Join us  

थंडीमुळे केसांचा झाडू झालाय? विकतचे महागडे हेअर सिरम वापरण्यापेक्षा घरीच करा सिरम, केस होतील मस्त सिल्की-शायनी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2023 4:57 PM

Know How To Make Hair Serum at Home : जास्त पैसे खर्च न करताही आणि केसांचा नैसर्गिक पोत आहे तसाच ठेवून आपल्याला सुंदर दिसता येऊ शकते.

आपले केस सिल्की आणि शायनी असावेत अशी सगळ्याच मुलींची इच्छा असते. एरवी काही प्रमाणात केस तसे असतातही, मात्र थंडीच्या दिवसांत तर ते खूपच खराब होतात. थंडीत त्वचा कोरडी पडल्याने ज्याप्रमाणे रुक्ष होते त्याचप्रमाणे केसांचीही वाट लागते. केमिकल्सचा वापर, प्रदूषण यांमुळे आधीच खराब झालेले केस थंडीच्या दिवसांत तर अगदीच वाईट दिसायला लागतात. मग या केसांना एकतर सतत कंडीशनिंग करावे लागते नाहीतर हेअर स्पा करुन त्यांचा पोत चांगला राहील याची काळजी घ्यावी लागते. केस सिल्की दिसण्यासाठी हेअर सिरमचाही बऱ्याच तरुणी वापर करतात.

पण बाजारात मिळणारी सर्वच उत्पादने आणि ट्रिटमेंटस महागड्या असल्याने त्यासाठी आपल्याकडे तितके पैसे असणे गरजेचे असते. तसेच यामध्ये वापरण्यात आलेल्या केमिकल्समुळे केसांवर दिर्घकालिन परीणाम होण्याचीही शक्यता असते.त्यामुळे जास्त पैसे खर्च न करताही आणि केसांचा नैसर्गिक पोत आहे तसाच ठेवून आपल्याला सुंदर दिसता येऊ शकते. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हेअर सिरम करण्याची पद्धत समजून घेतल्यास आपले केस ऐन हिवाळ्यातही छान दिसू शकतात. हे सिरम कसे करायचे समजून घेऊया (Know How To Make Hair Serum at Home)...

१. पातेल्यात १ कप पाणी घेऊन ते गरम झाले की त्यात २ चमचे जवस आणि २ चमचे रोजमेरीची पानं मिक्स करा.

२. हे मिश्रण ३ ते ४ मिनीटे उकळल्यानंतर जवसामुळे हे पाणी थोडे चिकटसर होईल.

३. चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि लगेचच एका बाऊलमध्ये गाळून घ्या.

४. या मिश्रणात गरम असतानाच १ चमचा बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑईल नाहीतर खोबरेल तेल घालून ते चांगले मिक्स करा.

५. यामध्ये थोडे गुलाब पाणी घालून ते पुन्हा चांगले एकत्र करा. 

६. हे मिश्रण एखाद्या बाटलीत किंवा बरणीत भरुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवा. 

लावायचे कसे?

केस धुतल्यानंतर ते पूर्ण कोरडे झालेले नसताना म्हणजेच थोडेसे ओलसर असताना सिरमचे काही थेंब हातावर घ्यायचे आणि ते केसांवर चोळायचे. हे सिरम केसांना न लावता केसांच्या मुळांशी लावायला हवे. तसेच तुमचे केस खूपच कोरडे आणि फुगणारे असतील तर रात्री झोपतानाही तुम्ही हे सिरम केसांच्या मुळांना लावून झोपू शकता. त्यामुळे केसांचा कोरडेपणा काही प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत होईल. केसांचा पोत तेलकट असेल तर सिरम तयार करताना त्यामध्ये तेल घालण्याची आवश्यकता नाही. 

फायदे

 

१. केसांना चमक येण्यास आणि सिल्की दिसण्यास मदत होते

२. केसगळती कमी होण्यास उपयुक्त

३. केसांची खुंटलेली वाढ नव्याने सुरू होण्यास फायदेशीर

४. केसांच्या मुळांचा आणि केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी