त्वचेवर जेव्हा फोडं येतात, मुरूम येतात, तेव्हा त्यावरचे इलाज आपण चटकन करतो. पण बऱ्याच जणांमध्ये त्वचेचा एक वेगळाच प्रकार पाहायला मिळतो. यामध्ये त्वचेवर लक्षात येण्यासारखी फोडं तर दिसत नाहीत. पण अगदी लहान लहान म्हणजे कुणीतरी पेन्सिलीने कागदावर काढले आहेत असे डॉट डॉट दिसायला लागतात. त्या त्वचेवरून हात फिरवल्यावर हाताला खरखरीत, रखरखीत असे काही तरी जाणवतो. हा जो त्वचेचा आजार आहे याला चिकन स्किन असे म्हणतात. काही वेळेला हे पुरळ काळे, तपकिरी, चॉकलेटी असतात तर काही वेळेला त्वचेच्या रंगाचेच असतात.
सौंदर्यतज्ज्ञांच्या मते चिकन स्किन हा काही कोणता त्वचाविकार नाही. ज्याप्रमाणे वयात आल्यावर फोड येणं जेवढं सहज आहे, तेवढंच सहज चिकन स्किन आहे. शरीराच्या काही भागातच चिकन स्किन प्रकार आढळून येतो. उदाहरणार्थ हाताच्या कोपऱ्यांच्या अवतीभवती, गुडघे आणि त्याच्या सभोवतालची त्वचा, पाठ, दंड याठिकाणी चिकन स्किन आढळून येते. काही जणांच्या बाबतीत तर चेहऱ्यावरही हा त्रास दिसून येतो. विशेषत: हनुवटी आणि आसपासची त्वचा याठिकाणी चिकन स्किन आढळते. त्वचेवर येणाऱ्या बारीक बारीक डागांमुळे त्वचा अतिशय खराब दिसू लागते. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
चिकन स्किन का होते ?
त्वचेवरील पोअर्स बंद होतात आणि ते त्या भागावरील केसांच्या वाढीला प्रतिबंध करतात. यामुळे त्वचेवर त्याचा डाग तयार येतो. बारीकसा फुगवटा येतो. त्यालाच आपण चिकन स्किन म्हणतो.
कसा कमी करायचा चिकन स्किनचा त्रास ?
१. अंघोळ करताना ही पथ्ये पाळा
खूप कडक पाण्याने आंघोळ करण्याची ज्यांना सवय असते, अशा लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो. त्यामुळे खूप गरम पाणी आंघोळीला घेऊ नका. कोमट पाण्याने आंघोळ करा. तसेच खूप जास्त वेळ आंघोळ करू नये. यामुळे त्वचा डिहायड्रेट होऊन शुष्क होते.
२. डेड स्किन काढून टाका
या भागाचे स्क्रब करणयाचा सल्लाही तज्ज्ञ देतात. दगड किंवा वजरीने देखील तुम्ही हा भाग चोळू शकता. पण स्क्रब केल्यानंतर या भागावर मॉई्श्चरायझर जरूर लावावे. अन्यथा ती त्वचा अधिक शुष्क आणि कोरडी होईल.
३. त्वचेला मॉईश्चराईज करा
चिकन स्किनला मॉईश्चराईज ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर अशा त्वचेला मॉईश्चरायझर जरूर लावा. तसेच व्हिटॅमिन ए आणि लॅक्टीक ॲसिड असणारे मॉईश्चरायझर या त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरते.
४. दुधाने मालिश करा
दुधामध्ये मोठ्या प्रमाणात लॅक्टिक ॲसिड असते. त्यामुळे चिकनस्किनला जर दुधाने मालिक केली तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.