सारीका पूरकर-गुजराथी
लॉकडाऊन काळात घरी बसून इंटरनेटच्या मदतीने मेकअप शिकण्याचा, तसे व्हीडीओ पाहण्याचा प्रयत्न अनेकजणी करतात. त्यावरुन शिकतातही. मात्र प्रत्येकवेळी तुम्हाला परफेक्शन मिळेलच असं नाही. कारण काही वेळेस फाऊंडेशनची शेड चुकू शकते तर काही वेळेस ब्रशचा प्रकार. म्हणूनच मेकअप करताना या चुका टाळता येतात का ते पहा..
स्किनला रेडी आहे?
१. मुळात मेकअप तुमचे जे फीचर्स आहेत त्यांना हायलाईट करतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या मुळ रुपाची विशेषतः स्किनची थोडी काळजी घेणे गरजेचे असते. ती न घेताही मेकअप करुन सगळं झाकता येणार नाही. त्यासाठी माईल्ड फेशवॉशचा वापर करुन चेहरा धुण्याची सवय लावा तसेच चेहरा वाळल्यानंतर चांगल्या प्रतीचे मॉईश्चरायझर लावा. त्यामुळे फाऊंडेशन, प्रायमर लावण्यासाठी चांगला बेस तयार होतो. मॉईश्चरायझर लावल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी मेकअपची सुरुवात करा.२. चांगल्या प्रतीचे फाऊंडेशन लावले की लगेचच तुम्हाला फ्लॉलेस लूक मिळतो, असा एक समज आहे पण तो चुकीचा आहे. कारण फाऊंडेशन जरी लावले तरी कन्सिलर लावल्याशियाय तुमच्या चेहऱ्यावरचे डाग, खड्डे, मुरुम-पुटकुळ्या झाकले जात नाहीत. त्वचेला एकसारखे पोतही तुम्हाला मिळत नाही. कन्सिलर लावले नाही तर मेकअप पॅची दिसतो.
३. फाऊंडेशन आणि कन्सिलरची शेड तुमच्या त्वचेच्या रंगाला मॅच होणारी नसेल तर मेकअप खडूने रेघोट्या ओढाव्या तसा भासतो. हे टाळण्यासाठीच तुमच्या त्वचेच्या रंगाला मिळत्या-जुळत्या फाऊंडेशनच्या दोन शेड्स निवडून, एक-एक करुन चेहऱ्या वर लावा, १५ मिनिटे राहू द्या. रंग बदलून कसा दिसतो याची लूक टेस्ट करा व शेड निवडा.