प्रत्येक स्त्रीला रेशमी आणि चमकदार केस हवे असतात. परंतु आपल्यापैकी बऱ्याच स्त्रिया केसांच्या विविध समस्यांना कंटाळल्या आहेत. केस गळणे, केस तुटणे यासह अनेक प्रश्न त्यांच्या समोर आहेत. चांगली झोप आणि तणावमुक्त जीवन याबरोबरच केसांच्या रक्षणासाठी विटामिन्स आणि अनेक प्रकारचे पोषक तत्वांची गरज असते जे आपल्या केसांची देखभाल करतात. केरेटिन एक असे प्रोटीन आहे आपले केस डॅमेज होण्यापासून वाचवते. स्मूदनिंग आणि रिवायडींग नंतर केराटिन ट्रीटमेंट महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे या ट्रीटमेंटमुळे केस सुंदर दिसतात.
केरेटिन एक प्रकारचे फायबर प्रोटीन आहे. जे आपल्या केसांमध्ये आणि नखांमध्ये आढळते. हे केसांमध्ये बाह्यरूप बनवते जेव्हा केसाचे बाह्य आवरण खराब होते तेव्हा त्याची चमक कमी होते व ते डॅमेज होऊ लागतात. केरेटिन केस मऊ करतात व आपल्याला पाहिजे तसे आकार देण्यासाठी मदत करतात. केरेटिन मुळे केसांना मॉइश्चरायझर मिळते आणि केसांना चमकदार, मऊ बनविण्यास मदत करते. केरेटिन ट्रीटेड केसांची भरपूर काळजी घ्यावी लागते. योग्य ती काळजी घेतली नाही तर केसांची चमक जाऊन ते पूर्ववत होऊ शकतात(Keratin Treatment After Care: What You Need to Know Post-Session).
केरेटिन हेअर ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय?
फ्रिजी आणि रुक्ष केसांना मऊ आणि सरळ करण्यासाठी केरेटिन उपचार केले जाते. केरेटिन आपल्या केसांमधील असलेले नैसर्गिक प्रथिने आहे. ज्यामुळे आपल्या केसांमध्ये चमक येते, पण प्रदूषण आणि रसायने आणि सतत उन्हात राहिल्याने केसांची ही चमक नाहीशी होते. ज्यामुळे केस रुक्ष, खराब आणि निस्तेज दिसतात, तसेच केसांची चमक देखील कमी होते. म्हणून केसांच्या नैसर्गिक प्रथिनांना पुन्हा मिळवण्याच्या या उपचारालाच केरेटिन प्रोटीन ट्रीटमेंट असे म्हणतात. या उपचारामध्ये कृत्रिम केरेटिन टाकले जाते आणि असं केल्याने आपले केस मऊ आणि चमकदार होतात. सध्याच्या काळात ही ट्रीटमेंट खूप प्रसिद्ध आहे.
केरेटिन ट्रीटेड केसांची काळजी कशी घ्यावी...
१. उष्णतेपासून लांब राहा - केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांना जास्त उष्णतेपासून लांब ठेवणे गरजेचे आहे. केरेटिन हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर केसांवर उपकरणांचा जसे की, हेअर स्ट्रेटनर किंवा हेअर कर्ल्स मशीनचा वापर करणे शक्यतो टाळा. या मशीनमधून बाहेर पडणाऱ्या गरम उष्णतेमुळे केरेटिन ट्रीटेड केसांना हानी पोहोचून त्यांचे नुकसान होऊ शकते. केरेटिन ट्रीटेड केसांवर अशा उपकरणांचा वापर करायचाच झाल्यास या मशीनमधून निघणारी उष्णता सामान्य ते मध्यम श्रेणीत असेल याची काळजी घ्यावी.
२. योग्य ती काळजी घ्यायलाच हवी - केरेटिन हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर अशा केसांची काही दिवस भरपूर काळजी घ्यावी लागते. केरेटिन ट्रीटेड केसांसाठी वेगळ्या प्रकारचे शॅम्पू , कंडिशर येते, त्यांचा अवश्य वापर करा. केरेटिन हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर अमुक दिवसांनी त्यांची काळजी घेण्यासाठी काही खास शॅम्पू ,कंडिशर, सिरम लावण्याचा सल्ला दिला जातो. ते वेळच्या वेळी केसांना लावायचे लक्षात ठेवा. केरेटिन ट्रीटेड केसांची निगा राखण्यासाठी आपण जितके अधिक खबरदार राहू तितके केस खराब होण्याची शक्यता कमी असते. या ट्रीटमेंटनंतर केसांच्या देखभालीसाठी स्पा आणि सल्फेटरहित शॅम्पूचा वापर करावा.
३. तेलाचा वापर करा - तेल हे आपल्या केसांचे संरक्षण करण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे. तेलाच्या वापरामुळे आपल्या स्कॅल्प आणि केसांचे आरोग्य चांगले राहते. तेलच्या वापराने फक्त रक्त प्रवाह सुधारण्यातच मदत होते असे नाही तर त्याचबरोबर आपला स्कॅल्प आणि टाळू यांची हानी होण्यापासून त्यांचा बचाव करते. केरेटिन ट्रीटमेंट केल्यानंतर तेलाचा वापर करणे खूपच गरजेचे आहे.
४. एका वेळी एकच हेअर ट्रीटमेंट करा - केसांवर कोणत्याही प्रकारची हेअर ट्रीटमेंट करताना एका वेळी एकच हेअर ट्रीटमेंटबी करण्याला प्राधान्य द्यावे. केरेटिन ट्रीटमेंट केल्यानंतर इतर कोणत्याही प्रकारच्या रासायनिक हेअर थेरपीपासून दूर राहणे केव्हाही उत्तमच आहे. केरेटिन ट्रीटमेंट केल्यानंतर जर आपण इतर कुठलीही रासायनिक थेरपी केसांवर केली तर केरेटिन ट्रीटमेंट मध्ये केसांना बाहेरून पुरविलेल्या कृत्रिम प्रथिनांची हानी होऊन केसांना इजा पोहोचू शकते.
५. केसांवर ब्लिचचा वापर करू नका - केरेटिन ट्रीटेड केसांवर ब्लिचचा वापर करू नका. ब्लिच करायचेच असल्यास केरेटिन ट्रीटमेंट केल्यानंतर किमान तीन ते चार आठवड्यानंतर केसांवर ब्लिचचा वापर करावा. जर लगेच तुम्ही केसांवर ब्लिचचा वापर केला तर केसांना प्राप्त झालेला चमकदार आणि गुळगुळीतपणा जाऊन ते परत रुक्ष होऊन गळण्याची शक्यता असते.
६. केस धुताना गरम पाणी टाळा - केसांवर केरेटिन ट्रीटमेंट केल्यानंतर जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. या गरम पाण्याच्या वाफेमुळे केसांना हानी पोहोचू शकते. म्हणून केरेटिन ट्रीटेड केसांसाठी कोमट किंवा सौम्य गरम पाण्याचा वापर करू शकता.
७. क्लोरीनपासून लांब राहा - केरेटिन ट्रीटमेंटमध्ये केसांना केरेटिन प्रोटीन देण्याचे काम केले जाते. ज्यामुळे केस निरोगी, मजबूत आणि मऊ होतात. परंतु अशातच तुम्ही जर क्लोरीनयुक्त पाण्याचा वापर केला तर केरेटिन ट्रीटमेंट दरम्यान केसांना दिलेलं केरेटिन निघून जाऊन ते पुन्हा पूर्ववत होऊ शकतात.