Join us  

केस भराभरा वाढण्यासाठी लावा हा खास राईस वॉटर पॅक; काही दिवसांत केस होतील लांबसडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2023 12:43 PM

Know How To Use Rice Water for Hair Growth : हा मास्क कसा तयार करायचा आणि लावायचा याविषयी...

केस लांबसडक असतील तर आपल्या सौंदर्यात नक्कीच भर पडते. अशा केसांच्या छान छान हेअरस्टाईलही करता येतात आणि त्यामुळे नकळत व्यक्तिमत्त्व खुलण्यास मदत होते. हल्ली प्रदूषण, केमिकल्स असलेले शाम्पू आणि इतर उत्पादने तसेच ताणतणाव यांमुळे केस जास्त प्रमाणात गळतात. अन्नातून केसांचे पुरेसे पोषण न झाल्यानेही केस गळण्याचे प्रमाण वाढते. यामुळे एकतर केस पातळ होतात आणि भरभर वाढतही नाहीत. मग आपण एकतर पार्लरमध्ये जाऊन काही ना काही ट्रिटमेंटस घेतो. किंवा महागडी उत्पादने वापरुन केस वाढण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असं नाही. 

नैसर्गिक उपायांनी केस वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यामुळे कोणतेही साईड इफेक्टस होत नाहीत. आपण बरेचदा केसांचा पोत सुधारावा, केस मुलायम व्हावेत यासाठी विविध हेअर मास्क वापरतो. त्याचप्रमाणे केस वाढण्यासाठी घरच्या घरी हेअर मास्क कसा तयार करायचा ते पाहूया. तांदळाचा वापर करुन हा मास्क तयार करायचा असल्याने यासाठी फारसा खर्चही येत नाही आणि केस झटपट वाढण्यास मदत होते. तांदूळ केस आणि त्वचा या दोन्हींसाठी फायदेशीर असतो. यामुळे केस मजबूत होतात आणि वाढ होण्यास मदत होते. पाहूया हा मास्क कसा तयार करायचा आणि लावायचा. 

(Image : Google)

१. एक वाटी तांदूळ घेऊन तो स्ववच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर धुतलेले पाणी टाकून देऊन एका रिकाम्या बाऊलमध्ये हा तांदूळ ठेवायचा आणि यात साधारण २ ते ३ कप पाणी घालायचे. 

२. किमान अर्धा ते १ तास हे पाणी यामध्ये तसेच ठेवायचे. तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट हवे असतील तर २ दिवसांसाठी तांदूळ पाण्यात ठेवला तरी चालतो. 

३. आता तांदूळ आणि त्याचे पाणी दोन्ही वेगळे करायचे. 

४. केसांना तांदळाचे पाणी लावण्याआधी केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे. 

५. आता तांदळाचे पाणी केसांच्या मुळांना आणि केसांना वरच्या बाजूने पूर्णपणे लावून घ्यायचे. 

(Image : Google)

६. किमान २० मिनीटे ते अर्धा तास हे पाणी केसांवर तसेच ठेवायचे आणि मग चांगल्या पाण्याने केस धुवून टाकायचे. 

७. केसांतून तांदळाचे पाणी पूर्णपणे काढल्यानंतर केसांना तुम्ही नेहमी वापरता तो कंडीशनर लावा आणि काही वेळ कंडीशनर केसांना ठेवून केस धुवून टाका.

८. घरच्या घरी करता येणारा हा उपाय केस लांबसडक वाढावेत यासाठी अवश्य करुन पाहा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी