केस सरळ करण्यासाठी पार्लरमध्ये जावून खर्चिक हेअर ट्रीटमेण्ट घेतल्या जातात. केराटिन ट्रीटमेण्ट (keratin treatment) ही त्यातलीच एक. ही ट्रीटमेण्ट करण्यासाठीही खूप पैसे खर्च करावे लागतात. शिवाय एकदा केराटिन ट्रीटमेण्ट केली तर त्याचा प्रभाव फार काळ केसांवर टिकत नाही. केस पुन्हा पहिल्यासारखे होतात. एवढे पैसे खर्च करुन काहीच उपयोग झाला नाही असे विचार निराश करतात. हे सर्व टाळण्याचा एक सोपा उपाय म्हणजे भेंडी. आता तुम्ही म्हणाल केराटिन ट्रीटमेण्टचा आणि भेंडीचा काय संबंध? तर त्याचं उत्तर म्हणजे भेंडीच्या सहाय्याने केस सरळ आणि मऊ (straight and soft hair) करण्यासाठी केराटिन ट्रीटमेण्ट करता येते. त्यासाठी पार्लरमध्ये जाण्याचीही गरज नाही. भेंडीचा वापर करुन घरच्याघरी केराटिन ट्रीटमेण्ट ( keratin treatment with lady finger at home) करणं सहज सोपं आहे.
Image: Google
केस मऊ आणि सरळ करण्यासाठी केराटिन ट्रीटमेण्ट केली जाते. केस, नखं यात केराटिन हे नैसर्गिक प्रथिनं असतात. केराटिन ट्रीटमेण्टमध्ये केसांना अतिरिक्त प्रथिनं पुरवले जातात. त्यामुळे केसातील राठपणा, गुंता कमी होतो. केस मऊ होतात, सुंदर दिसतात. कुरळ्या केसांसाठी तर केराटिन ट्रीटमेण्ट फायदेशीर मानली जाते. पण केराटिन ट्रीटमेण्टमध्ये केसांवर रासायनिक घटकांचा वापर होतो. त्याचा केसांवर दुष्परिणामही होतात. हे टाळण्यासाठे नैसर्गिक घटकांचा वापर करुन घरच्याघरी केराटिन ट्रीटमेण्ट करता येते. त्यासाठी भेंडी ही उपयुक्त आहे.
भेंडीमध्ये फायबर, लोह, बीटा केराटिन, क आणि अ जीवनसत्वं, कॅल्शियम, फोलेट, मॅग्नेशियम आणि फाॅस्फरस हे घटक असतात. भेंडीतील हे पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. भेंडीमधील बीटा केराटिन हा घटक केसांसाठी उपयुक्त असतो. त्यामुळेच घरच्या घरी केसांवर केराटिन ट्रीटमेण्टसाठी भेंडीचा वापर केला जातो.
Image: Google
भेंडीचे केराटिन क्रीम कसं करावं?
भेंडीचे केराटिन क्रीम करण्यासाठी 15-20 भेंडी, 1 चमचा खोबऱ्याचं तेल, 1 चमचा बदामाचं तेल, पाव कप पाणी आणि 1 चमचा काॅर्न स्टार्च घ्यावं.
भेंडीचं केराटीन क्रीम करताना भेंडी धुवून पुसून स्वच्छ करावी. भेंडी बारीक कापून घ्यावी. एका कढईत कापलेली भेंडी आणि एक कप पाणी घालवं. 10 मिनिटं भेंडी पाण्यात उकळू द्यावी. चिकट मिश्रण तयार झालं की गॅस बंद करावा. हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करुन घ्यावं. नंतर वाटलेलं हे मिश्रण सूती कापडानं गाळून घ्यावं. एका भांड्यात 1 चमचा काॅर्न स्टार्च घ्यावं. त्यात पाव कप पाणी घालून ते मिसळून घ्याव. नंतर यात भेंडीचं मिश्रण टाकावं. हे भांडं गॅसवर ठेवावं. मंद आचेवर मिश्रण उकळू द्यावं. हे मिश्रण सतत हलवत राहावं. घट्ट पेस्ट तयार झाली की गॅस बंद करावा. या मिश्रणात 1 चमचा खोबऱ्याचं तेल आणि 1 चमचा बदामाचं तेल घालावं. हे सर्व पुन्हा चांगलं मिसळून घ्यावं.
Image: Google
केराटिन क्रीम केसांना कसं लावावं?
केराटिन क्रीम केसांना लावण्यासाठी केसांचे छोटे छोटे भाग करावेत. प्रत्येक केसाच्या बटीला केराटिन क्रीम लावावं. केसांच्या सर्व बटींना केराटीन क्रीम लावून झालं की कंगव्यानं केस विंचरावेत. त्यामुळे केराटिन क्रीम केसांवर व्यवस्थित पसरतं. केस शाॅवर कॅप घालून झाकून घ्यावे. केसांवर ही केराटिन क्रीम 2 तास राहू द्यावी. नंतर केसांना शाम्पू न लावता केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून 2 वेळा लावल्यास केस मऊ आणि सरळ राहातात. केराटिन ट्रीटमेण्ट केल्यानं खराब केसांचा पोत सुधारतो. केसांवर चमक येते. केसांमधला राठपणा निघून जाऊन केस मऊ होतात.