Join us  

करिश्मा कपूरची कांजीवरम साडी विथ कलमकारी प्रिंट! कांजीवरम- कलमकारीचं पाहा देखणं मनमोहक फ्युजन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2021 4:43 PM

पारंपरिक डिझाईन्सच्या कांजीवरम साडी (Kanjivaram silk saree) आपण नेहमीच पाहतो... पण कांजीवरम साडीचं आणखी देखणं आणि माॅडर्न रूप पाहायचं असेल, तर करिश्मा कपूरच्या (actress Karisma Kapoor) साडीचे हे फोटो बघाच...

ठळक मुद्देकरिश्माची ही साडी पुर्णपणे वेगळी आहे. करिश्माने नेसलेल्या या पारंपरिक धाटणीच्या कांजीवरम साडीला पुर्णपणे मॉडर्न लूक देण्यात आला आहे.

बॉलीवूडमधला (bollywood) एक काळ गाजविणारी अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या चित्रपटांपासून दुर असली तरी सोशल मिडियावर (social media) चांगलीच ॲक्टिव्ह असते. आता हेच बघा ना मागील काही काळापासून करिश्मा आणि तिच्या सिल्कच्या साड्या (silk saree) सोशल मिडियावर चांगल्याच हिट होत आहेत. तिच्या चाहत्यांना तर ही पर्वणी आहेच, पण साडीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या महिला, तरूणींनाही करिश्माच्या काही साड्यांनी वेड लावलं आहे. दिवाळीच्या सुमारास करिश्माने सोशल मिडियावर शेअर केलेले तिचे पिवळ्या आणि गुलाबी रंगातल्या कांजीवरम साडीचे फोटोही जबरदस्त व्हायरल (socail viral) झाले होते.

 

करिश्माने पुन्हा एकदा तिचे कांंजीवरम साडीतले काही फाेटो इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केले आहेत. पण करिश्माने यावेळी नेसलेली कांजीवरम साडी अजिबातच टिपिकल, पारंपरिक धाटणीची नाही. कांजीवरम साडी असं म्हटलं की डोळ्यासमोर येते ती सिल्कची साडी आणि तिच्यावर सोनेरी जर. पण करिश्माची ही साडी पुर्णपणे वेगळी आहे. करिश्माने नेसलेल्या या पारंपरिक धाटणीच्या कांजीवरम साडीला पुर्णपणे मॉडर्न लूक देण्यात आला आहे. कलमकारी आर्टची (kanjeevaram saree with kalamkari art) मदत घेऊन ही साडी अतिशय मॉडर्न पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे. Neeru’s Indian Ethenic या ब्रॅण्डने ही साडी डिझाईन केली असून ती खरोखरंच बघण्यासारखी आहे.

 

कांजीवरम साडी म्हणजे तमिळनाडू (Tamilnadu) प्रांतातील कांचीपुरम येथील विणकरांची अनमोल देण. दोन- तीन विणकर एकत्र येऊन ही साडी विणतात. साडीचे काठ आणि मधल्या भागातले नक्षीकाम, रंग पुर्णपणे वेगळा असतो. साडीचा पदर वेगळा, स्वतंत्रपणे विणला जातो आणि नंतर साडीला जोडला जातो. कांजीवरम साडीच्या नक्षींमध्ये मुख्यत: सूर्य, चंद्र, रथ, मोर, पोपट, राजहंस, सिंह, नाणी, आंबे, पाने, जाई-जुईच्या कळ्या असे आकार दिसतात. पण या मॉडर्न लूकच्या कांजीवरम साडीमध्ये मात्र पुर्णपणे कलमकारी प्रिंट दिसून येत आहे. 

 

कलमकारी कला ही मुळची आंध्रप्रदेशची (Aandhra Pradesh). कलमकारी कलेत कोणत्याही रासायनिक किंवा कृत्रिम रंगांचा वापर केला जात नाही. नैसर्गिक वस्तूंपासून रंग बनविले जातात आणि मग त्या रंगांच्या साहाय्याने कपड्यावर नक्षी रेखाटून रंगकाम केले जातो. पाने, फुले, वेली या आकारात बहुतांश कलमकारी दिसते. पुर्वी ही कला केवळ हाताने केली जायची. पण आता मशिनच्या साहाय्यानेही कलमकारी करता येते. करिश्माच्या कांजीवरम साडीवर डिजिटल पद्धतीने कलमकारी करण्यात आली असून कलमकारीचे पारंपरिक आकार आणि रंग या साडीवरही कायम ठेवण्यात आले आहेत. सुती कपड्यावरच प्रामुख्याने कलमकारी करण्यात येते. पण या साडीच्या माध्यमातून कांजीवरम साडीसारख्या तलम, नाजूक सिल्कवर कलमकारी करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे.

 

करिश्मा जी कांजीवरम साडी नेसली आहे ती मोती रंगाची असून तिचे काठ सोनेरी आणि लाल रंगाचे आहेत. या साडीवर लाल, पिवळा, निळा, हिरवा असे रंग वापरून कलमकारी करण्यात आली आहे. कलमकारीच्या प्रत्येक नक्षीला काळ्या रंगाने बॉर्डर केली आहे. साडीचा पदर आणि खालचा काठ अतिशय भरजरी आहे. करिश्माने या साडीवर जांभळ्या रंगाचे वर्कचे ब्लाऊज घातले असून करिश्मा या ट्रॅडिशनल, मॉडर्न लूकमध्ये खूपच छान दिसत आहे. या साडीची किंमत अंदाजे ३६ हजार ते ६२ हजार या दरम्यान असावी, असे Neeru’s Indian Ethenic या ब्रॅण्डच्या याच प्रकारातील काही इतर  साड्या पाहून लक्षात येते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकरिश्मा कपूरकांचेपुरमसेलिब्रिटीफॅशन