थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे ती तडतडते. हवा कोरडी असल्याने त्याचा त्वचेवर परीणाम होतो आणि त्वचाही रुक्ष व्हायला लागते. अशावेळी त्वचेच्या वरचा थर निघाल्यासारखा होणे, पांढरा कोंडा पडणे, त्वचेला भेगा पडणे, आग होणे अशा समस्या निर्माण होतात. मग आपण एकतर त्वचेला मॉईश्चरायजर लावणे किंवा तेल लावणे अशा गोष्टी करतो. मात्र याचा इफेक्ट ठराविक काळापर्यंतच राहतो. काही वेळाने पुन्हा त्वचा कोरडी झाल्यासारखी होते आणि आपल्याला खाज यायला लागते. कोरडेपणामुळे त्वचेला कंड सुटला असेल आणि त्याठिकाणी आपण खाजवले तर काही वेळा रक्तही येते. हे सगळे होऊ नये आणि थंडीतही त्वचा मुलायम राहावी यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. यासाठी थंडीच्या दिवसांत आंघोळ करताना ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्यास त्वचेचा पोत किमान आहे तसा राहण्यास मदत होते (Keep 3 things in mind while taking bath in winter for good skin).
१. साबणाचा वापर
उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला मोठ्या प्रमाणात घाम येत असतो. त्यामुळे आपण दिवसांतून किमान २ वेळा आंघोळ करतो. इतकेच नाही तर घामाचा वास जाण्यासाठी आपण अंगाला भरपूर साबण लावून त्याचा फेस करतो. त्यानंतर पाण्याने साबण साफ करतो. पण थंडीच्या दिवसांत आपल्याला इतक्या जास्त प्रमाणात घाम येत नाही. अशावेळी आपण अंगाला साबण लावला तर साबणातील रासायनिक घटकांमुळे त्वचा जास्त कोरडी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे गरज नसेल तर थंडीच्या दिवसांत रोजच्या रोज अंगाला साबण लावण्याची आवश्यकता नसते. एक दिवसाआड साबण लावला तरी चालतो.
२. गरम पाणी
थंडी वाजते म्हणून अनेकदा आपण आंघोळीसाठी नेहमीपेक्षा जास्त गरम पाणी घेतो. त्यामुळे आपल्याला तात्पुरते बरे वाटत असले तरी त्वचेसाठी इतके गरम पाणी चांगले नसते. प्रमाणापेक्षा जास्त गरम पाण्याने त्वचा आहे त्यापेक्षा जास्त कोरडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीतही आंघोळीसाठी नेहमीप्रमाणे कोमट पाणी घेणेच केव्हाही जास्त चांगले.
३. अंग पुसताना
अंग पुसताना आपण घाईघाईत खसाखसा अंग पुसतो. त्वचा जास्त कोरडी असेल तर अशाप्रकारे खरखरीत टॉवेलने अंग पुसल्यास त्वचेची आग होण्याची किंवा त्वचेला खाज येण्याची शक्यता असते. काहीवेळा त्वचेचा थर निघाल्यासारखे झाले असेल तर अंग जोरात पुसल्याने त्वचा निघाल्यासारखे होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत अंग थोडे हळूवार पुसायला हवे.