केस हा आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. आपली फिगर, चेहरा, कपडे हे जसे स्वत:ला प्रेझेंट करण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे केसांचे सौंदर्यही महत्त्वाचे असते. केस छान लांब, दाट आणि हेल्दी असतील तर सौंदर्यात भर पडते. पण हेच केस खूप पातळ, गळणारे किंवा खूप रुक्ष आणि कोंडा झालेले असतील तर मात्र आपण हैराण होतो. केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी आपण त्यावर हजारो रुपयांच्या ट्रिटमेंटस करतो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. त्यामुळेच केस छान ठेवायेचे असतील तर आहार, आपण केसांसाठी वापरत असलेली उत्पादने यांचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा. तेल, शाम्पू, कंडीशनर, सिरम ही किमान उत्पादने आपण केसांसाठी वापरतो. मात्र आपल्या केसांना कोणता शाम्पू वापरायला हवा याबाबत प्रत्येकाला माहिती असतेच असे नाही. म्हणूनच आज आपण कोणत्या प्रकारच्या केसांसाठी कोणता शाम्पू वापरलेला चांगला हे समजून घेणार आहोत (Know Different type of shampoos for different type of hairs).
१. केसांना हायड्रेट ठेवणारे शाम्पू
तुमचे केस खूप कोरडे आणि रुक्ष असतील तर ते मुलायम व्हावेत यासाठी काही हलके शाम्पू वापरायला हवेत. शाम्पूमधील केमिकलमुळे त्वचा आणि केस कोरडे होतात. पण या शाम्पूमुळे केसांची मुळे आणि केस सिल्की राहण्यास मदत होईल.
२. क्लारिफायिंग शाम्पू
तुम्ही नियमित सिरम किंवा केस सेट करण्यासाठी काही उत्पादने वापरत असाल, तसेच तुमच्याकडे बोअरिंगचे पाणी येत असेल तर तुम्ही क्लारिफायिंग शाम्पू वापरायला हवेत. तसेच हा शाम्पू वापरल्यावर न विसरता कंडीशनर वापरायला हवा त्यामुळे केस मुलायम राहण्यास मदत होईल.
३. अँटी डँड्रफ शाम्पू
कोंडा ही केसांची एक महत्त्वाची समस्या असून तो कमी होण्यासाठी शाम्पूचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्वचेचे पापुद्रे निघणे, खाज येणे, इन्फेक्शन अशा समस्या असतील तर तुम्ही आठवड्यातून किंवा १० दिवसातून एकदा अँटी डँड्रफ शाम्पू आवर्जून वापरायला हवा.
४. ड्राय शाम्पू
ड्राय शाम्पू हे इतर कोणत्याही शाम्पूला पर्याय नसतात हे सगळ्यात आधी लक्षात घ्यायला हवे. तुम्हाला सतत घाम येत असेल. केसांची त्वचा खूप तेलकट असेल आणि सतत केस धुवायला जमत नसेल तर या प्रकारातील शाम्पू तुम्ही वापरायला हवा. यामुळे त्वचेतील तेलकटपणा कमी होण्यास आणि केस चांगले दिसण्यास मदत होईल.