, त्यावरील नक्षीकाम, कलाकारी या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देतात. वेगवेगळ्या प्रकारची कापडे महिला वर्गाला नेहमीच भुरळ घालतात. मागील काही वर्षांपासून फॅशन इन असलेला चिकनकारी हा त्यातीलच एक प्रकार. या प्रकारातील पंजाबी सूट, कुर्ते अगदी साडीलाही मागील काही वर्षांत बरीच मागणी वाढली आहे. आता हा कापडाचा प्रकार नेमका काय असतो. तो कधी आणि देशाच्या कोणत्या भागातून तयार होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे.

( Image : Google)

तर चिकनकारी हा एम्ब्रॉयडरी कापडाचा एक पारंपरिक प्रकार आहे. भारतातील लखनऊमध्ये हे कापड तयार केले जाते म्हणून त्याला लखनवी म्हणतात. लखनऊमधील चौकमध्ये अनेक कामगार चिकनकारीचं बारीक एम्ब्रॉडरीचं काम करताना आढळतात. या कापडाचे रंग आणि बारीक काम यामुळे त्याचे सौंदर्य अधिकच वाढवतात. आजकाल चिकनकारीचा वापर ब्रायडल आऊटफिट्समध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ज्यामुळे सेलिब्रेटीजही अनेक कार्यक्रमात लखनवी आऊटफिट्स कॅरी करताना दिसतात. नुकतेच करिश्मा कपूरने एक फोटोशूट केले आहे. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा एक अतिशय सुंदर लेहंगा घातलेला दिसत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. हा लेहंगा प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्रा याने तयार केला आहे. तिने मनिष मल्होत्राचीच पोस्ट रिशेअर केली आहे. सोशल मीडियावर या फोटोला अनेकांनी लाइक केले आहे. तर कित्येकांनी तिच्या या पोस्टवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. करिश्माचा लेहंग्यावर अतिशय सुंदर असे भरतकाम केले आहे. या स्लिव्हलेस लेहंग्यावर एक छानशी ओढणी देण्यात आली असून त्याने लेहंगा आणखी उठावदार दिसत आहे. चमकता ग्लिटर फिल दिलेल्या या लेहंग्याला छानसा घेरही देण्यात आला आहे. यात करिश्मा अतिशय खुलून दिसत आहे. 

 

 

 

असं मानलं जातं की मुघल साम्राज्याचा सम्राट जहांगीर याची पत्नी असलेल्या नूरजहामुळे भारतात चिकनकारी लोकप्रिय झाली. कारण तिने भारतात येताना हे कापड इकडे आणलं. हे कापड विणणं कौशल्याचे काम असून अतिशय बारीक सुईने हे सुंदर विणकाम केले जाते. चिकनकारीचे हे काम करण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. यामध्ये आता मशिनमेड चिकनकारीही उपलब्ध आहे. मात्र त्याची किंमत तुलनेने कमी असते. पूर्वी फक्त पांढऱ्या रंगाच्या दोऱ्याने हे भरतकाम केले जात असे मात्र आता विविध रंगांच्या दोऱ्याने हे भरतकाम केले जाते. तसेच त्यावर मोती, खडे आणि आरशांचे काम करुन या कापडाची शोभा आणखी वाढते. चिकनकारी पंजाबी सूट, साडी यांबरोबरच चिकनकारी दुपट्टेही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. हे कापण महाग असल्याने ते अतिशय व्यवस्थितपणे वापरावे लागते.  चिकनकारी करायला तलम सुती, सेमी जॉर्जेट, क्रेप आणि इतर तलम कापडांचा वापर केला जातो. सुईचे भरतकाम असल्याने त्यासाठी जाड कपडा चालत नाही. चिकनकारी करताना मूळ कापडावर प्रथम नक्षीचे ब्लॉक प्रिंट केले जातात. यामध्ये एक किंवा अधिक नमुने असू शकतात. मग कारागीर त्या नक्षीकामावर काळजीपूर्वक भरतकाम करतो. त्यानंतर तो कपडा स्वच्छ धुतला जातो आणि ब्लॉक प्रिंटिंगची नामोनिशाणी मिटवली जाते.  

टॅग्स :करिश्मा कपूरब्यूटी टिप्सफॅशन