आपला चेहरा स्वच्छ राहावा, चांगला दिसावा यासाठी आपण दिवसातून किमान २ ते ३ वेळा तो धुतो. चेहरा धुताना आपण पाण्यासोबतच फेसवॉशचा वापर करतो. चेहऱ्यावर असणारे धुळीचे कण, घामाचा चिकटपणा निघून जाण्यासाठी चेहरा धुताना फेसवॉश वापरणे अतिशय उपयुक्त असते. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण या फेसवॉशची निवड करतो. बाजारात विविध कंपन्यांचे वेगवेगळ्या स्वरुपाचे फेसवॉश उपलब्ध असतात. त्यापैकी आपल्याला सूट होणारा, आवडणारा आणि खिशाला परवडेल असा फेसवॉश आपण निवडतो. मात्र यामध्ये असणारे केमिकल्स आपल्या चेहऱ्यासाठी म्हणावे तितके चांगले नसतात. सुरुवातीला आपल्याला त्याची तीव्रता लक्षात येत नाही मात्र सततच्या केमिकल्सच्या वापराने त्वचा खराब होण्याची शक्यता असते. अनेकदा हे केमिकल्स डोळ्यात गेल्याने डोळ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो (Know How To Make Homemade Natural Facewash for Bright Skin).
हे फेसवॉश बरेच महाग असल्याने आपले खूप पैसेही खर्च होतात. त्यामुळे विकतच्या महागड्या फेसवॉशपेक्षा घरच्या घरीच फेसवॉश तयार केला तर? घरात सहज उपलब्ध असणाऱ्या आणि नैसर्गिक पदार्थांपासून फेसवॉश तयार केला तर? या फेसवॉशचे कोणतेच साईड इफेक्ट नसतात आणि तो स्वस्तात मस्त असल्याने आपले पैसेही वाचतात. इतकेच नाही तर अशाप्रकारच्या फेसवॉशमुळे त्वचा नितळ, सुंदर दिसण्यास मदत होते. चेहऱ्याला कमी वयात सुरकुत्या येणे, सतत फोड, पिंपल्स येत राहणे यांसारख्या समस्या असतील तर या घरगुती फेसवॉशने त्यापासूनही आराम मिळतो. एकदा आपण ही पावडर तयार करुन ठेवली की पुढचे कित्येक दिवस आपण ती वापरु शकतो. पाहूयात हा नैसर्गिक चेहरा उजळवणारा फेसवॉश कसा तयार करायचा...
१. साधारण एक वाटी बेसन घ्या, त्यामध्ये १ वाटी चंदन पावडर मिसळा.
२. यात १ वाटी मसूर डाळीचं पीठ घाला, हे पीठ आपण घरीही मिक्सरवर तयार करु शकतो.
३. यात १ वाटी जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्यांची पावडर आणि १ वाटी कडुनिंबाची पावडर घाला.
४. हे सगळे एका बाऊलमध्ये चांगले एकत्र करुन घ्या आणि एका हवाबंद बरणीत किंवा डब्यात भरुन ठेवा.
५. ज्यावेळी आपल्याला चेहरा धुवायचा आहे तेव्हा साधारण अर्धा ते एक चमचा पावडर हातावर घ्या.
६. यात अंदाजे पाणी घालून घट्टसर पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट फेसवॉशप्रमाणे चेहऱ्याला लावा.
७. साधारणपणे १ मिनीटासाठी चेहऱ्याला मसाज केल्यास त्वचेवरील घाण निघून जाण्यास मदत होते.
८. किमान २ मिनीटे हा फेसवॉश चेहऱ्यावर तसाच ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका.
९. यामुळे चेहरा स्वच्छ आणि चमकदार, नितळ दिसण्यास मदत होईल.