थंडीत आंघोळ करताना 4 नियम पाळले तर आंघोमुळे शरीर आणि मन दोन्ही ताजं तवानं होतं. त्वचेची योग्य काळजी घ्यायची असेल तर रोज स्वच्छ आंघोळ करणं हा पहिला नियम आहे. उन्हाळ्यात तर दिवसातून दोनदा आंघोळ करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पण एरवीची आंघोळ आणि हिवाळ्याच्या काळातली आंघोळ यात फरक आहे. हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतला रुक्षपणा वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात आंघोळ करताना पाणी, साबण, अंग पुसणे याबाबत जर काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर छान आंघोळ करुनही त्वचा खराब झाल्याचा अनुभव येईल.म्हणूनच थंडीतल्या आंघोळीबाबतचे नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे.
Image: Google
काय आहेत थंडीतले आंघोळीचे नियम?
1. थंडीत खूप वेळ बाथरुममधे आंघोळीसाठी घालवू नये. म्हणजे आंघोळ कशी तरी करावी किंवा टाळावी असं नव्हे. तर खूप वेळ गरम पाणी अंगावर ओतत राहिल्यानं थंडी वाजण्यापासून सुटका होत असली तरी गरम पाणी जास्त प्रमाणात अंगावर घेतल्यानं त्वचा मात्र रुक्ष, रखरखीत होते. त्वचेतलं नैसर्गिक तेल अति गरम पाण्यानं निघून जातं. आंघोळ करताना होणार्या या चुकीमुळे त्वचा फाटते.
2. आंघोळीसाठी कोमट पाणी घ्यावं. यामुळे त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय त्वचेतील तेलही सुरक्षित राहातं.
3. थंडीत आंघोळीसाठी जास्त स्ट्रॉंग साबण वापरु नये. कमी केमिकल्स असलेला साबण वापरावा. असा साबण हवा जो त्वचेतील तेल काढून टाकणार नाही.त्यामुळे सौम्य साबण वापरावा. विशेषत: ग्लिसरीन, मध या घटकांचा वापर केलेला साबण वापरावा. जो साबण लावल्यावर जास्त फेस होतो तो साबण थंडीच्या दिवसात तर अजिबातच वापरु नये. कारण या साबणाच्या वापराने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाऊन त्वचा खराब होते.
Image: Google
4. आंघोळ झाल्यानंतर नेहमीप्रमाणे अंग घासून पुसु नये. हाताने अंगावरील पाणी झटकून टाकावं आणि नंतर रुमाल अंगावर हळुवार दाबून अंगावरील ओलावा टिपून घ्यावा.
5. आंघोळ झाल्यानंतर पाच मिनिटांच्या आत मॉश्चरायझर लावायला हवं. तरच दिवसभर त्वचेतील ओलावा टिकून राहातो.