केस लांबसडक वाढावेत म्हणून आपण बरेच प्रयत्न करत असतो. कधी केसांना वेगवेगळी तेलं लावणे, कधी हेअर मास्क लावून केस वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. काही ना काही कारणाने आपले केस प्रमाणाबाहेर गळतात आणि मग आपल्याला ताण यायला सुरुवात होते. केसांचे गळणे कमी व्हावे आणि ते चित्रपट किंवा टिव्हीतील अभिनेत्रींप्रमाणे वाढावेत यासाठी पारंपरिक उपाय केव्हाही जास्त उपयुक्त ठरतात. केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरच्या घरी आयुर्वेदीक गोष्टींचा वापर करणे केव्हाही चांगले. आपली आजी करायची त्याप्रमाणे घरीच तेल तयार केले तर केसांसाठी हे तेल नक्कीच उपयुक्त ठरते. आपली आजी चॅलनच्या सुमन धामणे यांनी नुकतीच घरी तेल तयार करण्याची रेसिपी सांगितली असून हे तेल करण्यासाठी काय काय साहित्य लागते आणि ते कसे तयार करायचे पाहूया (Know How to Make perfect Ayurvedic hair oil at home)...
साहित्य -
१. खोबरे तेल - १ लीटर
२. आवळे - १० ते १२
३. हळकुंड - २ इंच
४. जास्वंद पाने
५. जास्वंद फुले
६. लिंबू पाने - २० ते २५
७. कडीपत्ता
८. कोरफड
९. कांदा बी - १ चमचा
१०. मेथी दाणे - २ चमचे
कृती -
१. एका मोठ्या पातेल्यात १ लीटर तेल घालून ते गॅसवर गरम करायला ठेवायचे.
२. आवळ्यातील बिया काढून, हळकुंड कुटून घ्यायचे आणि ते या तेलात घालायचे.
३. यामध्ये अंदाजे कोरफडीचा गर, जास्वंदीची पानं आणि जास्वंदीची फुलं घालायची.
४. लिंबाची पानं, कडीपत्ता आणि कांद्याचे बी घालून हे सगळे चांगले एकजीव करुन घेऊ.
५. मेथ्याचे दाणे घालून हे सगळे मिश्रण १५ ते २० मिनीटे चांगले उकळून घेऊ.
६. गार झाल्यावर हे तेल गाळून एका बरणीत भरुन ठेवायचे.
७. केसांतील कोंडा, केसगळती, उवा कमी होण्यासाठी आणि केस मजबूत होण्यासाठी या तेलाचा अतिशय चांगला उपयोग होतो.