अभिनेत्री म्हटलं की त्यांची स्कीन एकदम ग्लोइंग आणि चमकदार असते असा आपला समज असतो. पण त्यांनाही अनेकदा त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांवर त्या काय उपाय करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन हिची बहिण आणि अभिनेत्री असलेली नुपूर सेनन हिची स्कीन आधी अगदी सामान्य मुलींसारखी होती. आपला चेहरा मुरुमांनी भरलेला आणि त्यावर खूप ब्रेकआऊटसही होते असे ती सांगते. ज्या नितळ त्वचेमुळे आणि इनोसन्ट लूकमुळे चाहते तिच्यावर फिदा असतात ती त्वचा पूर्वी इतकी खराब होती हे वाचून तुम्हाला खरे वाटणार नाही. पण आपली त्वचा चांगली असावी यासाठी ती बरेच कष्ट घेते.
सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नुपूर सेननचे नाव घेतले जाते. अक्षय कुमारसोबत तिचे फिलहाल हे गाणे बरेच गाजले होते. आपल्या स्कीनबाबत ती म्हणते, कॉलेजमध्ये असताना माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर मुरुम होते, त्यामुळे मी खूप हताश व्हायचे. लाल भडक मुरुमांमुळे मी खूप हैराण व्हायचे. त्यातच हे मुरुम फुटले की चेहरा आणखीनच वाईट दिसायचा. यासाठी मी डॉक्टरांकडे जाऊन उपचारही घेतले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग स्कीन एक्सपर्टने सुचवलेल्या काही गोष्टींचा वापर करत मी माझ्या त्वचेवर काम करायचे ठरवले आणि मला त्याचे चांगले परिणाम दिसायला लागले. सध्या फॅशन आणि ब्यूटी आयकॉन अशी ओळख असलेल्या नुपूरने अशाप्रकारे आपल्या त्वचेच्या समस्येसाठी बराच झगडा केला. हा सगळा काळ आपल्यासाठी अतिशय वाईट होता असेही ती म्हणते. आता तिने असे काय केले ज्यामुळे तिची स्कीन इतकी छान नितळ झाली...
१. बाजारात उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांच्या बाबतीत मला पुरेशी माहिती असते. मात्र मी त्याचा वापर न करता घरगुती उपायांना प्राधान्य देते.
२. सनस्क्रीन लोशन हे उन्हात जाताना लावतात. ज्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण होते. पण नुपूर मुरुम आणि ब्रेकआऊटची समस्या दूर करण्यासाठी घरातही दर दोन ते तीन तासांनी सनस्क्रीन लोशन लावते. घरातही ही किरणे असतात आणि तुमची त्वचा संवेदनशील असेल तर ही समस्या वाढू शकते.
३. नुपूर त्वचा ग्लोइंग व्हावी यासाठी ती घरात असेल आणि तिच्याकडे वेळ असेल तेव्हा पपई, केळं अशा फळांचे नैसर्गिक मास्क चेहऱ्याला लावणे पसंत करते. अशाप्रकारे मास्क लाऊन स्वत:ची काळजी घेणे तिला आवडते.
४. डे सिरम, नाइट सिरम आणि मॉइश्चरायजर यांचा नियमित वापर केल्याने माझ्या त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर झाल्या असेही नुपूर सांगते. सुरुवातीला मला याबाबत योग्य ती माहिती नव्हती. मात्र मी याबाबत पुरेशी माहिती घेतली आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आवर्जून काही गोष्टी करायला लागले.
५. तिला पीसीओडीचा त्रास असल्याने चेहऱ्यावर सतत मुरुम येत होते. मात्र या समस्येसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यासह योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. जीवनशैलीचा तुमच्या सगळ्या आरोग्यावर परीणाम होत असल्याने ती चांगली असणे गरजेचे असते.