दिवाळीसारखा सण आला की आपण अगदी नखशिखांत तयार होत असतो. केसांच्या ट्रिटमेंटसपासून ते पेडिक्युअरपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण अगदी मनापासून करतो. वर्षभर सतत सुरु असणारी कामं, करिअर, आजारपणं, सणवार, लग्न-कार्य यांमध्ये आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ होतोच असे नाही. सौंदर्य म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो आपला चेहरा. चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण नेहमीच काही ना काही लहान-मोठे उपाय करत असतो. पण हात, पाय यांच्याकडे मात्र म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. अनेकदा धूळ, प्रदूषण, ऊन यांमुळे आपले हात आणि पाय काळे पडतात, बोटं-नखंही खराब होतात (Know How to do Pedicure at home with natural things Beauty tips for Diwali).
रोजच्या धावपळीत आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही. पण दिवाळीच्या निमित्ताने मात्र आपण थोडा का होईना वेळ काढून आणि आपल्या शरीराची, मनाची काळजी घ्यायलाच हवी. यासाठी हजारो रुपये घालवून पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंटसच घ्यायला हव्यात असं काही नाही. तर पेडिक्युअरसारख्या ट्रिटमेंटस आपण घरच्या घरीही करु शकतो. घरात सहज उपलब्ध होणाऱ्या अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्याने त्वचेला केमिकल्सचा त्रासही होत नाही आणि याचा इफेक्टही दिर्घकाळ टिकण्यास मदत होते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी पार्लरच गाठायला हवे असे काही नाही. पाहूयात घरच्या घरी पेडिक्युअर करण्याची आणि पाय सुंदर-गोरेपान दिसण्यासाठी नेमकं काय करायला हवं...
१. सगळ्यात आधी पायावर पूर्वीचे नेलपॉलिश असल्यास ते नेल रिमूव्हरने स्वच्छ करा. पायाची नखे नेल कटरने कापून त्यांना हवा तो आकार द्या. नेल फाइलरने नखांची टोके फाईल करा आणि मग नखांमधून घाण काढून टाका.
२. एका टबात गरम पाणी घेऊन त्यात मीठ, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घाला. या पाण्यात १५ ते २० मिनीटे पाय भिजवून ठेवा. हे करत असताना शांतपणे डोळे मिटून बसा आणि बाजूला तुमच्या आवडीचे संगीत लावा. यामुळे तुम्हाला नकळत आतून रिलॅक्स वाटेल
३. स्क्रबर म्हणून एका लहान बाऊलमध्ये इनो, टूथपेस्ट आणि लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण लिंबाच्या सालीला लावून त्याने पायाला सगळ्या बाजूने घासा, पाण्याने पाय धुवा. त्यानंतर एखाद्या जुन्या मऊ झालेल्या टूथब्रशने नखे साफ करा. म्हणजे नखांत अडकलेली अडकलेली घाण, माती निघून जाण्यास मदत होईल. आता नखे आणि कापडाने पुसून टाका. त्वचा नखांवर चिकटलेली राहते, याला क्यूटिकल म्हणतात. क्यूटिकल रिमूव्हरच्या मदतीने ते परत काढा
४. आता साय आणि लिंबू एकत्र करुन नैसर्गिक क्रिमने पायाला सगळीकडून छान मसाज करा. यामुळे पाय मॉईश्चराईज होण्यास मदत होईल. याशिवाय २ चमचे साखर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल, एक चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस आणि दोन चमचे बाजरीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ यांपासून तयार केलेल्या स्क्रबरचाही वापर करता येऊ शकेल.
५. नखांना एकसारखा शेप देऊन त्यातील घाण काढून नखांवर तुमच्या आवडीची एखादी छान नेलपेंट लावा. पंधरवड्यातून एकदा अशाप्रकारे पेडिक्युअर केल्यास पाय कायम स्वच्छ राहण्यास मदत होईल.